आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी V/S ममता : ममता यांचा सत्ताग्रह, दुसऱ्या दिवशीही ममतांचे धरणे, 16 राज्यांतील 21 पक्षांचा पाठिंबा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता/ नवी दिल्ली - सीबीआयच्या माध्यमातून मोदी सरकारच्या विरोधात प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या सत्याग्रह आंदोलनाचे पडसाद सोमवारी दिल्ली आणि १६ राज्यांच्या राजधानीत उमटले. दिल्लीत सीबीआयच्या मुख्यालयाशिवाय संसद, सर्वोच्च न्यायालय, गृह मंत्रालय आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयात या आंदोलनाची चर्चा होती. ममता यांच्या धरणे आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम राजकारणावर दिसला. लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपविरोधी आघाडी बनवण्याची ही संधी साधत १६ राज्यांतील २१ पक्षांनी ममता यांना पाठिंबा दिला. ममता म्हणाल्या, देश आणि घटना वाचवण्यासाठी मी सत्याग्रह सुरू केला आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी संसदेत यावर म्हटले की, प. बंगालमधील दुर्दैवी घटनाक्रम पाहता, त्या राज्यात घटनात्मक व्यवस्था कोलमडली आहे. हे केंद्रीय रचनेसाठी धोकादायक आहे. ममता यांच्या आवाहनानंतर राज्यातील तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्यावर आरोप ठेवत सीबीआयचे पथक चौकशी करण्यासाठी गेले होते. सीबीआयच्या कार्यवाहीविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी धरणे आंदोलन सुरू केले. 

 

तृणमूल खासदारांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज ठप्प सर्वोच्च न्यायालय : ...तर 'त्या' अधिकाऱ्यांवर पश्चात्तापाची वेळ 
दिल्लीत... 
सुप्रीम कोर्टात सुनावणी 

सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत आरोप केले की, कोलकाता पोलिस आयुक्त पुरावे नष्ट करताहेत. यावर मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगाई यांनी, हे आरोप जर खरे निघाले तर संबंधित अधिकाऱ्यावर त्यासाठी पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असा इशारा दिला. 

 

संसदेत घाेषणाबाजी 
सीबीआयच्या कार्यवाहीविरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ झाला. कामकाज होऊ शकले नाही. तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, सपा, राजदसह काही विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब ठेवण्यात आले. संसदेत विरोधी खासदारांनी 'सीबीआय तोता है' आणि 'चौकीदार चोर है' या घोषणा दिल्या. 

 

गृहमंत्रालयाला राज्यपालांचा अहवाल मिळाला 
राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे अहवाल दिला. रविवारी सायंकाळनंतरच्या घटनाक्रमाची इत्थंभूत माहिती त्यात आहे. सूत्रांनुसार, राज्यपालांनी राज्यात घटनात्मक पेच निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. हा राष्ट्रपती राजवटीसाठी आधार ठरू शकताे. 

 

सीबीआय : नव्या संचालकांनी सूत्रे स्वीकारली 
सीबीआयचे नवे संचालक ऋषिकुमार शुक्ला यांनी सोमवारी नवी दिल्लीत पदभार स्वीकारला. सर्वसाधारणपणे, पदभार स्वीकारण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मिळतो. मात्र, कोलकात्यातील वादामुळे त्यांना दोन दिवसांतच पदभार स्वीकारावा लागला. ते मंगळवारी कोलकाता येथे जाण्याची शक्यता आहे.

 

इकडे कोलकात्यात... 
ममतांचे रात्रभर जागरण 

ममता यांच्या सत्याग्रहासाठीचे व्यासपीठ रात्रीतून अॅल्युमिनियम आणि लोखंडाचे झाले. ममतांनी रात्रभर जागरण केले. सोमवारी सकाळी तेथेच मंत्रिमंडळाची बैठक झाली. पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभही या ठिकाणीच आयोजित करण्यात आला. 

 

हायकाेर्टात याचिका 
कोलकाता पोलिस आयुक्तांची चाैकशी करण्याचा प्रयत्न करण्याच्या सीबीआयच्या कार्यवाहीच्या विरोधात प.बंगाल सरकारने कलकत्ता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सरकारने त्यावर तत्काळ सुनावणीची मागणी केली होती. मात्र हायकोर्टाने त्यावर त्वरित सुनावणीस नकार दिला. आता या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होईल. 

बातम्या आणखी आहेत...