Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Modi said that Pawar's wicket gone in Civil War

गृहयुद्धात पवारांची ‘विकेट’: मोदी; अजित पवार पक्षावर ताबा मिळवत असल्याची भाजपची टीका

प्रतिनिधी | Update - Apr 02, 2019, 08:12 AM IST

काँग्रेसला टाेला : हाेय, मी ‘शाैचालयाचा चाैकीदार’, महिलांचा सन्मान करतो

 • Modi said that Pawar's wicket gone in Civil War

  वर्धा - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा कधीकाळी आपले ‘राजकीय गुरू’ म्हणून आदराने उल्लेख करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी साेमवारी वर्धा येथील महायुतीच्या जाहीर सभेत केवळ राष्ट्रवादीतील गृहकलह व शरद पवारांच्या कुुटुंबातील वादावर भाष्य केले. ‘शरद पवार यांची आता पक्षावरील पकड निसटत चालली असून, पुतण्या अजित पवार यांनी पक्षावर ताबा मिळवण्यासाठी पवारांचीच ‘हिट विकेट’ घेतली,’ अशी टीका माेदींनी केली. भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ माेदी यांची महाराष्ट्रातील पहिलीच सभा साेमवारी वर्धेत झाली. दुपारी १२ च्या सुमारास माेदींचेे भाषण सुरू झाले, ४२ अंश तापमानात श्राेते उपस्थित हाेते, मात्र २०१४ च्या तुलनेत ही गर्दी कमी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

  मैदानावरील काही खुर्च्या व काही जागा रिकामी असल्याचे दिसून आले. ३४ मिनिटांच्या भाषणात माेदींनी विकासकामांचा आेझरता उल्लेख करत जास्त वेळ काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करण्यात घालवला. त्यातही शरद पवार व राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. तत्पूर्वी पीएसएलव्ही सी ४५ यशस्वी झाल्याबद्दल व ५ देशांचे २ डझनाहून अधिक उपग्रहांचे प्रक्षेपण झाल्याबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात करीत ‘सर्वप्रथम सर्वांना साष्टांग दंडवत’ असे म्हणत महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून प्रचारसभेला सुरुवात करीत आहे, असे सांगितले. काँग्रेसकडून आपली ‘शाैचालयाचा चाैकीदार’ म्हणून हेटाळणी केली जात असली तरी आपण हे शब्द सन्मान म्हणून स्वीकारताे. माझ्या माता- भगिनींच्या इज्जतीचे संरक्षण मी या निमित्ताने करत आहेे, याचा अभिमान आहे, असा टाेलाही माेदींनी विराेधकांना लगावला. काँग्रेसने आंबेडकरांना कधीच सन्मान दिला नाही, मात्र त्यांच्या नावावर मते मिळवण्याचे काम केले. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांचे बलिदान विसरून पुरावे मागणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, अनिल सोले, माजी खासदार दत्ता मेघे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित हाेते.

  शरद पवारांवर प्रहार
  > माेदी म्हणाले, आपण पंतप्रधान हाेऊ अशी पवारांनाही अपेक्षा हाेती. यातूनच त्यांनी निवडणूक लढवण्याची घाेषणा केली हाेती. पण वाऱ्याची दिशा त्यांना कळते. त्यामुळे त्यांनी माघार घेतली, म्हणाले, मी राज्यसभेतच खुश.
  > राष्ट्रवादीत सध्या गृहकलह सुरू आहे. शरद पवार यांची पकड सैल हाेत आहे. त्यांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवत आहेत. पुतण्याने काकांची ‘हिट विकेट’ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत इतरांचेही धैर्य आता संपत चालले आहे.
  > अजित पवारांच्या वादग्रस्त विधानाचा उल्लेख करून माेदी म्हणाले, ‘जेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी अजित पवारांना धरणातील पाण्याबाबत विचारत हाेते, तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते मी जाहीरपणे बाेलूही शकत नाही.
  > मावळचे शेतकरी आपल्या अधिकारासाठी लढत हाेते, तेव्हा पवार कुटुंबीयांनी या शेतकऱ्यांवर गाेळ्या झाडण्याचे आदेश दिले हाेते. पवार स्वत: शेतकरी असूनही ते शेतकऱ्यांना विसरले. त्यांच्या कार्यकाळात शेकडाे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
  > काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेते कुंभकर्णी झाेपेत असतात. ते सहा-सहा महिने झाेपतात. सहा महिन्यांत एकदा उठतात आणि पैसा खाऊन पुन्हा झाेपतात.


  काँग्रेसने केला भारतीय संस्कृतीचा अपमान
  ‘काँग्रेसने ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचा वापर करून भारतीय संस्कृतीचा अपमान केला, तर दुसरीकडे आझाद मैदान परिसरात दंगल घडवणाऱ्या तसेच हुतात्म्यांच्या स्मारकाची नासधूस करणाऱ्यांवर कारवाई होऊ नये यासाठी तजवीज करून ठेवली होती. अशा काँग्रेसला भारतीय कसे माफ करू शकतील?’ असा प्रश्न माेदींनी उपस्थितांना विचारला.

  योजना बंद हाेण्याचे सांगत भाजपने जमवली गर्दी
  ब्राह्मणी गावातील काही ज्येष्ठ नागरिक व महिलांंना खाेटे बाेलून सभेसाठी आणले हाेते. ‘निराधारांसाठीची याेजना बंद हाेणार आहे. ती सुरू राहावी यासाठी सभेला माेठ्या प्रमाणावर यायला हवे,’ असे कारण देत गर्दी जमवण्यात आली. त्यासाठी प्रत्येकाला ३०० रुपये ते ५०० रुपये देण्यात आले हाेते,’ अशी माहिती समाेर आली आहे.

  सिंचनाच्या कामात काँग्रेस : राष्ट्रवादीने महाराष्ट्राची माेठी लूट केली हे लाेक अजून विसरलेले नाहीत. त्यामुळे इथले सिंचन प्रकल्प रखडले. विदर्भातील दुष्काळ ही काँग्रेसचीच देण आहे, त्यावर मात करण्यासाठी तुमचा चाैकीदार पूर्णत: कटिबद्ध आहे.

Trending