आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाळा संपतोय, उपयुक्त साठा 1.85 टक्केच; 63 प्रकल्प कोरडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड : ६६६.३६ मिमी वार्षिक पर्जन्यमान सरासरी असलेल्या बीड जिल्ह्यात यंदा ११ ऑक्टोबरपर्यंत ४०७.१ मिमी म्हणजे ६१.० टक्के इतक्या पावसाची नोंद झाली. अपुऱ्या व विलंबाने पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात उपयुक्त साठा केवळ १.८५ टक्के इतकाच झालेला आहे. यासह ६३ जलप्रकल्प अजूनही कोरडेठाक आहेत तर ५७ जलप्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखालीच आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास खरीप हंगामा प्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांनाही फटका बसण्याची चिन्ह आहेत.

गेल्या काही वर्षांत सातत्याने अवर्षणाचा सामना करण्याची वेळ बीड जिल्ह्यावर येऊन ठेपलेली आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील अनेक भागांत टंचाईच्या झळांचा सामना करावा लागत होता. टँकरचा आकडा दीड हजारांवर पोहोचल्यानंतरही अनेक गावांत पाणी वेळेवर पोहोचत नव्हते. अशा स्थितीत किमान यंदा तरी पाऊस चांगला होईल व टंचाईचे संकट दूर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, जुन, जुलै या महिन्यांत काही ठिकाणचा अपवाद वगळता एकही मोठा पाऊस झाला नाही.

परिणाम स्वरूप माजलगाव, मांजरा प्रकल्पासह बहुतांशी जलप्रकल्प मृतसाठ्यातच राहिले. ऑगस्ट महिन्यातील अल्पशा हजेरीमुळे काही प्रमाणात लघु प्रकल्पांना दिलासा मिळाला. मात्र तो पुरेसा ठरलेला नाही. ११ ऑक्टोबरपर्यंत बीड जिल्ह्यात ४०७.१ मिमी इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. शुक्रवारीही पाटोदा, रोहतवाडी, बीड परिसरातील काही भागांत हलक्याशा पावसाने हजेरी लावली. असे असतानाही जिल्ह्यात लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या १० ऑक्टोबरच्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ १.८५ टक्के म्हणजे १६.४९० दलघमी इतका उपयुक्त साठा शेष आहे. जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत मिळून १४.७७१ दलघमी इतका एकूण साठा शेष आहे तर सर्व लघु प्रकल्पात मिळून १७.०८५ दलघमी इतकाच जलसाठा झाला. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ७५ टक्क्यांवर भरलेले दोन प्रकल्प आहेत तर १७ प्रकल्पांत २५ टक्क्यांहून कमी पाणी आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे पावसाळा संपत आलेला असतानाही ५७ प्रकल्पांतील पाणीपातळी ही जोत्याखाली आहे तर ६३ प्रकल्प हे अद्यापही कोरडेठाकच आहेत. त्यामुळे आता रब्बीवरही पाणीटंचाईचे सावट घोंगावतेय.

रब्बी हंगामावर संकट
जिल्ह्यात पाच लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर रब्बी हंगामाचा सरासरी पेरा होतो. परंतु, यंदा खरीपाचीच पीके निम्म्यापर्यंत पाण्याअभावी वाया गेलेली आहेत. त्यात शेतकरी आता सद्याच्या उपलब्ध पाण्यावर व पाऊस होईल या आशेवर रब्बी हंगामाची तयारी करत असला तरी पावसाचा बेभरवशी खेळ पाहता हंगाम संकटात आहे, अशीच स्थिती आहे.

जायकवाडीने माजलगावला तारले
४५४.००० दलघमी इतकी प्रकल्पीय क्षमता असलेल्या माजलगाव धरणाला मागील महिन्यात जायकवाडीच्या कालव्यातून सुरु असलेल्या आवर्तनामुळे दिलासा मिळाला असून हा प्रकल्प मृतसाठ्याबाहेर आला आहे. १४५.४०० दलघमी इतका साठा प्रकल्पात झालेला आहे, मात्र उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ही केवळ १.९ टक्के इतकी आहे. मांजरा प्रकल्प मात्र मृतसाठ्यातच असल्याने तीन जिल्ह्यातील गावांसाठी पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे झालेयं.
 

बातम्या आणखी आहेत...