आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का करावा महिला दिन साजरा?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच महिला दिन होऊन गेलाय. गेल्या काही वर्षांत अनेक दिवस साजरे करण्याची पद्धतच रूढ झाली आहे. पूर्वी जसे पारंपरिक सणच साजरे केले जायचे, सणांना सर्व नातेवाईक एकत्र यायचे आणि धम्माल करायचे. आजच्या धावपळीच्या जगात पैसे आणि भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या मानवास मात्र ते सण तर काय पारंपरिक आहेतच; पण त्यात भर म्हणून जागतिक पातळीवर गृहीत धरले जाणारे दिवसही साजरे करण्याचा जणू छंदच लागला आहे. दिवसाचे महत्त्व काय? तोच दिवस का? असा दिवसच का ठरवलाय? अशा अनेक प्रश्नांचा विचारही बऱ्याच जणांच्या मनाला शिवतही नाही. पण तरी असा दिवस साजरा करायचा; केवळ रूटीनमधून थोडा वेळ काहीतरी वेगळे केल्याचे समाधान मिळावं म्हणून. यामुळे वेळात वेळ काढून सर्व एकत्र येतात, मौजमजा करतात, स्वतःला आणि दुसऱ्यालाही आनंद देण्याचा प्रयत्न करतात. फक्त हे सगळे करताना ज्यासाठी करतो आहे त्याचा आणि जे करतो आहे त्याचा अर्थ आणि महत्त्व समजून घेणे गरजेचे असते.


आता महिला दिवस, प्रत्येक कार्यालयात, आणि बहुतेक घरात साजरा करतात. आता याच दिवसाबद्दल बोलायचे झाले तर भारतात हा दिवस गेल्या काही वर्षांतच साजरा होऊ लागला. भारतभर असलेल्या कर्तृत्ववान स्त्रियांचा सत्कार व कौतुक करण्याचा दिवस एवढेच नाही तर किमान या दिवशी तरी “स्त्री” या विषयावर थोडासा विचार करण्याचा दिवस. पूर्वीची स्त्री कशी होती, आज काय आहे आणि उद्या काय असेल या मुद्द्यांना धरून विचार करणे आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस!


या सर्व मुद्द्यांचा बारकाईने विचार केलाच तर लक्षात येईल की, स्त्री ही जाणून घेण्याची गोष्ट आहे. तिचे महत्त्व पटवून घेणे किंवा इतरांकडून ऐकून कुठल्याही पुरुषाने कमीपणा वाटून घेणे असा त्याचा अर्थ होत नाही. तसेच यात कोणताही तुलनात्मक विचार जागृत करण्याचीदेखील गरज नसते. जसे आपण एखादी गोष्ट ऐकतो, त्याच्यातून होणारा बोध हा आपल्या आयुष्यात येणाऱ्या एवढ्या चांगल्यावाईट अनुभवाला कसे हाताळावे, यासाठी उपयोगी पडतो. त्या गोष्टीतून आपण बोध घेतो, गोष्टीत असलेल्या व्यक्तींची वैशिट्ये आपण विचारात घेतो. तसेच काहीसे स्त्रीबद्दल आहे. त्याच बरोबरीने जर आपण “पुरुषांस” गोष्टीरूप मानले तर “पुरुष” जाणून घ्यायला प्रत्येक स्त्रीला आवडेल. हीच आदराची भावना एकमेकांबद्दल ठेवून एकमेकांबद्दलची चांगली मतं मांडणे, एकमेकांसमोर दिलखुलास कौतुक करणे हे महत्त्वाचे! मग ते तुम्ही ज्या दिवशी एकमेकांसमोर मनापासून व्यक्त होतात त्याला खरे तर आपण सेलिब्रेशन म्हणू शकतो. मग तो दिवस जगाने  ठरवलेला असो किंवा आपण ठरवलेला कोणताही दिवस.


बरेच जण महिला दिनाचा अर्थ घेतात की, त्या दिवाशी ‘महिलांना मान द्या; कोणतेच काम सांगू नका, स्त्रीचा सत्कार करावा, किंवा शुभेच्छा द्याव्या.’ पण खरेच हेच अपेक्षित आहे का स्त्रीलासुद्धा? “साजराच” करायचा आहे का प्रत्येक स्त्रीला हा दिवस?
स्त्री संयमी, समंजस, कणखर तेवढीच भावनाप्रधान, समर्पण करण्याची वृत्ती असणारी, काटकसरी आणि काळजीवाहू, मेहनती असते. या सगळ्या गुणांचा विचार केला तर मला वाटते की, कोणतीही स्त्री अगदी मोलमजुरी करणारी असो किंवा गडगंज संपत्ती असणारी श्रीमंत, फक्त कृतज्ञता व्यक्त करणारे शब्दच तिला सुखावून जातात.


आज जगात सगळेच पुरुष नालायक आहेत आणि सर्वच स्त्रिया महत्त्वपूर्ण आहेत असे नाही. जोपर्यंत दोघे एकमेकांसोबत आहेत आणि एकमेकांच्या पाठीशी आहेत तोपर्यंतच जगात जगण्याचा, कर्तृत्व करण्याचाही आनंद आहे. आणि तरच स्त्रीपुरुष समानता म्हणता आणि मानता येईल. एक पारडे हलके असेल तर त्या त्यात समानता कसली? म्हणून महिला दिवस साजरा करा पण तो पार्टी करूनच किंवा काम न करताच केला पाहिजे असे नाही;  तर कर्तृत्ववान स्त्रियांचं स्मरण करून, त्यांची कामगिरी लक्षात घेऊन आपण समाजासाठी आणि कुटुंबासाठीही बरोबरीने काय करू शकतो याचा विचारविनिमय किंवा संकल्प करून, साजरा करणे जास्त योग्य ठरेल.


मोनिका देशपांडे, नाशिक 
deshpandemonikap@gmail.com

बातम्या आणखी आहेत...