आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉर्निंग वॉक करणाऱ्याचा वाहनाच्या धडकेने मृत्यू; पत्नीदेखत पहाटे चेतक घाेड्याजवळ अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मॉर्निंग वॉक करणारे भास्कर साहेबराव केदारे (५३, रा. श्रीनिवास हाउसिंग सोसायटी, गारखेडा) यांचा मंगळवारी (९ ऑक्टोबर) पहाटे पाच वाजेच्या सुमारास भरधाव जीपच्या धडकेने मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीच्या डोळ्यादेखत रोपळेकर रुग्णालय ते चेतक घोडा रस्त्यावर हा अपघात झाला. पतीला सावरण्यासाठी त्यांनी आरडाओरड केली. लोक मदतीला धावले. पण तोपर्यंत जीपचालक सुसाट वेगाने पळाला. 


जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. केदारे यांना जीपने मागून धडक दिली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहाटे या रस्त्यावरून गेलेल्या वाहनांचे चित्रण एखाद्या सीसीटीव्हीमध्ये आहे का, याची तपासणी मुख्य हवालदार सुदाम दाभाडे करीत आहेत. केदारे विनय गॅस एजन्सीचे संचालक, सौरभ मंगल कार्यालयाचे मालक होते. विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना एक मुलगा आणि मुलगी असून दोघेही उच्च शिक्षणासाठी बाहेर गेले आहेत. त्यांच्या मुलाचा बुधवारी वाढदिवस होता. त्यासाठी तो शहरात येणार असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. 


फुटपाथ नसल्याने 
फुटपाथ नसल्याने शहरात मॉर्निंग वॉक करणे धोकादायक झाले आहे. वर्षभरापूर्वी केंब्रिज चौकाजवळ मॉर्निंग वॉक करणाऱ्या चौघांना भरधाव स्कॉर्पिओने उडवले होते. तेव्हा विविध भागांतील मैदानांवर माॅर्निंग वॉकची सुविधा देण्याचे आश्वासन काही नेत्यांनी दिले होते. त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही. 

बातम्या आणखी आहेत...