आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्‍तासंघर्ष उडाला आकाशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकेकाळी अमेरिका-रशिया शीतयद्धातून अवकाश मोहिमांना वेग आला. आता शीतयुद्ध नाही, पण माहिती-तंत्रज्ञानात वर्चस्व मिळवण्यासाठी देशादेशांमध्ये संघर्ष आहे. अवकाशातही महासत्ता बनण्यासाठी सुरू असलेला हा  संघर्ष कशा स्वरूपाचा आहे? भारताच्या चांद्रयान - २ मोहिमेला होत असलेल्या विलंबाशी याचा काय संबंध आहे? महासत्तेची लालसा बाळगणाऱ्या भारताचे या संघर्षातले नेमके स्थान काय आहे, याचे चित्र स्पष्ट करणारा हा लेख...

 

अवकाश मोहिमांमध्ये रस घेऊ इच्छिणाऱ्यांना खट्टू करणारी ही बातमी आहे. या बातमीनुसार महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ प्रकल्प डिसेंबर २०१८ पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. या प्रकल्पात चंद्राच्या भोवती फिरणारे यान, यानातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे दुसरे यान व प्रत्यक्ष पृष्ठभागावर फिरून छायाचित्रे आणि नमुने गोळा करणारी गाडी (रोव्हर) यांचा समावेश आहे. पूर्वनियोजनानुसार हे यान यंदाच्या २३ एप्रिलला चंद्राच्या दिशेने झेपावणार होते. मात्र, आता इस्रायल भारताला मागे टाकून आपले चांद्रयान डिसेंबरमध्ये अवकाशात सोडण्याच्या पूर्ण तयारीत आहे. तसे घडले तर अमेरिका, रशिया व चीन या तीन देशांनंतर यशस्वीपणे चंद्रावर आपले यान पाठवणारा इस्रायल हा जगातला चौथा देश ठरणार आहे.  म्हणजे, ही चढाओढ  चौथ्या स्थानासाठी आहे आणि यात भारताची प्रासंगिक पीछेहाट होण्याची शक्यता आहे.
चांद्रयान-२ ही भारताच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी मोहीम असल्याने  विनाकारण चढाओढीत पुढे जाण्यासाठी ‘इस्रो’चे वैज्ञानिक कोणताही धोका पत्करणार नाहीत, हेही येथे तितकेच खरे आहे.  याला आणखी एक कारण म्हणजे, IRNSS-1H च्या गेल्या वर्षी झालेल्या ऑगस्टमधील उड्डाणात वाहतुकीवर लक्ष ठेवणारा उपग्रह त्याच्या कवचातून बाहेरच आला नाही आणि एप्रिल महिन्यात सोडलेले जी सॅट 6A  उपग्रहाचे  नियंत्रण  हातून निसटले. या लागोपाठच्या दोन अपयशी घटनांमुळे ‘इस्रो’ने सावधगिरी बाळगणे साहजिक आहे.

 

हे तर एव्हाना सर्वांना ज्ञातच आहे की, चांद्रयान-२ हा संपूर्ण भारतीय प्रकल्प आहे. चंद्राभोवती घिरट्या घालणारे यान, चंद्रावर उतरणारे दुसरे यान व शंभर मीटर क्षेत्रामध्ये फिरणारी सहा चाकांची रोव्हर गाडी चौदा दिवस (पृथ्वीवरचे चौदा दिवस म्हणजे एक चंद्र दिवस.)  चंद्रावर राहणार आहे. हे यान चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे काढून दर पंधरा मिनिटांनी पृथ्वीकडे पाठवणार आहे. अर्थात, चांद्रयान-२चे वाढलेले वजन ही यातली आव्हानात्मक तांत्रिक बाजू आहे.  आता GSLV Mk III(जिओ स्टेशनरी लॉन्च व्हेइकल III. याचे दुसरे नाव  ‘फॅट बॉय’ आहे.)  या  चार टन वजन उचलण्याची क्षमता असलेल्या यानातून हे प्रक्षेपण होणार आहे. यापूर्वी जीएसएलव्ही II या यानातून तीन टनाचे वजन वाहून नेले जात होते.  या उलट इस्रायलचे स्पेस X फाल्कन 9  रॉकेट हे १३०० पौंड वजन नेऊ शकते. त्याची क्षमता कम्युनिकेशन सॅटेलाइट वाहून नेण्याची आहे. चंद्रावर उतरण्याआधी ते दोन महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. चंद्रावर उतरल्यानंतर त्यातील मॅग्नेटोमीटरच्या साहाय्याने चंद्राच्या चुंबकीय नोंदी करण्यासाठीचे हे  महत्त्वाचे उपकरण आहे.

 

आजघडीला रशिया, अमेरिका, फ्रान्स, जपान, चीन, भारत, इस्रायल, इराण आणि उत्तर कोरिया  या जगातील फक्त नऊ देशांकडे पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहतील, असे उपग्रह स्वत:च्या रॉकेटमधून पाठवण्याची क्षमता आहे. २००९ पर्यंत असे फक्त सहा देश होते. या सहामध्येसुद्धा  भारताचा क्रमांक होता. वस्तुत: १९७० मध्ये ग्रेट ब्रिटनने ही क्षमता मिळवली होती, पण युरोपियन एरियनस्पेस करारामध्ये सामील न झाल्याने या यादीत ब्रिटनचे नाव नाही. आजच्या घडीला राजकीय आणि लष्करीदृष्ट्या स्वत:चे रॉकेट व स्वत:चा उपग्रह आणि स्वत:ची प्रक्षेपण यंत्रणा याचे महत्त्व खूप मोठे आहे. कारण स्पष्ट आहे. याद्वारे माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वर्चस्व राखण्याचा पर्यायाने महासत्तेचा मार्ग  प्रशस्त होत जाणार आहे. यात सध्या दोन प्रकारच्या रॉकेटचे स्थान अव्वल आहे. यातले एक रॉकेट आठ हजार किलोमीटर उंचीवर पोहोचून ध्रुवीय कक्षेतून उपग्रह स्थिर करणारे आहे. हे उपग्रह पृथ्वीभोवती घिरट्या घालून हवामानबदल, समुद्रातील बदल यांची माहिती नियंत्रण कक्षाकडे पाठवतात.  दुसरे रॉकेट ३६ हजार किलोमीटरवर स्थिर होऊन उपग्रहाद्वारे दूरसंचार, करमणूक, संदेश, इंटरनेट याची डिजिटल माहिती घेण्यास साहाय्यभूत ठरते.  याचा अर्थ, जो देश  आठ हजार किंवा ३६ हजार किलोमीटर क्षमतेचे रॉकेट पाठवेल, तो इथे ताकदवान ठरणार आहे.

 

सध्या माहिती तंत्रज्ञान हा मोठा उद्योग झाला आहे. किंबहुना, दर चार- पाच वर्षंानी अधिक क्षमतेचे उपग्रह पाठवून, त्यातून मिळालेली माहिती विकण्यातून परकीय चलन मिळवणे शक्य झाले आहे. याशिवाय वादळे, सागरी संपत्तीतील बदल, खनिजे, भूपृष्ठाखालील पाणी, पिकावरील रोग आदींच्या अद्ययावत माहितीमुळे जागतिक बाजारातील धान्य किमतीवर नियंत्रण राखणे शक्य झाले आहे. आता कित्येक लहान देशांचे उपग्रह भारतात बनतात व भारतातूनच अवकाशात प्रक्षेपित होताहेत. PSLV-C37 रॉकेटमधून १३४ उपग्रह एकाच वेळी सोडण्याचा विक्रम ‘इस्रो’कडे आहे. एके काळी आपले उपग्रह फ्रेंच गियानामधून आपल्याला सोडायला लागायचे. आज आपल्या रॉकेटमधून जर्मन , फ्रेंच , इटली या देशांचे उपग्रह आपण सोडतो. अर्थात भाडे घेऊन. भारताने नुकतेच सार्क देशांना आपल्या उपग्रहांमधून माहिती व संदेशवहनही उपलब्ध करून दिले आहे. अवकाश क्षेत्रात आपण ‘नासा’शी स्पर्धा करण्यापेक्षा लहान देशांचे स्पेस टेक्नॉलॉजीतील नेतृत्व करत आहोत. ही म्हटली तर एक जमेची बाजू आहे.

 

नुकताच प्रसिद्ध झालेल्या ‘अस्ट्रोपॉलिटिक्स’च्या खास अंकात भारताच्या अवकाश क्षेत्रातील नेतृत्वाचा उल्लेख अभिमानाने करण्यात आलेला आहे. कारण भारतीय रॉकेटने द्रव आणि घन इंधनाचा वापर करून हव्या त्या उंचीवर हव्या त्या ठिकाणी ते पाठवण्याची क्षमता विकसित केली आहे. उपग्रहासाठी आवश्यक सुटे भाग खुल्या बाजारातून जमा करायचे व उपग्रह बांधायचा, त्याच्या चाचण्या घ्यायच्या व तो पाठवायचा हे क्षेत्र ही भारतीय वैज्ञानिकांनी काबीज केले आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय संकेतांचे पालन करून होत असल्याने आज जगातले अनेक लहान देश भारताकडे आशेने पाहत आहेत. असे असले तरीही या घडीला भारत चांद्रयान मोहिमेत आघाडी मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतो आहे. चांद्रयान मोहिमेच्याच संदर्भात बोलायचे तर, अवकाश कक्षेत पोहोचल्यानंतर यानाने अचूक चंद्रावर उतरणे अत्यंत महत्त्वाचे असते. भारतातर्फे चांद्रयान मोहिमेसाठी तयार केलेल्या  यानाचे वजन १२५० वरून १३५० इतके वाढवण्यात आले आहे. तर सहाचाकी ‘रोव्हर’ अवकाश वाहनाचे वजन २० वरून २५ किलो इतके वाढवले आहे. अशा प्रसंगी ‘सॉफ्ट लँडिंग’ हे सगळ्यात मोठे आव्हान ठरणार आहे. यान आणि वाहनाला अवकाशात नेणारा उपग्रह चंद्राभोवती प्रतितास सहा हजार किमी वेगाने फिरणार आहे. इतका प्रचंड वेग असताना यान अत्यंत निर्धोकपणे उतरवणे आणि उतरवल्यानंतर लगेचच त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. चंद्रावर उतरणारे हे यान (लँडर) याआधी आपल्याला रशियाच्या ‘रॉस कॉसमॉस’ अवकाश संस्थेकडून मिळणार होते. मात्र, चीनसोबतच्या रशियाच्या मोहिमेत हे यान अपयशी ठरले. त्यानंतर रशियाने यानात आवश्यक ते बदल करणे अपेक्षित होते, त्यात खूप वेळ चालला होता. त्यामुळे ‘इस्रो’नेच स्वत:चे लँडर बनवण्याचा निर्णय घेतला. त्यातून पुढे चांद्रयान-२ मोहीम लांबणीवर पडत गेली. आता भारताच्या आधी इस्रायल ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच, अवकाश संशोधनात मोठी झेप घेतली असली, तरीही इथल्या सत्तासंघर्षात टिकून राहताना यातले महासत्तापद मिळण्यासाठी भारताला अद्याप खूप मोठी मजल गाठावी लागणार आहे.


अवकाशातली आघाडी
पृथ्वीभोवती असलेल्या एकूण अवकाश यानांपैकी एक तृतीयांश अमेरिकेने सोडलेली आहेत. अमेरिकेचे अवकाश मोहिमांसाठीचे २०१९ चे अंदाजपत्रक तब्बल १९.९ दशकोटी डॉलर्सचे आहे. अमेरिकेनंतर दुसरा क्रमांक चीनचा आहे. सध्या चीनने उपग्रह, दूरसंवेदी उपग्रह , टेहळणी उपग्रह, निकामी उपग्रह व अंतराळ कचरा गोळा करणारी यंत्रणा विकसित केली आहे. चीनचे संशोधन आणि मोहिमांसाठीचे अंदाजपत्रक १४.५ दशकोटी डॉलर्सचे आहे.  या स्पर्धेत टेहळणी व हवामान पाहणी उपग्रह सोडण्यात रशियाचा तिसरा  क्रमांक आहे. जपान स्वत:ची उपग्रह सोडण्याची यंत्रणा विकसित केलेला चौथ्या क्रमांकाचा देश आहे. तर भारताने १९७५ सालापासून ८० उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडले आहेत. भारताने अवकाश मोहिमांसाठी २०१८च्या अंदाजपत्रकात ८९३६.९७ कोटींची तरतूद केलेली आहे.  यशिवाय कॅनडा, जर्मनी, फ्रान्स आणि लक्झेम्बर्ग हे इतरही देश अंतराळ क्षेत्रात अनेक वर्षे आघाडी राखून आहेत.

 

madwanna@ hotmail.com

लेखकाचा संपर्क : ९३७०४२५८९९

बातम्या आणखी आहेत...