आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज मोदींचा शपथविधी; शिवसेनेला 2 मंत्रिपदे, राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात चौथ्यांदा सोहळा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - १७ व्या लोकसभा निवडणुकीतील भाजपप्रणीत एनडीएच्या मोठ्या विजयानंतर नरेंद्र मोदी गुरुवारी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. शपथविधी सोहळा सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. मोदी यांच्यासह अनेक मंत्री शपथ घेतील. या वेळी या सोहळ्यासाठी ८००० पाहुणे येण्याच्या शक्यतेतून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोहळ्यास बिम्स्टेक देशांचे प्रमुख, व्हीव्हीआयपी आणि देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले आहे.  प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला निर्णय बदलत या सोहळ्यास येणार नाही, असे सांगितले आहे. बंगालमधील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आमंत्रण देण्यावरून ममता यांनी सोहळ्यास न जाण्याचा निर्णय घेतला. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हेही या सोहळ्यास येणार नाहीत. 

 

जदयू, शिवसेनेचे प्रत्येकी दोन मंत्री शक्य  
मंत्रिमंडळ ६५ जणांचे राहील. भाजपतील बडे नेते त्यात राहतील. जदयू आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. यात एक कॅबिनेट, तर एक स्वतंत्र प्रभाराचे पद राहील. अकाली दलाला एक कॅबिनेट, अपना दलातून अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपद मिळू शकते. 

 

‘त्या’ भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आमंत्रण  

मोदी यांच्या शपथविधीसाठी प. बंगालमध्ये  हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या जवळपास ७० कुटुंबीयांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यांना बुधवारीच राजधानी एक्स्प्रेसमधून नवी दिल्लीला पाठवण्यात आले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अनेक वेळा दावा केला होता की, तीन वर्षांत १०० पेक्षा जास्त भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. 

 

मंत्रिपद नको, अरुण जेटलींचे मोदींना पत्र 
 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी यांना पत्र पाठवले आहे. आपल्याला मंत्रिपद नको, अशी विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे. मागील १८ महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे जबाबदारी पार पाडू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

 

ठाकरे शपथविधीला उपस्थित राहणार; देसाई, सावंत मंत्रिपदाच्या शर्यतीत
भाजपकडून घटक पक्षांना सत्तेत योग्य तो वाटा दिला जाणार आहे. त्यानुसार शिवसेनेला दोन मंत्रिपदे दिली जातील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत हे गुरुवारी शपथविधीला उपस्थित राहतील. गुरुवारी अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांचा शपथविधी होऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.