आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे सांगा, त्यांना सुधारू : पंतप्रधान मोदी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसदेत गैरहजर राहणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना कडक शब्दांत फटकारले. रोस्टर ड्यूटीवर सभागृहात हजर न राहणाऱ्या मंत्र्यांची नावे रोज सायंकाळी मला कळवा. ते स्वत: सुधारले नाही तर त्यांना आम्ही सुधारू, असा इशारा त्यांनी दिला. 


मंत्र्यांवरील पंतप्रधानांची नाराजी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत समोर आली. एकाच महिन्यात गैरहजेरीबद्दल नाराजी व्यक्त करण्याची मोदी यांची ही दुसरी वेळ आहे. काही दिवसांपूर्वी दांडी मारणाऱ्या खासदारांनाही मोदींनी चांगलेच फटकारले होते. सभागृहात उपस्थित राहण्याचा सल्ला केवळ खासदारांसाठी नव्हे तर मंत्र्यांसाठीही लागू होतो. रोस्टर ड्यूटीचे पालन काटेकोरपणे करावे, असे सांगताना मोदी म्हणाले, प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचे योग्य प्रकारे पालन केले पाहिजे. काही बैठकांमध्ये खासदार व मंत्र्यांची अनुपस्थिती स्पष्टपणे दिसून आली होती. त्यामुळे हे प्रकरण समोर आले आहे. दुसरीकडे सरकारच्या विधायक विषयपत्रिकेसाठी गरज भासल्यास अधिवेशनाचा कार्यकाळदेखील वाढवला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. 


भाजप खासदार संख्येपेक्षा कमी मते
सोमवारी लोकसभेत एनआयए विधेयकावरील चर्चेत एमआयएमचे नेते आेवेसी यांनी मतविभाजनाची मागणी केली होती. विरोधी पक्षाने पाठिंबा देऊनही विधेयकाच्या बाजूने २७८ मते पडली होती. ही संख्या भाजपच्या खासदारांच्या संख्येपेक्षा (३०३) कमी आहे. भाजपचे ६० खासदार गैरहजर होते, हे त्यामागील कारण ठरले. गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत या घटनाक्रमाचा अहवाल मोदींपर्यंत गेला होता. रोस्टरच्या नियमानुसार एका दिवसात तीन मंत्र्यांची ड्यूटी असते. 


हेमा म्हणाल्या, नातीच्या बारशासाठी गेले होते.. 
गेल्या काही बैठकांना गैरहजर राहणाऱ्या खासदारांचा अहवाल मोदींनी मागवला होता. त्यात ५७ खासदारांनी उत्तर पाठवले. त्यात ते विधेयकाची माहिती झाली तेव्हा लोकसभेची दारे बंद झाली होती, असे उत्तर दिले. मी एम्सला गेलो होतो. तेथून परतण्यास विलंब झाला, असे आग्र्याचे खासदार एस.पी. सिंह बघेल यांनी सांगितले. मी नातीच्या नामकरणासाठी गेले होते. हा कार्यक्रम मुंबईत होता. त्यामुळे मला हजर राहता आले नव्हते, असे हेमा मालिनी यांनी म्हटले. मतदारसंघातील एका कार्यक्रमात होतो, असा दावा वरुण गांधी यांनी केला. या विधेयकाची माहिती नव्हती, असे मनेका गांधींनी सांगितले. काही खासदारांनी ग्रंथालयात होतो, अशी सबब दिली. 

बातम्या आणखी आहेत...