Home | Editorial | Agralekh | Mohabbat ko Mohabbat paigam!

मोहब्बत को मोहब्बत का पैगाम! (अग्रलेख)

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Feb 14, 2019, 07:41 AM IST

‘सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा’, असा आत्मविश्वास तू देतेस आणि मग त्याला वाळवंटातही ओॲसिस दिसू लागतं.

 • Mohabbat ko Mohabbat paigam!

  प्रिय,

  विखाराने व्यापलेल्या भवतालात निराशेची काजळी विळखावी अस्तित्वाला आणि सारी उमेदच हरवून जावी, असा हा काळ. अशा वेळी तू भेटतेस आणि जादू घडते. अस्तित्वाचाच भाग झालेली जणू, अशी कवचकाजळी हटू लागते, अंधाराचे जाळे फिटू लागते आणि जगणे सुंदर भासू लागते. एरव्ही रोजच्या रणांगणाने द्वेषच वाढावा, असे वातावरण. दाहकतेचा गुणाकार व्हावा, असे हे पर्यावरण. एकमेकांच्या जिवावर माणसं उठावीत, हे तर नित्याचंच. जमावानं एखाद्या माणसाला ठेचून मारावं, हेही नेहमीचं. माणसं कसं म्हणावं यांना, असा प्रश्न रोजचा. रक्त लाल साऱ्यांचं, तरी हे विभागले जातात... कधी भगव्या, कधी हिरव्या, कधी निळ्या, तर कधी आणखी कोणत्या रंगात. दुसरे रंग दिसूच नयेत, अशा रंगांधळ्यांच्या या जगात अजूनही हिरवागर्द निसर्ग बहरतो कसा नि निळीसावळी नदी दुथडी भरून वाहू कशी शकते, हेच खरं तर आश्चर्याचं. गटारीत भ्रूणांची विल्हेवाट लावणारे स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत असताना, डोळ्यात नवी स्वप्नं घेऊन नवजात अर्भक इथं अवतरतं, मुक्त आवाज दडपला जात असताना ते बोलायला शिकतं, हेही आश्चर्याचंच. सारं कोसळेल, कोसळेल असं वाटत असताना फिरून पुन्हा नवं जन्मतं, उभं राहतं. असं आहे काय? जे काही आहे, ते तुझ्यात आहे. तू आहेस म्हणून जगणं सुंदर आहे.


  कुछ बात है की हस्ति मिटती नहीं हमारी...! तूच ती गोष्ट आहेस. प्रेमाची गोष्ट. अडीच अक्षरांची गोष्ट.


  ‘सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा’, असा आत्मविश्वास तू देतेस आणि मग त्याला वाळवंटातही ओॲसिस दिसू लागतं. या प्रेमाच्या गोष्टीसाठी नसतो कोणत्याही जातीचा वा धर्माचा पाया. ज्यांच्या अंतरंगात झंकारणाऱ्या तारा, तो माणूस खरा. माणसाची ही व्याख्या केली पु. ल. देशपांडेंनी. हा आतला आवाज ज्याला ऐकू येतो, त्याला प्रेम करता येतं. म्हणून तर नौआखालीच्या रणरणत्या भूमीत अनवाणी चालण्याचं सामर्थ्य त्या महात्म्याच्या ठायी येतं. ज्यांनी आपल्यावर हल्ले केले, त्यांनाही माफ करण्याची करुणा येते. ज्यांनी होरपळ केली, त्यांना त्याच समतेच्या वाटेवरून नेण्याची संविधानिक नैतिकता बाबासाहेब म्हणूनच तर सांगू शकतात.


  प्रेम ही हळुवार, कोवळी गोष्ट खरीच, पण कठीण वज्रासी भेदणारी असाधारण ताकदही देते ती. सारं जग विरोधात उभं ठाकलं तरी तोंड देण्याची शक्ती तूच तर देतेस, प्रिय.


  ही शक्ती अनेकांना समजत नाही. कारण ते मुळी नसतातच शक्तिशाली. अशा भेकडांना प्रेमाची भीती वाटते. मग ते द्वेष पसरवू पाहतात. वेगळा विचार तुडवू पाहतात. नवं कोणी काही मांडलं तर ते दडवू पाहतात. ते कधी नाव घेतात प्रकाशाचे, तर कधी विकासाचे. पण, ज्याच्या मुळाशी तू नाहीस बये, तिथे कसला प्रकाश नि कोणता विकास? माणसांची फाळणी करणारे, भिंती बांधणारे लोक कधी कधी जिंकतातही. कधी त्यांचे रक्तरंजित हात सत्तेच्या चाव्याही फिरवू लागतात. पण, काही काळच. हिटलर वा मुसोलिनी यांनी जगावर राज्य केले नाही, असे नाही; पण जगावर अधिराज्य गाजवलं ते प्रेमाचा पैगाम घेऊन आलेल्या येशूनं, पैगंबरानं, बुद्धानं, महावीरानं, गुरुनानक आणि कबीरानं. युद्ध सोडून बुद्ध झालेल्या सम्राट अशोकानं. म्हणून तर युद्धतंत्रं आणि संहारक शस्त्रं यावर प्रगती मोजणारे देशही आज शांततेवर माणसांचं मोल मोजत आहेत. सारं विष पचवून जगाला विश्वात्मक पसायदान देणारे ज्ञानेश्वर असोत की गाथा इंद्रायणीत बुडाल्यानंतरही भेदाभेद भ्रम अमंगळ असं बजावणारे तुकाराम असोत, डंख मारणं हा विंचवाचा गुणधर्म, तर प्रेम करणं हा माझा स्वभाव, असं सांगणारे एकनाथ असोत...यांनीच तर ही वाट प्रशस्त केली. मानवी समुदायाचा पाया आहे तो हा.


  म्हणूनच, कितीही असो द्वेष, असहिष्णुता भवताली, तरी फुलं फुलतात, पाखरं गाणी गातात, कारण तू तिथं असतेस. तू म्हणजे प्रेमाची गोष्ट... तुझ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे आजचे प्रयोजन ‘व्हॅलेंटाइन डे’ हे असले तरी रोजच तर तू असतेस मनात मुक्कामाला.
  उन का जो फर्ज है, वो अहल-ए-सियासत जाने,


  मेरा पैगाम मोहब्बत है, जहां तक पहुंचे!


  हीच तर तुझी गोष्ट आहे. आपली सोबत करणाऱ्या, आपल्याला जपणाऱ्या, आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या सगळ्यांना आज सांगायला हवं... ‘आय लव्ह यू’. ढाई अक्षरांचं हे प्रेम तुमची अशीच सोबत करो, तुमच्या अंगणात ही गोष्ट अविरत, अखंड सुरू राहो, अशा शुभेच्छा देणं शक्य आहे, ते तुझ्यामुळे.


  कारण, तूच आहेस संस्कृतीचा सारांश... होय, प्रेमच आहे उद्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव!

Trending