आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला जन्म देऊन अाईने सोडले प्राण.. नंतर जिल्हा रुग्णालयातील परिचारिकाच बनल्या 'नकोशी'च्या माता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जन्मदात्रीने जन्माला घातले; मात्र नियतीने आईला हिरावले. अवघे ९८० ग्रॅम वजन असलेल्या मुलीला दोन महिने जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागाच्या परिचारिकांनी आईसारखे प्रेम देत यशस्वी उपचार करून तिचे प्राण वाचवले. दोन महिन्यांपूर्वी बेशुद्धावस्थेत हे अर्भक दाखल झाले होते. आई निवर्तल्यानंतर वडीलही पोटाची खळगी भरण्यासाठी निघून गेल्यानंतर परिचारिकाच तिच्या माय-बाप झाल्या. 

 

११ ऑक्टोबर रोजी 'अतिजोखमीची' दोन-तीन दिवसांची मुलगी दाखल झाली. या मुलीची आई शीलादेवी काशी पंडीत मजुरी करत असलेल्या ठिकाणी प्रसूत झाली अाणि दुर्दैवाने मुलीला सोडून देवाघरी गेली. मुलीचे वजन खूप कमी असल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला बांधकाम साईटवरील काही कामगारांनी दिला. त्याप्रमाणे खासगी रुग्णालयात दाखल केलेही; मात्र पैशांअभावी उपचार शक्य नव्हते. मृत पत्नीचा मृतदेह मूळ गावी, बिहारमध्ये नेण्यासाठीच पैसे जमा करत असताना दोन दिवसांची मुलगी जगवण्याचा बिकट प्रसंग पंडीत यांच्यासमोर उभा ठाकला. मग कुणीतरी 'सिव्हिल'मध्ये जाण्याचा सल्ला दिला आणि पंडीत यांनी तत्काळ सिव्हिल गाठले. मुलीची प्रकृती अत्यंत नाजुक होती. तिला तातडीने एसएनसीयू विभागात दाखल केले. पित्याने मुलीला एकटे सोडून पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावाकडे प्रयाण केले. तोपर्यंत मुलीचे सर्व जबाबदारी विभागातील परिचारीकांनी आईप्रमाणे घेतल्याने मुलीचे वजन १४४० ग्रॅमपर्यंत वाढले. वजन वाढल्याने मुलगी धोक्याबाहेर आहे. अाता लवकरच मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 

 

कक्षाचे डॉ. पंकज गाजरे, डॉ. कृष्णा पवार, परिसेविका वर्षा वामोरकर यांच्यासह अधिपरिचारिकांनी घरातल्या व्यक्तीप्रमाणे या मुलीची काळजी घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, निवासी शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, मेट्रन मानिनी देशमुख यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

 

अंत्यसंस्कारासाठी घेतलेले पैसे फेडण्याकरिता मजुरी 

दोन महिने उलटूनही मुलीचे पालक येत नसल्याने विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मुलीला आधाराश्रमात दाखल करण्याचा निर्णय घेतला. शेवटचा प्रयत्न म्हणून मुलीच्या पालकांना फोन लावला असता काशी पंडीत मुलीला बघण्यासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. 'दोन महिने कुठे होता', असे विचारले असता त्यांनी पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेतलेले पैसे फेडण्यासाठी बांधकाम साईटवर काम करत असल्याचे सांगितल्यानंतर परिचारिका अाणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मन हेलावले

बातम्या आणखी आहेत...