आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा चकवा : राज्यात २२ ऑगस्टपर्यंत मान्सून ब्रेक; सर्व आशा परतीच्या पावसावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महाराष्ट्रात जूनमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर जुलैपासून नैऋत्य मान्सूनचे गणित बिघडले. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाने खंड दिला आहे. हा खंड आता २२ ऑगस्टपर्यंत लांबण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. गतवर्षीही जुलै-ऑगस्टमध्ये मान्सूनने जवळपास ५५ दिवसांचा ब्रेक घेतला होता. याचीच पुनरावृत्ती यंदा होण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला या ब्रेकचा सर्वाधिक फटका बसणार आहे. आता सर्व आशा परतीच्या पावसावरच असून आतापर्यंत सप्टेंबरमधील पावसानेच या भागाला तारले आहे. 


भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) साप्ताहिक अहवालानुसार, १५ ऑगस्टपर्यंत नैऋत्य मान्सून देशाच्या उत्तर भागात जास्त सक्रिय राहील. मान्सूनचा ट्रफ उत्तरेकडे असल्याने कमी दाबाचे क्षेत्र उत्तर भारतात जास्त प्रमाणात निर्माण होईल. त्यामुळे या काळात उत्तरेकडील राज्यांत चांगला पाऊस होईल. दक्षिण आणि मध्य भारतात मान्सून सक्रियतेसाठी अनुकूल स्थिती नसल्याने पावसात खंड पडला आहे. 


परतीचा पाऊस तूट भरणार 
राज्यात गतवर्षी जुलै -ऑगस्टमध्ये जवळपास ५५ दिवसांचा खंड पडला होता. त्यानंतर ऑगस्टच्या शेवटचा आठवडा आणि सप्टेंबरमधील पावसाने तूट काही प्रमाणात भरून काढली होती. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला आतापर्यंत सप्टेंबरमधील पावसाने चांगली साथ दिल्याचे आकडेवारी सांगते. यंदाही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे सप्टेंबरमधील पाऊस पुन्हा तारणार, अशी शक्यता आहे. 


पावसात खंडाची कारणे
> मान्सूनचा आस जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून उत्तरेकडे 
> राज्यात कमी दाबाच्या क्षेत्राची वानवा 
> अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा सुस्तावली 
>मोसमी वाऱ्यांना आवश्यक त्या आर्द्रतेचा कमी पुरवठा 
(स्रोत : आयएमडी, पाऊस मिमीमध्ये) 


२२ ऑगस्टनंतर दमदार पाऊस 
सध्या राज्यातील वातावरण मान्सूनच्या सक्रियतेसाठी अनुकूल नाही. परतीच्या मान्सूनच्या हालचाली ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतील. राज्यात २२ ऑगस्टनंतर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. 
-डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ 

बातम्या आणखी आहेत...