आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समांतर रंगभूमीवरचे एक ध्यासपर्व...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोनालिसा वैजयंती विश्वास  

समांतर रंगभूमीवरचं एक ध्यासपर्व, ज्यांनी समांतर नाटकांना आपली हक्काची जागा, निवारा, एक घरटं फक्त मिळवून दिलं नाही, तर त्याचं संगोपन आणि जतनंही केलं, असे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे चार दिवसांपूर्वी निधन झाले. ‘स्पर्शज्ञान’ च्या दोन वर्षांपूर्वीच्या "ब्रेल' दिवाळी अंकात काकडे काकांची एक दीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली होती. डोळस वाचकांनीही ही मुलाखत वाचावी म्हणून या मुलाखतीचा हा संपादित अंश...
१३ जुलै २०१९. चेतना महाविद्यालयातील संध्याकाळ. "इन्शाअल्लाह' चा प्रयोग होता. त्या दिवशी हॉलमध्ये पोहोचले तर नेहमीप्रमाणे एका खुर्चीत बसून अरुण काकडे काका प्रयोगाची तयारी कुठवर आलीय हे पाहण्यात मश्गूल होते. जाऊन मी नमस्कार केला. तर हातात हात घेऊन म्हणाले, ‘‘अगं आहेस कुठे, पुढच्या महिन्यात दोन प्रयोग लावतोय असणारेस ना? तसं संतोषला सांग.’’ ही त्यांची भेट शेवटची असेल असे वाटलेही नव्हते. तंेडुलकरांच्या आठवणीत काकडे काकांनी ‘आठवण तेंडुलकरांची’ हा एक लेख लिहिला होता. ज्याचा शेवट करताना काका म्हणतात, काय होतं आपलं तेंडुलकर ‘जाताना?’ कारण आता मीही त्याच मार्गावरून येणार आहे. तुमच्या मागोमाग... केव्हा ते काळ ठरवेल. पण मनापासून वाटतं, मनाची अशी काही अवस्था होण्याआधीच कार्य करता करताच इच्छामरण यावं... रंगभूमीवर... शंकर घाणेकरांसारखं!

मी जेव्हा काकांची मुलाखत घेतली तेव्हा "आविष्कार'चा डोलारा तुमच्यानंतर कोण सांभाळणार, या संदर्भात कुठला चेहरा आहे का समोर? या प्रश्नावर काका फक्त मिश्कील हसले होते. कालपासून कोणाचा बाप, कोणाचा मित्र, कोणाचा मार्गदर्शक गुरू तर प्रायोगिक/समांतर रंगभूमीचा खंदा पुरस्कर्ता आपल्यातून निघून गेलाय. कदाचित दुसरे काकडे काका निर्माण होतीलही, पण अहंकाराच्या अनेकानेक चवींना पचवून हाती घेतलेलं प्रायोगिक चळवळीचं काम अव्याहतपणे करणारे काकडे काका होणे शक्य नाही. नाटकांत वेगवेगळे प्रयोग राबवत राहणे, हीच काकांना खऱ्या अर्थाने वाहिलेली आदरांजली असेल.

ही मुलाखत २०१७, “स्पर्शज्ञान” च्या ब्रेल दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली आहे. ती डोळस वाचकांनीही वाचावी हा मानस...

> प्रश्न - काका, तुमच्या मते प्रायोगिक रंगभूमी म्हणजे काय?
उत्तर - नाटक म्हणजे काय तर अभिनयातून प्रेक्षकांना दिलेला संदेश. समाजाच्या भावभावनांचे अंतरंग उलगडून दाखविणारी कला. खऱ्याचा आभास निर्माण करणारी सिद्धी. स्वत:च्या भावभावना बाजूला ठेवून परकाया प्रवेश करून त्या पात्राची अभिनय सादरीकरणाची कला. भूत, वर्तमान, भविष्यात घडलेल्या किंवा घडू शकलेल्या गोष्टींची मांडणी करणे म्हणजेच नाटक. नवरसांची अतिशय सुंदर संगम असणारी कलाकृती म्हणजे नाटक. गोष्ट, मनोरंजन, हावभाव, अभिनय, कला, वेशभूषा, आवाजाचा चढ-उतार, विषयाची मांडणी, संस्कृतीचे दर्शन, कल्पना भाषेत व्यक्त करणे म्हणजे रंगभूमीचा अाविष्कार होय. खरे तर नाटक विषय, आशय, कथा, पटकथा आणि संवाद या मूल-घटकापासून बनते. रंगभूमीचे साधारणपणे बालरंगभूमी, हौशी रंगभूमी, प्रायोगिक किंवा समांतर रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी असे प्रकार पडतात. पण ही व्याख्या कशावरून ठरवायची? तिकीट आकारून प्रयोग सादर केला तर तो प्रयोग, ते नाटक व्यावसायिक नाटक, अशी शासनाने व्यावसायिक नाटकाची, व्यावसायिक रंगभूमीची केलेली व्याख्या आहे. पुन्हा हे सब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे अमुक एक अशी प्रायोगिक रंगभूमीची व्याख्या करता येत नाही. कारण आम्ही तिकीट आकारून प्रायोगिक नाटकांचे प्रयोग करतोच आहोत. मराठी रंगभूमीचा इतिहास पाहिला तर पूर्वी संगीत नाटकं होती. संगीत नाटकांच्या उतरत्या काळात स्थित्यंतर घडून गद्य नाटकं आलीत. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात एक नवी पिढी जन्माला आली, ज्यांनी पाश्चात्त्य रंगभूमीचा अभ्यास केला होता. या सगळ्या सुशिक्षित लोकांनी नव्या नाटकाचा ध्यास धरला, सन १९५४ साली महाराष्ट्र शासनाने नाट्यस्पर्धा सुरू केल्या. त्यामुळे नवीन नाटकं लिहायला लोक उद्युक्त झालीत. अत्रे, कानेटकर, यांच्या लिखाणाचा कॅन्व्हास या नव्या नाट्यलेखकांनी मोठा केला. नाटकात प्रयोगशीलता असणे म्हणजे, केवळ संहितेत नाही तर नेपथ्य, प्रकाशयोजना, सादरीकरण अशा सर्वांतच प्रयोग करत राहणे, हे प्रायोगिक रंगभूमीचे विशेष आहे.

> प्रायोगिक रंगभूमीची गरज का भासली? 
उत्तर - कुठल्याही क्षेत्राचा जर विकास व्हायचा असेल तर त्यासाठी ‘रिसर्च अँड डेव्हल्पमेंट’ गरजेचे आहे. रिसर्च म्हणजे संशोधन म्हणजेच प्रयोग होणे गरजेचे आहे. याला मराठी रंगभूमीदेखील अपवाद नाही. मराठी रंगभूमीचा कायापालट झाला, विकास झाला, तो का झाला तर या प्रयोगशीलतेमुळेच झाला. उदाहरण म्हणजे सुषमा देशपांडे यांचं ‘बया दार उघड’ या नाटकाचं देता येईल. सुषमा देशपांडेंनी भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन संपूर्ण स्त्री संतांच्या चरित्राचा अभ्यास केला. आणि अशा प्रकारे एक नवीन नाटक जन्माला आलं. दुसरं उदाहरण म्हणजे सुधीर पटवर्धन यांनी काढलेल्या चित्रांवरील ‘यह कौन चित्रकार है’ असं नाटक मराठी रंगभूमीवर झालेलं नाही. चाकोरी सोडून जेव्हा आपण वेगळ्या वाटा शोधायला लागतो, ते नव्या वाटा शोधणं हेच प्रयोगशीलतेचं लक्षण आहे. प्रदीप मुळे यांनी ‘मऊ’ नावाचं नाटक केलं. लेखन आणि सादरीकरण यात त्यांनी वेगळे प्रयोग केले. मराठी रंगभूमीचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की नारायण काळे, केशवराव दाते, ज्योत्स्ना भोळे यांनी एकत्र येऊन ‘आंधळ्याची शाळा’ हे नाटक उभे केले. प्रायोगिक रंगभूमीच्या चळवळीतला हा मला माइलस्टोन वाटतो. मामा वरेरकर यांनी ‘भूमिकन्या सीता’ हे गंभीर आशयाचे नाटक लिहिले. सीतेला रामाने अग्निदिव्य करायला सांगितले, म्हणजे रामाचा अविश्वास होता सीतेवर असं आपण म्हणतो, पण तसं नाहीये ते. या नाटकात सीता रामाला प्रश्न करते... म्हणजेच पारंपरिक विषयातून एका नव्या प्रयोगाचा जन्मच झाला होता. चळवळीची गरज म्हणशील तर आशय, विषय, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, पार्श्वभूमी, सादरीकरण यातील तोचतोचपणा, साचलेपणा, तीच चाकोरी मोडायला या चळवळीची गरज होती. या प्रयोगशीलतेमुळे, या संशोधनामुळेच मराठी रंगभूमीचा विकास झाला आहे.
 

> चळवळीचं यश-अपयश याबाबत काय सांगाल?
उत्तर - चळवळीला यश येतंच असं नाही. यश-अपयश पचवून आम्ही गेली ५०-६० वर्षे कार्यरत राहून प्रायोगिक रंगभूमीचा इतिहास रचत आहोत. प्रयोग केला तर तो यशस्वी होईलच याची शाश्वती देता येत नाही. प्रयोग फसतो, पण मग या फसलेल्या प्रयोगातूनच चुका सुधारता येतात. त्यासाठी प्रयोगशीलतेची कास धरणं मला अत्यावश्यक वाटतं. या सगळ्या प्रक्रियेत ‘प्रेक्षक’ महत्त्वाचा घटक आहे. पूर्वीचा प्रेक्षक होता तो विशिष्ट विषयांची, विशिष्ट बाजाचीच नाटकं पाहणारा होता, जसे की संगीत नाटक. पूर्वी संगीत नाटकांना प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असायची. कालांतराने एकूणच नाटक या कला प्रकारात वेगवेगळे प्रयोग केले गेले. त्यामुळे संगीत नाटक एके संगीत नाटक हे समीकरण बाद झालं. नाटकांचे विषय, आशय यात वैविध्य आल्याने प्रेक्षकही सुजाण झालेते व ते या वेगवेगळ्या नाट्यप्रकारांकडे आपला कल वाढवू लागले.
 

> प्रायोगिक रंगभूमीचं काम व्यक्तिप्रधान असावं की संस्थाप्रधान?
उत्तर - काहींचं म्हणणं ते व्यक्तिप्रधान असावं तर बाकीच्यांचं म्हणणं हे चुकीचं आहे. या प्रकारच्या कामात संस्थाप्राधान्यच असायला हवं. व्यक्ती काय येतील... जातील. पण संस्था म्हटली की एक प्रवाह वाहत राहतो. तो महत्त्वाचा असतो. याचा परिणाम म्हणजे ‘रंगायन’च्या काळात या दोन्ही विचारांचा सुवर्णमध्य साधला गेला. ६६-६७च्या दरम्यान विजयाबाई परदेशी गेल्या. ‘रंगायन’मध्ये पोकळी निर्माण झाली. ‘शांतता’पासूनच मला वाटतं विजया व अरविंद यांच्यात थोडीथोडी दरी निर्माण होऊ लागली होती. ‘शांतता’चे प्रयोग लागले तशी दरी वाढू लागली. आता जवळजवळ दोन तट पडले होते. कुणीतरी रंगायनच्या बाहेर जायला पाहिजे. पण कुणी? वाद रंगायला लागला. शेवटी कळसच झाला. भुलाभाई मेमोरियल इन्स्टिट्यूटमध्ये सभा झाली... खूप वादावादी झाली... आता संस्था फुटणार आणि ही फूट कुणीच टाळू शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली. कुणालाच संस्था मोडायला नको होती. चक्क रडारड सुरू झाली होती सभेत. शेवटी ठरलं की संस्थेत कुणी राहायचं यासाठी मतदान करायचं. काकडे उठला... रडतच... म्हणाला, ‘मला मतदान करायचं नाही... मी राजीनामा देऊन निघून जातो’ आणि चक्क काकडे तिथल्या तिथं राजीनामा देऊन निघून गेला. अरविंदनी लढा द्यायचं ठरवलं. पुढच्या सभेपर्यंत चित्र स्पष्ट झालं होतं. अरविंद अल्पमतात होता. त्यांनी व इतर सहकाऱ्यांनी-बहुतेक सगळे ‘शांतता’ मधाले कलाकार, तंत्रज्ञ-बाजूला व्हायचा निर्णय घेतला. पुढे मतभेद वाढून नवीन संस्था उदयाला आली ती म्हणजे ‘आविष्कार’. आता विचार कर ‘रंगायन’ जर फुटलीच नसती तर...? आता जरतरच्याच भाषेत बोलायचं झाले तर... कारण याच वेळी कळलं होतं की ‘रंगायन’ला इमारत निधीसाठी भलंमोठं अनुदान मिळणार आहे म्हणून. आणि ‘रंगायन’मध्ये फाटाफुटी झालीय असं कळल्यावर ते रद्द झालं. आज कदाचित ‘रंगायन’ला स्वतःची अशी स्वतंत्र जागा असती, नाट्यगृह असतं. ‘आविष्कार’ने चालवलेलं काम किती तरी जास्त पटीने ‘रंगायन’ने केलं असतं. कदाचित चळवळ फोफावली सुद्धा असती... मग प्रायोगिक रंगभूमीला मरगळ आलीय वगैरे चर्चा पण झाली नसती.

 

> पूर्वीची प्रायोगिक रंगभूमी आणि आताची प्रायोगिक रंगभूमी यातील बदल? आणि हे बदल सकारात्मक आहेत की नकारात्मक?
उत्तर - मला नकारात्मकता आवडत नाही. मी कधीही नकारात्मक विचार करत नाही. अप-डाउन्स होतात याचे रिअलायझेशन आम्हाला आहे. एखादा प्रयोग फसला तर आम्ही गर्भगळीत होत नाही. त्यातून आम्ही शिकतो. निर्माता म्हणून तरी मी कधी नकारात्मक विचार केलेला नाही. फरक म्हणशील तर निश्चितच फरक आहे. आज बालनाट्य, हौशी नाट्य क्षेत्रात कमालीचे प्रयोग होतायेत. शासनाच्या एकांकिका स्पर्धा, पुण्याची पुरुषोत्तम करंडक, आयएनटीच्या स्पर्धा हा सकारात्मकच बदल वाटतो मला. शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्याा बालनाट्य, हौशी नाट्य, संस्कृत नाट्य यासारख्या स्पर्धा होतात, त्यातूनच वेगवेगळे प्रयोग राबवले जातात नि त्यातूनच जे बाहेर पडतंय ते निश्चितच उत्तम आहे.

> प्रायोगिक किंवा हौशी रंगभूमीचं अर्थकारण कसं चालतं?
उत्तर - अर्थकारणापेक्षा मी याला खर्चकारण म्हणेन. कारण खर्चाची यादी मोठी असते. आम्ही छबीलदासमध्ये प्रयोग करायचोत, तो छबीलदासचा हॉल सगळ्यात स्वस्त होता. त्या काळात ५० रुपये भाडं होतं. लाइट‌्स ट्रान्सपोर्ट वगैरे सर्व खर्च मिळून छबीलदासमधील एका प्रयोगाचा खर्च हा २०० रुपये असायचा. आता काळ बदलला आहे. आता आम्हाला छोट्या सभागृहांमध्येच प्रयोग सादर करावे लागतात. आताच्या काळात एका प्रयोगाचा खर्च (सभागृहाचे भाडे, ट्रान्सपोर्ट, लाइट‌्स, बॅक स्टेज आर्टिस्ट) २५००० रुपये किमान असतो. पूर्वी कलाकारच अनेक कामं स्वतः करून घेत. आताच्या कलाकारांना साधी एखादी बॅग एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवायला सांगितली तरी ते ऐकत नाहीत, अशी आज परिस्थिती आहे, त्यामुळे बॅक स्टेज आर्टिस्टचा खर्च वाढतो. साउंड सिस्टिमवाल्यांनाही दर प्रयोगागणिक त्यांचं मानधन द्यावं लागतं, फक्त आम्ही आमच्या कलाकारांना दोन वेळचा चहा नि एखादे स्नॅक्स देतो. कारण आम्हाला तेवढंच परवडतं. त्यात अजून जाहिरातीचा खर्च असतोच. प्रायोगिकला आम्ही तिकीट आकारलं तरी प्रेक्षकांची संख्या मर्यादित असते.

> प्रायोगिक रंगभूमी ही संकल्पना केवळ शहरापुरतीच मर्यादित राहिली असं वाटतं का?
उत्तर - नाही, आज हे लोण अगदी गावागावांत पोहोचलं आहे. महाराष्ट्रात तर तू शासकीय नाट्य स्पर्धांत येणाऱ्या प्रवेशिका बघशील तर लक्षात येईल की छोट्या-छोट्या गावांतून प्रवेशिका आलेल्या असतात. म्हणजेच तिथे क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटी चालू झालेली आहे. याबाबत गेल्या वर्षीची बाल नाट्य, हौशी नाट्य स्पर्धांतील प्रवेशिकांची आकडेवारी बोलकी आहे. ही क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटी केवळ मुंबई-पुणे या शहरांपुरता मर्यादित राहिलेली नाही.

> अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद वा इतर शिखर संस्था, महामंडळांनी प्रायोगिक रंगभूमीसाठी काय करावं, असं आपल्याला वाटतं?
उत्तर - या विषयावर मी बोलू इच्छित नाही. कारण हा क‍ठीण विषय आहे. विषय कठीण आहे, म्हणण्यापेक्षा त्याविषयी बोलून त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.
 

> तरी काही अपेक्षा असतीलच ना काका?
उत्तर - अपेक्षा तर मी ठेवल्या होत्या ना. पण अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. पण एक ते चांगलं करतायत की ते एकांकिका स्पर्धा आयोजित करतायत. या वर्षी त्यांनी नाट्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती. कुठंतरी थोडं-थोडं करतायत पण संपूर्णपणे नाही. त्यांनी सगळीकडे आपल्या शाखा वाढवल्यात पण त्या शाखांतून पण फार म्हणता येईल तसं आऊटपुट नाही. नाट्यसंमेलन भरवणं इतकंच त्यांचं काम आहे नि तेच काम ते करतात.

> प्रायोगिक रंगभूमीसाठी कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांनी एकत्रित येऊन या शिखर संस्थांशी बोललं पाहिजे, याविषयी काय सांगाल?
उत्तर - हा खूप गहन विषय आहे. सगळ्यांनी मिळून एकत्र यायचं यासाठी सगळ्यांचे अहंकार गळून पडायला हवेत. आणि प्रत्येकाचे अहंकार नाहीसे होणं, कठीण आहे. विशेषतः मराठी रंगभूमीच्या बाबतीत तर फारच कठीण. एकत्रित यायचं म्हणजे नियमावली आली, म्हणजे मग त्याचं पार्लमेंट व्हायला लागेल. आता पार्लमेंट करायचं की क्रिएटिव्हिटी करायची.

> आर्थिकदृष्ट्या सबळ असलेल्या एखाद्या कलाकाराने कधी, काका तुम्हाला प्रयोगासाठी स्वखुशीने आर्थिक मदत केली आहे का?
उत्तर - कुणीही नाही, ६०-७० वर्षांत कुणीही नाही. त्या दिवसाची वाट पाहणं आज अशक्य आहे. आपण हा प्रयोग करूत, मी या प्रयोगाचे १५-२० तिकिटं घेतो असं बोलणारा कलाकार आजपावेतो भेटलेला नाही. ‘थांबला तो संपला’ म्हणून मी थांबलो नाही, थांबणारही नाही. धावत्यालाच रस्ता सापडतो. आज जवळजवळ ६४ वर्षांच्या कारकिर्दीत मी तीन संस्थांची जबाबदारी सांभाळली, परंतु स्वखुशीने प्रयोगासाठी आर्थिक मदत करणारा कुणीही भेटला नाही.

> इतकी वर्षे या क्षेत्रात आहात, एखादा विषय प्रायोगिक रंगभूमीवर सादर करावयाचा राहून गेला असं वाटतं का?
उत्तर - माझ्याकडून जवळजवळ २२५ नाटकांची निर्मिती झाली आहे. आविष्कारचं पहिलं नाटक ‘तुघलक’ आलं. हे ऐतिहासिक नाटक ७६ कलाकारांना घेऊन आम्ही सादर केलं. महेश एलकुंचवार यांची ट्रायोलॉजी आहे. सन १९९४ साली मी ट्रायोलॉजी केली, साडेआठ तास प्रेक्षकांना कलाकृतीत गुंतवून ठेवायची किमया मी सन १९९४ साली केली. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक डिसेंबर १९६७ रंगभूमीवर आलं होतं. यंदा डिसेंबरमध्ये या नाटकाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. नाट्यकृतीसाठी म्हणून लिहिलेलं एक नाटक असतं, कादंबरी, लघुकादंबरी, लघुकथा, कथा, कविता या सर्व साहित्य कला रंगभूमीवर आणण्याचं काम आम्ही केलं आहे. महेश एलकुंचवार यांच्या "मौनराग' या ललित लेखांवरचा प्रयोग आम्ही केला. तेंडुलकरांच्या कथांवर प्रयोग केलेत. नवनवीन कवींच्या कवितांवर प्रयोग केलेत. या वर्षीपासून आम्ही आविष्कारचं व्यासपीठ दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस उपलब्ध करून देतो. हे मुक्त व्यासपीठ आहे. यासाठी केवळ वेळेची मर्यादा आहे. विषयांची नाही. कुणीही यावे आणि आपली कला सादर करावी यासाठी हा एक नवीन प्रयोग राबवत आहोत. ‘प्ले स्टोअर’ नावाने त्रैमासिक सुरू केले आहे. रंगभूमीविषयी मी ग्रंथ प्रकाशन केले आहे. अरविंद देशपांडे गेल्यानंतर छबिलदास चळवळीचा आढावा घेऊन आम्ही रंगनायक या ग्रंथाचे प्रकाशन केले. तसेच ‘तें आणि आम्ही’, ‘अमका’ या पुस्तकांचं प्रकाशन, काही महत्त्वाच्या संहितांचं प्रकाशन मी केलंय. ६० वर्षांच्या प्रेस कटिंग्जच्या चार फाइल्स माझ्याकडे संग्रहित आहेत. जुन्या नाटकांचे फोटोज आणि काही वर्षांपासून नाटकांच्या डीव्हीडी आहेत. या वर्षीचा अखिल भारतीय स्तरावरील  सन्मान, जीवन गौरव पुरस्काराने मला गौरविण्यात आले आहे. ईश्वरकृपेने या रंगभूमीची सेवा करण्यासाठी अजून आयुष्य मिळालेच तर न थांबता मी वेगवेगळे प्रयोग राबवत रा‍हीन.
 
 

> शासनाची काही मदत?
शासनाची मदत फारच तुटपुंजी आहे. म्हणजे तुला सांगू का, आपल्याला जर घोडा बनवायचा असेल तर नालेचा खर्च असेल ना तितकी शासनाची मदत असते. घोड्याला फक्त नाल मारू शकतो आपण, संपूर्ण घोडा तर आपल्यालाच बनवावा लागतो.

बातम्या आणखी आहेत...