Accident / मोहोळ : शिवशाही बस व ट्रकचा अपघात, एका माजी सैनिकाचा मृत्यू; अकरा जण जखमी

अपघातामध्ये एक माझी सैनिक ठार, तीन जणांची प्रकृती चिंताजनक

Aug 30,2019 01:33:00 PM IST

भारत नाईक
मोहोळ - तालुक्यातील शेटफळ गावच्या हद्दीत आज पहाटे मुंबईकडून हैदराबादकडे निघालेल्या मालट्रकला पाठीमागून येणाऱ्या शिवशाही बसने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये एक माझी सैनिक ठार झाले असून अकरा जण जखमी झाले आहेत. यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मलिकार्जुन सिद्रामप्पा अंबुसे वय.७२ असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे.


याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,महमद मौला महमद हैदरसाब रा.फेलखाना हैदराबाद हा ट्रक चालक क्र.एम.पी.०९/एच.जी.२२५८ मुंबईकडून हैदराबादकडे घेऊन येत होता. पहाटे ४.०० वा. पुणे ते सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर मौजे शेटफळ गावाच्या हदीत, संतोष चोरमले यांच्या शेतासमोर आल्यानंतर पाठीमागून आलेल्या शिवशाही एस.टी.बस (नं.एम.एच.४७/ वाय.२०५०) ने ट्रकला जोराची धडक दिली त्यामध्ये शिवशाही बस समोरचा भाग चक्काचूर झाला.


शिवशाहीच्या वाहक चालकासह इतर नऊ ते दहा प्रवासी जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना शिवशाही बस मधून बाहेर काढले व उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. मात्र मलिकार्जुन सिद्रामप्पा अंबुसे रा.४२ अ माजी सैनिक विजापुर रोड,सोलापुर हे माजी सैनिक गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले. त्यांच्या पश्चात भाऊ,पत्नी,एक मुलगा, दोन विवाहित मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.


अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अपघात पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश शिंदे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. या अपघाताची खबर ट्रक चालक मोहम्मद हैदरसाब यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास मोहोळ पोलिस करत आहेत.

X