Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | molestation of girl while talking on phone on the terrace of building

इमारतीच्या गच्चीवर माेबाइलवर बाेलत असताना युवतीचा विनयभंग

प्रतिनिधी | Update - Sep 11, 2018, 11:25 AM IST

इमारतीच्या गच्चीवर मोबाइलवर बोलत असलेल्या तरुणीला पाठीमागून येऊन तिचे डाेळे दाबत तिचा विनयभंग केला.

 • molestation of girl while talking on phone on the terrace of building

  नाशिक- इमारतीच्या गच्चीवर मोबाइलवर बोलत असलेल्या तरुणीला पाठीमागून येऊन तिचे डाेळे दाबत तिचा विनयभंग केला. या प्रकाराने भांबावलेल्या तरुणीने आरडाओरड केल्याने संशयिताने तिच्या पायावर लाथ मारून तिला जखमी केले. रविवारी (दि. ९) सायंकाळी ६ वाजता इंद्रप्रस्थ परिसरातील एका इमारतीच्या छतावर हा प्रकार घडला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


  पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, चार-पाच मैत्रिणी या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये राहतात. एका खासगी वास्तुविशारदाकडे या तरुणी काम करतात. सुटी असल्याने तरुणी घरीच होती. सायंकाळी ६ वाजता इमारतीच्या टेरेसवर फोनवर बोलत असताना अचानक गॅलरीतून सफेद रंगाचा टी-शर्ट घातलेल्या तरुणाने पाठीमागून येऊन तिचे डोळे दाबले. आरडाओरड केल्याने तोंड दाबले. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने पायावर लाथ मारून तिला जखमी केले. जोराने ओरडल्यानंतर संशयिताने गॅलरीमधून पलायन केले. पीडितेने मैत्रिणीसाेबत पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला मात्र काही माहिती पुढे आली नाही. वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


  पोलिसांकडून तक्रारीची वाट
  छेडछाडीचे प्रकार काही नागरिकांकडून पोलिसांना कळवले जातात. मात्र पोलिसांकडून या तक्रारदारांची उलटतपासणी केली जात असल्याने तक्रार देण्यास कुणी पुढे येत नाही. पोलिस अधिकाऱ्यांकडून हद्दीचा मुद्दा पुढे करत टवाळखोरांवर कारवाई न करता या प्रकारांकडे डोळेझाक केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.


  विनयभंगाचे दोषारोपत्र २४ तासात
  राज्याच्या तत्कालीन पाेलिस महासंचालकांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशान्वये दोन वर्षापूर्वी गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनयभंगाच्या गुन्ह्यात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र यानंतर या कारवाईचा यंत्रणेला विसर पडल्याचे जाणवत आहे.


  या घटनांमुळे महिला, युवती असुरक्षित
  कंपनीतील कामगार महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग करत तिच्या भावाला मारहाण करण्यात आली. घरात घुसून महिलेचा विनयभंग, उपनगर परिसरात एका महाविद्यालयात अकरावीच्या मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग, एकतर्फी प्रेमातून पाठलाग करून आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत प्रेमाची मागणी करत भररस्त्यात विनयभंग, शालेय मुलीला निर्जनस्थळी नेत मस्ती जिरवण्याची धमकी अशा विविध घटनांमध्ये महिला व युवती असुरक्षित आहेत. आता इमारतीमध्येही महिला व युवती असुरक्षित असल्याचे घडलेल्या या प्रकाराने जाणवत आहे.


  असुरक्षितेत वाढ
  महिला, युवती व मुलींना शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, कंपनी परिसर, घर परिसरात सार्वजनिक ठिकाणी जाताना असुरक्षित वाटते. या परिसरात टवाळखोरांच्या टोळक्यांकडून छेडछाडीचे प्रकार घडत असल्याने रस्त्याने जाताना असुरक्षित वाटते.


  निर्भया, मर्दानी पथक उरले नावाला
  छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी मर्दानी, निर्भया पथकाची निर्मिती केली. मात्र, नव्याच्या नऊ दिवसांप्रमाणे हे पथक औटघटकेचे ठरले. महिला सुरक्षा पथकाकडून केवळ कौटुंबिक प्रकरणांमध्ये मदत केली जात असल्याची माहिती या शाखेच्या वतीने देण्यात आली.


  गस्तीचा अभाव
  शाळा, महाविद्यालय बसस्थानक, कंपनी परिसरात पोलिसांची गस्त होत नसल्याने टवाळखोरांचा उद्रेक वाढला आहे. पोलिस ठाणेनिहाय बीट मार्शलच्या गस्तीचा अभाव असल्याने महिलांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे.

Trending