आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष : देशात ५ कोटींवर हृदयराेगी, हृदयरोगतज्ञ फक्त ४ हजार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आज जागतिक हृदय दिन आहे. आपल्या देशात हृदयविकाराचे सुमारे साडेपाच कोटी रुग्ण आहेत. दरवर्षी या आजाराने २८ लाख लाेकांचा मृत्यू होतो. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार देशात हृदयाचे डॉक्टर (कार्डिओलॉजिस्ट) फक्त चारच हजार आहेत. देशाला सध्या ८८ हजार हृदयरोगतज्ज्ञांची गरज आहे. हृदयरुग्णांच्या वाढत्या संख्येकडे पाहता आज २२ पट जास्त हृदयरोगतज्ज्ञांची गरज आहे. ही फक्त कार्डिओलॉजिस्ट्सचीच आकडेवारी आहे. हार्ट सर्जनची स्थिती तर यापेक्षा बिकट आहे. यंदा हार्ट सर्जन बनण्यासाठीच्या प्रवेश परीक्षेत १६५ पैकी ८९ जागाच भरल्या. परीक्षेला १० हजार विद्यार्थी बसूनही सुमारे ५३% जागा रिक्त राहिल्या. 


हेच चित्र कायम राहिले तर पुढे देशात मोजकेच हार्ट सर्जन असतील, अशी चिंता आरोग्य मंत्रालयाला सतावते आहे. यामुळे कार्डिओ थोरेसिक अँड व्हॅस्क्युलर सर्जनच्या (सीटीव्हीएस) अभ्यासक्रमात कशा प्रकारचा बदल केला जावा, याबाबत देशातील प्रख्यात हार्ट सर्जन व डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे, जेणेकरून सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत सर्जनच्या जागा रिक्त राहू नयेत.  रुग्णालयांत सीटीव्हीएस विभाग चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची गरज असते. यामुळे सीटीव्हीएस डॉक्टर अल्प प्रमाणात आहेत. 


सीटीव्हीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वत:चे नर्सिंग होम उघडून बायपास सर्जरी, हृदयात व्हॉल्व्ह बसवणे वा हृदय प्रत्यारोपण सेवा देण्याची इच्छा असली तरी हे प्रचंड कठीण काम आहे. यासाठी ५० ते १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल आणि इतर अनेक सुपर स्पेशालिटी डॉक्टरांनाही तैनात करावे लागेल. यामुळेच रुग्णांची संख्या प्रचंड असूनही डॉक्टर सीटीव्हीएस कोर्स घेत नाहीत. देशात ३५ सुपर स्पेशालिटी कोर्सच्या २ हजार जागा आहेत. त्यापैकी हार्ट व बालरोगतज्ज्ञांच्या जागा भरता आल्या नाहीत.


हार्ट सर्जन शिक्षणासाठी १५ वर्षे, २ कोटी रुपयांचा खर्च 
धर्मशीला नारायणा सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे कार्डिओ थोरेसिक अँड व्हॅस्क्युलर विभागाचे संचालक डॉ. मिमतेश शर्मा म्हणाले, हार्ट सर्जन होण्यासाठी १२ ते १५ वर्षांचे शिक्षण घ्यावे लागते. तसेच यात २ कोटी रुपयांपर्यंतचा खर्चही येतो. यानंतरही सीटीव्हीएस डॉक्टरला त्याच्या पात्रतेनुसार संधी मिळत नाही. इतकेच नव्हे तर गेल्या काही वर्षांत स्टेंट बसवण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. एका स्टेंटऐवजी दोन व तीन स्टेंटही लावले जातात. यामुळेही डॉक्टर सीटीव्हीएस घेण्यास नकार देतात. दरवर्षी ७० हजार शस्त्रक्रिया होतात. 

बातम्या आणखी आहेत...