आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारुलता पटेल : उत्तर ध्रुवावर तिरंगा फडकावण्यासाठी १० अन् १३ वर्षांच्या मुलांसह कारने निघाली; वादळात फसली तरी धाडसाने पूर्ण केला प्रवास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेली भारतीय महिला भारुलता पटेल यांना ड्रायव्हिंगचा मोठा छंद. मात्र, या वेळी प्रथमच त्या एक उद्देश ठेवून दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी बाहेर पडल्या तेही १० वर्षांचा आरुष आणि १३ वर्षांचा प्रियम या दोन मुलांना सोबत घेऊन. ध्येय होते उत्तर ध्रुवावर तिरंगा फडकावण्याचे. हे धाडस करणाऱ्या भारुलता पहिली भारतीय महिला ठरल्या. ब्रिटनच्या ल्यूटनमधून १० हजार किमीचा प्रवास सुरू करून १४ देशांतून हे तिघे उत्तर ध्रुवावर पोहोचले. या काळात ते वादळात अडकले. चार तासांत त्यांची बचाव पथकाने सुटका केली. चार दिवस तेथेच थांबून हे तिघे उत्तर ध्रुवावर पोहोचले आणि तिरंगा फडकावला. 

 

दोन मुलांसह उत्तर ध्रुवावर स्वत: ड्रायव्हिंग करत कारने पोहोचणारी भारुलता ठरली पहिली भारतीय महिला 
मला ब्रेस्ट कॅन्सर आहे, नैराश्य आले होते... मुले म्हणाली, दूरच्या प्रवासाला जाऊ 
भारुलता म्हणाल्या , आर्क्टिक सर्कलचा प्रवास करण्याची कल्पना माझ्या मुलांना सुचली. मला ब्रेस्ट कॅन्सर आहे. मी नैराश्यात होते. मुले म्हणाली, 'आई, तुला ड्रायव्हिंग आवडते ना, मग दूरच्या प्रवासाला जाऊ... सांताक्लॉजला सांगू, हा कॅन्सर कायमचा जाऊ दे.' मुलांची भावना माझ्या मनात भरली आणि मी जगातील महिलांना कॅन्सरबद्दल जागरूक करण्यासाठी आर्क्टिक सर्कल कारने सर करण्याचे ठरवले. 

 

इंधन गोठू नये म्हणून कार बंद करता येत नव्हती, उणे १५ तापमानात तिरंगा फडकावला 
भारुलता आणि त्यांची दोन मुले १२ ऑक्टोबरला घराबाहेर पडली. उत्तर ध्रुवावर पोहोचण्यापूर्वी काही दिवस ते स्वीडनमध्ये उमेया गावात बर्फाच्या वादळात फसले. चार तासांच्या प्रयत्नांनंतर बचाव पथकाने त्यांना बाहेर काढले. त्याच गावात एक केरळचे कुटुंब होते. त्यांच्या घरी आश्रय घेतला. चार दिवसांनंतर या सर्वांनी पुन्हा प्रवास सुरू केला. या प्रवासात गाडी बंद करता येत नव्हती. कारण इंधन गोठण्याची भीती होती. दिवसभर सलग ड्रायव्हिंग करत आम्ही उणे १५ तापमानात रात्री ११.३० वाजता जगाचे दुसरे टोक मानल्या जाणाऱ्या उत्तर ध्रुवावर पोहोचलो. तेथे वास्तविक एक मोठा डोंगर आहे. खड्डा करून तिरंगा रोवता येईल अशी जमीन नाही. आम्ही थोडे पुढे जात बर्फ खोदून तिरंगा रोवला. परत आल्यावर ब्रिटिश संसद, खासदार, महापौरांनी या सर्वांनी जोरदार स्वागत केले. 

 

पती डॉक्टर, घरी बसून ते नेव्हिगेशन करत होते... 
व्यवसायाने वकील असलेल्या भारुलता पटेल यांचे पती डॉक्टर आहेत. ते घरी बसून पत्नी-मुले कुठे आहेत हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सतत पाहत होते. सॅटेलाइटच्या मदतीने तेच भारुलतांना पेट्रोल पंप किंवा मदत मिळेल अशी ठिकाणे कुठे आहे ते सांगत होते. थांबण्यासाठी सुरक्षित जागा पाहून घरूनच ते बुकिंग आणि मार्गदर्शनही करत होते. प्रवासाचा मार्ग त्यांनीच ठरवला. 

 

बातम्या आणखी आहेत...