आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी : घोटाळ्याचे सिंचन करणाऱ्यांपासून दूर राहा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कलम ३७० आणि ३५ ए हटवल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील भ्रष्टाचार, दहशतवाद संपुष्टात आला. काँग्रेस दहशतवाद्यांना वाचवायचा का प्रयत्न करते असे प्रश्न करत, या पक्षांपासून सावध राहा, यांना जनतेची पर्वा नाही. यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची घोषणा केल्यापासून नकारात्मक बोलण्यास सुरुवात केली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईत केला. महायुतीने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री दिला. हे ५० वर्षांनंतर झाले. तसेच पुढील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील यावरही शिक्कामोर्तब केले.  सिंचनाच्या नावावर राज्यात घोटाळ्यांचे सिंचन केले. त्यांना दूर ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.वांद्रेतील बीकेसी मैदानात महायुतीच्या प्रचाराची सभा झाली. मोदी यांंची ही राज्यातील शेवटची प्रचार सभा होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस या वेळी उपस्थित होते.

रेड टेपिझमऐवजी रेड कार्पेटला वाव
मोदी म्हणाले, पक्के घर, वीज, पाण्याची सुविधा, शौचालय, गॅस कनेक्शन व ५ लाखांपर्यंत मोफत उपचार या गरिबांसाठीच्या योजना सुरू केल्या. आज जॉब क्रिएटरचा सन्मान करणारे सरकार आहे. त्यामुळे रेड टेपिझमऐवजी रेड कार्पेटला वाव देतोय. आम्ही सफाई अभियानाची सुरुवात केली असून काही जण दिल्लीच्या तुरुंगात आहेत, तर काही जण मुंबईच्या. बेइमानी करणाऱ्यांना कोणी वाचवू शकणार नाही आणि आम्ही त्यांना सोडणारही नाही.

मिर्चीसोबत‌ व्यापार...
मोदी म्हणाले, आम्ही बिल्डर-माफियांवर वचक बसवला. रिअल इस्टेट क्षेत्रात रेरा आणल्याने सामान्य माणसाची फसवणूक टळली. आमचे सरकार आल्यापासून मुंबईत एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. कारण त्यांना ठाऊक आहे असे काही केले तर त्याचे पुरेपूर उत्तर दिले जाईल. बालाकोट आणि सर्जिकल स्ट्राइक हे फक्त शब्द नाहीत. आता काही जण मिरचीचा व्यापार करत आहेत, तर मिर्चीसोबतही व्यापार करत आहेत, अशी टीकाही त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचे नाव न घेता केली.