आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेहिते पिता-पुत्रांची भाजपशी जवळीक; आमदारकी-खासदारकीपासून दूरच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजू मुलाणी 

अकलूज - भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देत पुनर्वसन केले. मात्र साेलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांची भाजपशी जवळीक वाढूनही व त्यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते यांनी थेट पक्षात प्रवेश करूनही यापैकी ना कुणाला लाेकसभेचे तिकीट मिळाले ना विधानसभेचे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर माेहितेंना महत्त्वाची पदे दिली जाणार असल्याचा शब्द पक्षनेतृत्वाकडून मिळाला असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

लोकसभा निवडणुकीच्या ताेंडावरच माेहितेंनी राष्ट्रवादी साेडून भाजपशी जवळीक साधली. २०१४ च्या निवडणुकीत माेदी लाटेतही माढ्यातून विजयसिंह राष्ट्रवादीचे खासदार झाले हाेते. आता २०१९ च्या निवडणुकीत माढ्यातून भाजप त्यांना उमेदवारी देईल, अशी आशा हाेती. मात्र काँग्रेसमधून आलेले साताऱ्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली. मोहितेंनी त्यांनाही निवडून आणले. विधानसभेला रणजितसिंहांना तिकीटाची अपेक्षा हाेती. मात्र त्यांचा माळशिरस राखीव असल्याने किमान माेहिते सांगतील ताे उमेदवार भाजप देईल, असे वाटत हाेते. मात्र तसेही झाले नाही. आता या निवडणुकीनंतर माेहिते पिता-पुत्रांपैकी एकास राज्यसभा, दुसऱ्याला राज्यात मंत्रिपद मिळू शकते, असे म्हटले जात आहे.
 

काय मिळाले : कृष्णा-भीमा स्थिरीकरण, कारखान्यास कर्ज
१. मोहिते पाठपुरावा करत असलेला कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून त्यांना मिळाले. 
३. रणजितसिंह यांनी सदाशिवनगर येथील बंद अवस्थेत असलेला साखर कारखाना ताब्यात घेतला आहे. तो सुरू करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून २५० कोटींचे कर्ज मंजूर. 
४. अकलूज येथे नगरपालिका आणणे, महाळुंग व नातेपुते येथे नगरपंचायती करणे हे महत्त्वपूर्ण निर्णय भाजप शासनाकडून अपेक्षित आहेत.
२. नीरा देवधर धरणाचे बेकायदेशीरपणे पवार कुटुंबीयांच्या बारामती मतादारसंघाकडे वळवलेले पाणी नीरा उजवा कालव्याकडे वळवण्यात भाजपने मोठे सहकार्य केले आहे.
 

पवारांकडून खच्चीकरण, चाैकशीची धास्ती?
पवारांनी माेहितेंचे खच्चीकरण केल्याचे म्हणतात. अजित पवार यांनी मोहितेंचे जवळचे नेते बाजूला सारले. लाेकसभेच्या वेळीही माढ्यात माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारीची तयारी करायला लावली. नंतर शरद पवारांनी स्वत: लढण्याची तयारी दर्शवली व माेहितेंना खेळवत ठेवले. यामुळे वैतागलेल्या मोहितेंनी भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला. तर स्वत:च्या ताब्यातील संस्थांमधील अनियमिततेच्या चाैकशा टाळण्यासाठी माेहितेंनी सत्ताधारी पक्ष जवळ केला, असा आराेप त्यांचे विराेधक करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...