आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवाल-जवाबातली ‘परवीन’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहसीना सय्यद

स्त्रीसौंदर्यांचे पारंपरिक निकष मोडून पुरूष कलाकारांचं वर्चस्व असलेल्या कव्वाली गायनाच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या परवीन काचवाला. मराठवाड्यातील पहिल्या आणि मोजक्या महिला कव्वाल गायकांमधे ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं, त्या परवीनजींच्या यशाचा हा प्रवास... 
 
भारदस्त खर्जातला आवाज, टिपेपर्यंत पोहोचणारा सूर आणि गायकीत मर्दानी अंदाज. कव्वालीला आवश्यक असणाऱ्या या गोष्टी. कव्वाल गायकीची हीच वैशिष्ट्यं जपत या कलेला वेगळ्या उंचीवर पोहोचवलं ते परवीन यांनी. परवीन काचवाला, मराठवाड्यातील पहिल्या आणि एकमेव महिला कव्वाल गायिका. ‘परवीन’ चा अर्थ होतो कुशल,माहिर. त्या अर्थानं कव्वालीमधल्या सवाल जबाबात त्या खरंच ‘परवीन’ आहे.  ़

 मानवी जीवनात कला ही आनंद देणारी गोष्ट आहे. कला कुठलीही असो ती सादर करणाऱ्यालाही आनंद  देते आणि कलेचा आस्वाद घेणाऱ्यालाही. भारताला तर विविधांगी  कलांची, कलेच्या घराण्यांची अभिमानास्पद  परंपरा आहे. ‘जेव्हा घरात अठराविश्वे दारिद्र्य होते तेव्हा कव्वालीच्या कलेनंच आमच्या कुटुंबाला तारलं. वडिलांसोबत घराची जबाबदारी पेलणे मला सोपे गेले. बाबा जेव्हा कव्वालीचा रियाज करायचे तेव्हा मीसुद्धा त्यांच्यासोबत गात असते. पहिल्यांदा कव्वाली कार्यक्रमात गायले तेव्हा मी केवळ १२ वर्षांचीच होते,’ परवीन आपल्या कलेच्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगतात. 

टिपेचा स्वर आणि  बिनधास्त अदा दाखवत परवीन जेव्हा व्यासपीठावर मुकाबला करण्यासाठी बसतात तेव्हा  प्रेक्षक त्यांना वाह वाह दिल्याशिवाय राहत नाहीत. पारंपरिक मुस्लिम घराणं, रीतिरिवाज, बंधनं यापलीकडे जात जोश आणि उत्साहात कव्वाली सादर करण्याची परवीन यांची कला  कव्वालीच्या दर्दींना आवडते. घरच्या परिस्थितीमुळे त्या केवळ दहावीपर्यंत शिकू शकल्या. मात्र माणसाच्या अंगी कला आणि कमावण्याची जिद्द असेल तर माण्ूस उपाशी राहतच नाही, असे त्या मानतात. लग्न झाल्यावर परवीन यांनी मुलांकडे लक्ष देता यावे म्हणून  तब्बल १८ वर्षे कव्वालीचा कार्यक्रम केला नाही. आज त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा  बारावीत तर छोटा दहावीत आहे. सुशिक्षित आई मुलांच्या अभ्यासाबरोबर चांगले वागणे, सच्चेपणा, प्रामाणिकपणा, प्रेम आणि आणखी कितीतरी संस्कार मुलांवर घडवते. पुस्तकी ज्ञानाबरोबर समाजात वावरण्याचे धडे देते. परवीन यांनीही मुलांना शिक्षणाबरोबर विविध वाद्यं वाजवण्याचं शिक्षण दिलंय. त्यांची दोन्ही मुलंही त्यांच्यासोबत कार्यक्रमात त्यांना साथसंगत करतात. आजची स्त्री प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समाजात स्थान निर्माण करते आहे, याचेच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे परवीन काचवाला. त्यांचे पती राजू शेख व्यवसायानं ड्रायव्हर आहेत. विशेष म्हणजे पत्नीसाठी ते हार्मोनियम शिकले आहेत. आज परवीनच्या कार्यक्रमात राजू हार्मोनियमची साथसंगत करतात. राजू यांना पत्नीचा अभिमान वाटतो. परवीनजींच्या दोन्ही मुलांनाही आपल्या आईनं एका वेगळ्या क्षेत्रात ओळख निर्माण केल्याबद्दल गर्व वाटतो. 

परवीन काचवाला : वडील रशीद मोहंमद शेख आणि भाऊ गुलाम दस्तगीर शेख यांच्याकडून विरासतमधे मला ही कला मिळाली. लहानपणी मी हट्टाने वडील-भाऊ यांच्या कार्यक्रमात जायचे. मी कार्यक्रम करायला लागल्यानंतर माझे नातेवाईकही यायचे. आजही माझ्या बऱ्याच कार्यक्रमांना संपूर्ण कुटुंब येते तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो. माहेर-सासरच्या भक्क्म पाठिंब्यामुळेच हे शक्य झालेय. 

लेखिकेचा संपर्क : ८६६८७६११६५

बातम्या आणखी आहेत...