आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाही मान्सूनचे कमिंग सून सुरूच, आता ८ जूनपर्यंत केरळात धडकण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नैऋत्य मोसमी वारे सध्या केरळच्या दक्षिणेला दाखल झाले अाहेत. मात्र मान्सून कमिंग सून सुरूच असून  येत्या ८ जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. यापूर्वी मान्सून ६ जूनपर्यंत केरळात येईल असे आयएमडीने म्हटले होते. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बुधवारी श्रीलंका देशाचा निम्मा भाग व्यापत कामोरीन आणि मालदीव बेटांपर्यंत प्रगती केली. गुरुवारी मान्सून याच जागी होता. मात्र, दक्षिण भारतात हवेच्या मधल्या थरात पूर्व-पश्चिम हवेचे जोड क्षेत्र तयार झाले असून मान्सूनच्या प्रगतीसाठी ही अनुकूल स्थिती असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. दरम्यान राज्यात विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून ७ ते ९ जून या काळात राज्यातील बहुतेक भागात पूर्व मोसमी पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 


आयएमडीच्या अहवालानुसार, १८ मे रोजी अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनने गुरुवारपर्यंत मालदीव बेटे, कामोरीनचा भाग, मध्य श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरातील काही भागापर्यंत प्रगती केली आहे. सध्या दक्षिण भारतात हवेच्या मधल्या थरात पूर्व-पश्चिम हवेचे जोड क्षेत्र तयार झाले असून ते आणखी उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच ८ जूनपर्यंत महाराष्ट्र ते केरळदरम्यान अरबी समुद्रात एक किनारी आस क्षेत्र तयार होत आहे. विषुववृत्ताकडून मोसमी वाऱ्यांच्या जोर वाढला असून दक्षिण अरबी समुद्रात ढगांची दाटी वाढत अाहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी ही अनुकूल स्थिती असून मान्सून ८ जूनपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. 

 

राज्यात पावसाची शक्यता 
> पुणे वेधशाळेनुसार राज्यात ७ ते ९ जून या काळात राज्यातील अनेक भागात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 
> महाराष्ट्रात गुरुवारी विदर्भ काही ठिकाणी, तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. याच काळात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
> राज्यात बुधवारी आणि गुरुवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला. औरंगाबाद, बीड, पुणे, सोलापूर,  अक्कलकोट, माळशिरस, कळमनुरी, पालम, औंढा नागनाथ, बिलोली, मालवण, कुडाळ, पणजी, सावंतवाडी, परतवाडा येथे १ ते ३ सेंमी पावसाची नोंद झाली.  

बातम्या आणखी आहेत...