आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परिसरात कुणीच नसल्याची संधी साधून एका चोरट्याने शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर भक्कम अशी तिजोरी फोडण्याचा त्याने तब्बल तासभर प्रयत्न केला. परंतु, तिजोरी फुटतच नसल्याने चोरटा निघून गेल्याने तिजोरीतील तब्बल ५६ लाख रुपये सुरक्षित राहिले. हा प्रकार गांधी चमन भागातील एसबीआय शाखेत रविवारी मध्यरात्री १ ते २ वाजेच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याचा चेहरा स्पष्ट कैद झाला. दरम्यान, कदीम पोलिसांनी २० दिवसांपूर्वीच बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सेक्युरिटी गार्ड ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, शहरातील बहुतांश बँकांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केले असून अनेक बँका आणि एटीएम केंद्र विना गार्ड आहेत.
जिल्ह्यात साडेतीनशेच्या जवळपास विविध बँकांच्या शाखा आहेत. या बँकांमधून दररोज कोट्यवधींचे व्यवहार होऊन संध्याकाळच्या सुमारास ही रोख रक्कम बॅँकांमधील लॉकरमध्ये ठेवली जाते. परंतु, सुरक्षेसाठी बँकांनी सुरक्षा रक्षक न ठेवणे, एटीएमवरही सुरक्षा रक्षक नियुक्त न करणे सामान्य बाब आहे. यामुळे बँका आणि एटीएमची सुरक्षा केवळ पोलिसांवरच राहते.
दरम्यान, गांधी चमन भागातील एसबीआय शाखेच्या परिसरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने शटरचे कुलूप तोडून चॅनेेल गेटमधून रात्री २ वाजेच्या सुमारास बँकेत प्रवेश केला. थेट बँकेतील तिजोरीजवळ जाऊन त्याने ती तिजाेरी फोडण्याचा तासभर प्रयत्न केला. परंतु, ती तिजोरी न फुटल्याने या चोरट्याने पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच एडीएसचे यशवंत जाधव, कदीम ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, एपीआय मोरे, कैलास जावळे आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
पंधरा दिवसांपूर्वीच घेतली बैठक
कदिम ठाण्याचे निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा दिवसांपूर्वीच ठाण्यात बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीप्रसंगी बँक अधिकाऱ्यांना सेक्युरिटी गार्ड ठेवा, टामीने न तुटणारे बाजारात आलेली कुलपे लावा आदी सूचना केल्या होत्या. या बैठकीला चोरीचा प्रयत्न झालेल्या एसबीआयचे अधिकारीही उपस्थित होते.
एक तास झटला
चोरट्याने तब्बल तासभर लोखंडी असलेली तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ती फुटली नसल्याने पैसे वाचले. बँकांकडून सुरक्षा रक्षक नेमण्याकडे बँकांचे दुर्लक्ष होत आहे.
संजय लोहकरे, पोलिस निरीक्षक, कदिम.
सिसीटीव्ही जप्त
चोरट्याने बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असून हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. त्याला पकडण्यासाठी पथक कार्यरत केले आहे.
यशवंत जाधव, पो.नि.
वारंवार सूचना
बँकांनी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासाठी वारंवार सूचना केल्या आहेत. पोलिस ठाण्यांमार्फत बैठकाही घेतल्या आहेत. परंतु, यानंतरही बँकांकडून दुर्लक्ष होत आहे.
एस. चैतन्य, पोलिस अधीक्षक, जालना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.