आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियतीने अर्ध्यावरती माेडले दाेन संसार; नव्या नात्यांमुळे पुन्हा मिळाला अायुष्याचा जाेडीदार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद - पतीच्या निधनानंतर दु:ख मनात ठेवून खंबीरपणे मुलांंना माेठे केले. एक मुलगी अपूर्वा पुण्यास स्पर्धा परीक्षेची तयारी करतेय, मुलगा अनिरुद्ध मुंबईत इंजिनिअरिंग करतोय. अाता मुलांनाही समज अाली हाेती. वडिलांच्या निधनानंतर सासरच्यांनी अंतर दिले, मुले बाहेरगावी शिकू लागल्याने अाई पुन्हा एकटी पडली, याची मुलांना जाणीव हाेती. त्यामुळेच अायुष्याच्या उत्तरार्धात तरी अाईलाही खऱ्या अर्थाने समजून घेणाऱ्या जाेडीदाराची गरज अाहे, हे त्यांना पटू लागले. नकारार्थी उत्तर मिळणार हे माहीत असूनही अनिरुद्ध व अपूर्वाने अाईसमाेर पुनर्विवाहाचा प्रस्ताव ठेवला. उत्तरही अपेक्षेप्रमाणे नकारार्थीच अाले. मात्र अनेकदा मिनतवाऱ्या केल्यानंतर त्यांना यश अाले. अखेर या प्राध्यापिका महिलेने हाेकार दिला. दुर्धर आजाराने पत्नी आणि अपघाताने मुलगा हिरावल्यानंतर एकाकी असलेल्या प्रा. डॉ. एन. एस. राठी यांच्याशी अपूर्वाच्या आईचा पुनर्विवाह पार पडला. आता अपूर्वा-अनिरुद्धलाही बाबा अाणि प्रा. राठींनाही मुलगी, मुलगा मिळाले. नियतीने अर्ध्यावरती डाव माेडलेल्या दाेन वेगवेगळ्या कुटुंबांत नव्या नात्यांची गुंफण झाली. 

 

प्रा. स्मिता शिंदे (माहेरचे आडनाव) या अाैरंगाबादेतील सरस्वती भूवन महाविद्यालयात इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत. २००० मध्ये त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. तेव्हा अपूर्वा पाच तर अनिरुद्ध दोन वर्षांचा होता. दु:खाचा डाेंगर काेसळला असताना अाधार द्यायला सासरच्यांनी नकार दिला. मात्र जबाबदारीची जाणीव असल्याने दु:ख काहीसे बाजूला ठेवून प्रा. स्मिता यांनी खंबीरपणे मुलांना अाई व बाबांचे प्रेम देत वाढवले. अाता दाेन्ही मुले शिक्षणासाठी बाहेर पडल्यावर त्या पुन्हा एकाकी झाल्या. मुलांनाही आईच्या एकटेपणाची जाणीव हाेती. त्यांनी आईसमोर पुनर्विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, या वयात हा विचार करण्यात त्या तयार नव्हत्या. मात्र मुलांनी खूप वेळा मनधरणी केल्यानंतर त्यांच्या समाधानासाठी प्रा. स्मिता पुनर्विवाहासाठी राजी झाल्या. 

 

मुलगा अनिरुद्ध, मुलगी अपूर्वा (मध्यभागी) यांच्यासाेबत प्रा. रेखा शिंदे व प्रा. एन. एस. राठी 
दाेनदा पुत्रवियाेगाचे दु:ख पचवलेल्या प्रा. राठींनी लावून दिलेला सुनेचा पुनर्विवाह 
अाैरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य विभागातील प्रा. एन. एस. राठी यांना आदित्य हा एकुलता एक मुलगा होता. १८ वर्षांचा असताना आदित्य पाण्यात बुडून मरण पावला. त्यानंतर त्यांनी नात्यातीलच पवन नावाचा मुलगा दत्तक घेतला. पवनचे लग्न झाले होते. त्याला ६ महिन्यांचे बाळही होते. २०१४ मध्ये अचानक शिर्डीहून येताना झालेल्या कार अपघातत पवनचा मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरत नाहीत तोच काही दिवसांनी त्यांच्या पत्नीचाही दुर्धर आजाराने मृत्यू झाला. पत्नी व मुलगा गेल्याने राठी पूर्णपणे खचून गेले. विधवा सुनेचा त्यांनी पुनर्विवाह लावून दिला. त्यानंतर प्रा. राठी एकाकी पडले. त्यांनाही आधाराची गरज हाेती. अशातच प्रा. स्मिता यांचे भाऊ प्रा. राजेश शिंदे यांनी राठी यांना आपल्या बहिणीसोबत पुनर्विवाहाचा प्रस्ताव दिला. सर्वांच्या प्रयत्नातून दाेघांनीही हा प्रस्ताव स्वीकारला अाणि प्रा. राठी व प्रा. शिंदे हे एकमेकांचे जीवनसाथी बनले. 

 

बातम्या आणखी आहेत...