मोदींचा मेगा शो ; अडीच तास चालला मोदींचा ताफा, १५० ठिकाणी २५ क्विंटल गुलाबांनी स्वागत

दिव्य मराठी

Apr 26,2019 08:41:00 AM IST

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी येथे मोठा रोड शाे केला. मोदींनी वाराणसीत पाऊल ठेवण्याआधी टि्वटरवर हर-हर महादेव लिहून काशीच्या जनतेस अभिवादन केले. मोदींनी सायं. ५.१५ वाजता बीएचयू येथे येऊन मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. ७ किमी लांब रोड शो ७.४५ वाजता दशाश्वमेध घाटावर संपला. १५० ठिकाणी मोदींचे स्वागत झाले. त्यांच्यावर २५ क्विंटल गुलाब पुष्पवृष्टी झाली. मोदींनीही लोकांवर फुले फेकली. रोड शोमध्ये ६-७ लाख लाेक होते,असा दावा भाजपने केला.

पुलवामात आपले ४० जवान शहीद, तेथेच ४२ अतिरेक्यांचा खात्मा : मोदी

पाच वर्षांत कोणते शहर, पवित्र स्थान किंवा मंदिरावर अतिरेकी हल्ला होऊ शकला नाही. देशाने एवढ्या मोठ्या प्रमाणातील कुंभमेळा शांततेत अनुभवला. दहशतवाद आता जम्मू-काश्मीरच्या खूप कमी क्षेत्रापुरता मर्यादित राहिला आहे. पुलवामात त्यांनी ४० जवानांना शहीद केले. त्याच ठिकाणी आतापर्यंत ४२ अतिरेक्यांचा खात्मा केला. ही आमची काम करण्याची पद्धत आहे.’

पूर्वांचलचा दौरा सुरू...

शोचा परिणाम :

जवळच्या २४ जागांवर वाराणसीला पूर्वांचलची राजधानी म्हटले जाते. तेथून पूर्वांचलच्या २० आणि बिहारच्या ४ जागांवर प्रभाव पडतो. या जागांवर १२ आणि १९ मे रोजी मतदान होईल. मोदींनी १५ दिवसांपूर्वीही येथे रोड शोद्वारे या जागांवर लक्ष केंद्रित केले होते.

मत गणित: सर्वाधिक ३ लाख मुस्लिम
वाराणसीत १८ लाख मतदार आहेत. सर्वाधिक ३ लाख मुस्लिम मतदार आहेत. २.५ लाख ब्राह्मण, १.५ लाख कुर्मी, १.५ लाख यादव, ६५ हजार कायस्थ, ८० हजार चौरसिया, १.५ लाख भूमिहार आणि ८० हजार दलित मतदार आहेत.

भाजपचा गड : ७ पैकी ६ वेळा विजय १९९१ नंतर वाराणसीत झालेल्या ७ पैकी ६ लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. १९९१ मध्ये भाजपचे श्रीशचंद्र दीक्षित, नंतर भाजपचेच शंकर प्रसाद ३ वेळा जिंकले होते. २००४ मध्ये काँग्रेसचे राजेश मिश्रा, २००९ मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि २०१४ मध्ये नरेंद्र मोदी जिंकले.

चौकीदार आणि डोंब असतील प्रस्तावक
मोदी शुक्रवारी अर्ज भरतील. चौकीदार व डोंब त्यांचे प्रस्तावक असतील. कुंभात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुणे आणि आता डोंबाला प्रस्तावक करणे हा सप-बसपला मात देण्याच्या धोरणाचा भाग आहे.

X