आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाच त्यांची शेती, नोकरी अन्् व्यवसायही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमुक एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही अशी आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचीच तक्रार असते. जे मिळालंय त्याकडं सोयीस्कर दुर्लक्ष करत नकारघंटा वाजवण्याचा मनुष्याचा स्वभाव. मात्र खूपशा नकारात्मकतेतही खूप काही असतं, जे जगण्याच्या संघर्षात आपल्याला बळ देत असतं... 

 

औरंगाबादच्या दौलताबादलगत एका ढाब्यामध्ये राजस्थानी लोकनृत्य पाहण्याचा योग झाला. एक ३५ ते ४० वयाची महिला घूमर नृत्य करत होती. डोक्यावर ८ ते १० किलो वजनाचे भांडे एकावर एक मांडलेले होते. लोक दाद देत होते. पण माझे लक्ष त्याच मंचावरील एका कोपऱ्याकडे अधिक होते. तेथे १३- १४ वर्षांची मुलगी मांडी घालून अभ्यासात मग्न होती. महिलेच्या डोक्यावरील भांडे सरकल्यासारखे वाटले की ती पटकन वही, पेन बाजूला सारून मंचावर यायची आणि त्या महिलेसोबत नृत्याचा ठेका धरायची. त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष तिच्याकडे जायचे. महिलेने भांड्यांचा तोल सांभाळल्याचे लक्षात येताच पुन्हा अभ्यासाकडे वळायची. माझे डोळे त्या मुलीवरच खिळले होते. पाच-सात मिनिटांनंतर महिलेचे नृत्य संपले. ती मुलगी मंचावर आली. तिच्या हातात ग्लास होता. तिने एक सुई ग्लासातील वाळूत रोवली. तो ग्लास आपल्या पाठीमागे ठेवला. पुढे सरकून संपूर्ण शरीर पूर्णपणे वाकवून डोळ्याच्या पापणीने ती सुई उचलली. नंतर याच ग्लासातील ब्लेडही उचलली. टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याचा आनंदाने स्वीकार करत ती मुलगी पुन्हा अभ्यासाकडे वळाली. मग मला राहवेना. ही मुलगी कोण, या महिलेशी तिचे नाते काय? ती अशी मंचाच्या एका कोपऱ्यात अभ्यास का करत बसली आहे, असे प्रश्न मला पडले. मी तिच्याकडे पोहोचले आणि तिने आपल्या वहीत काय लिहिले हे पाहू लागले. तेवढ्यात ती महिलाही तिथे आली. मग गप्पांच्या ओघात ढाबा संस्कृतीवरील कलावंत महिलांचे जग, त्यांचा संघर्ष आणि हार न पत्करता लढणं हे सारं उलगडत गेलं.  


ती महिला म्हणजे खुशबू. तिचे हिंदी मोडके-तोडके. मुलीचे नाव सुंदर. तिचे हिंदी अप्रतिम. ती औरंगाबादच्याच एका शाळेत शिक्षण घेतेय. सुंदर सांगते, आम्ही मूळ राजस्थानचे. जयपूरमध्ये पोटापाण्याची सोय नसल्याने आई-वडील औरंगाबादला आले. त्यांच्यासोबत मीही. मी सकाळी शाळेत जाते आणि सायंकाळी आईला नृत्यासाठी मदत करतेे. स्वत:बद्दल सांगताना सुंदर आईला ‘तुम्हे पता है यह दीदी क्या पूछ रही है’ असे राजस्थानी भाषेत सांगत होती. आईलाही बोलते करण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळानंतर खुशबूही बोलू लागल्या. त्या म्हणाल्या, मी केवळ आठ हजार रुपयांत येथे काम करते. मुलीला शिक्षणाची आवड आहे. म्हणून तिला शाळेत पाठवले आहे. पण केवळ शिक्षणानेच जीवन सुखकारक होईल, असे मला वाटत नाही. म्हणून माझ्यातील नृत्याची कलाही तिला शिकवतेय. ती माझ्यापेक्षा सरस आहे. त्यामुळे नोकरी मिळाली नाही तरी कला तिला उपाशी राहू देणार नाही. शेवटी नृत्यातील कौशल्य हीच आमची शेती, आमची नोकरी आणि आमचा व्यवसाय आहे.  

 

शिक्षणाशिवाय पर्याय नाही
खुशबूंनी सुंदरला कालबेलीया, घूमर नृत्य, कठपुतली, भोपा, चांग, तेराताली, घिंद, कछछोघरी, तेजजाजी आदी पारंपरिक नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे. कलेतून पोट चालत असल्याने शिक्षण कशाला, असा त्यांचा दृष्टिकोन नाही. मुलगी शिकली, प्रगती झाली, यावर माझा प्रगाढ विश्वास आहे. म्हणून तिला कधीही शिक्षणापासून रोखणार नाही, असे खुशबू म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...