आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोदींच्या हुकूमशाहीला गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने उत्तर द्यायला हवे' - शरद पवारांचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवारांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून यात्रेची सुरुवात करण्यात आली. - Divya Marathi
शरद पवारांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून यात्रेची सुरुवात करण्यात आली.

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारच्या हुकूमशाहीला महात्मा गांधीजी यांच्या अहिंसेच्या मार्गाने उत्तर द्यायला हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केले. तर केंद्राचा नागरिकत्व सुधारणा करणारा कायदा हा देशाचा विभाजन करणारा असून, आम्ही पुन्हा एकदा महात्मा गांधी यांची हत्या होऊ देणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे बोलताना दिला.

केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री व पूर्वाश्रमीचे भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या महात्मा गांधी शांती यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेटवे येथे आज सकाळी हिरवा झेंडा दाखविला.
केंद्र सरकार हुकुमशाही नीती वापरत असल्याचा आरोप करुन दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जे काही झाले ते योग्य नव्हते. त्या घटनेचा संपुर्ण देशात विरोध होत आहे. केंद्र सरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसा तत्वाने उत्तर द्यायला हवे, असे पवार यांनी आवर्जून स्पष्ट केले.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत देशातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कागदपत्रे नसतील तर लोकांना सरकारकडून स्थानबद्ध करण्यात येईल अशी भिती आहे.माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रकाश आंबेडकर, भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह मान्यवर हजर होते.

देशात अराजकाची परिस्थिती, सरकारवर जनता नाराज

देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील जनता सरकारवर नाराज आहे. लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत. या लोकांना चांगला रस्ता दाखवण्याची गरज आहे. त्यासाठी महात्मा गांधींजींच्या अहिंसेचा मार्ग योग्य आहे. या मार्गाने आपण भारतीय संविधान वाचवू शकतो, असेही पवार म्हणाले.
 

बातम्या आणखी आहेत...