Home | International | Other Country | Mosques attacked in Sri Lanka town after Facebook row, curfew imposed one arrested

श्रीलंकेत मशीदी, मुस्लिम समुदायांच्या दुकानांवर हल्ले, भडकाऊ फेसबूक पोस्ट टाकणाऱ्या एकाच अटक, आता सोशल मीडियावर बंदी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2019, 10:27 AM IST

तीन मशीदींवर हल्ल्यांनंतर फेसबूक आणि व्हॉट्सअॅप बॅन करण्यात आले आहेत

  • Mosques attacked in Sri Lanka town after Facebook row, curfew imposed one arrested

    कोलंबो - श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटानंतर आणीबाणी आणि मुस्लिमांवर अंकुश लावणाऱ्या सरकारी नियमांनंतर आता या समुदायावर हल्ले सुरू झाले आहेत. चिलाऊ येथे एका फेसबूक पोस्टनंतर स्थानिकांनी तीन मशीदींवर हल्ले केले. सोबतच, या समुदायाच्या दुकानांना लक्ष्य करून तोडफोड देखील केली. या हिंसाचाराच्या घटनेनंतर सरकारने फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर बंदी लावली आहे. तसेच अतिसंवेदनशील ठिकाणी संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली.


    श्रीलंकेत 21 एप्रिल रोजी ईस्टरच्या दिवशी चर्चला लक्ष्य करून साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या स्फोटांमध्ये 252 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. हल्ल्याची जबाबदारी जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट आणि त्यांच्या समर्थकांनी घेतली. तेव्हापासूनच श्रीलंकेत मुस्लिमविरोधी वातावरण पसरल्याची तक्रार केली जात आहे. त्यातच सरकारने कथित मुस्लिम कट्टरपंथी विचारसरणीवर अंकुश लावण्यासाठी मुस्लिमांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. सरकारने आधी नकाब आणि बुरखाबंदी लागू केली. यानंतर मशीदींमध्ये होणाऱ्या रोजच्या उपदेशांवर सुद्धा नजर ठेवण्याचे आदेश काढले. त्यामध्ये मशीदींमध्ये काय उपदेश दिले जात आहेत, याची एक कॉपी स्थानिक प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. दरम्यान, श्रीलंकेचे पोलिस प्रवक्ते रुवान गुणशेखर यांनी सांगितल्याप्रमाणे, फेसबूकवर भडकाऊ पोस्ट लिहिणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.


    वृत्तसंस्थेने फेसबूक पोस्टचा दाखला देत दिलेल्या माहितीनुसार, त्या पोस्टनंतरच मशीदींवर हल्ले करण्यात आले. पोस्टच्या एका कॉमेंटमध्ये लिहण्यात आले होते, की "आम्हाला कुणीही रडवू शकत नाही." त्यावर दुसऱ्याने उत्तर देताना, जास्त हसू नका, तुमच्यावर रडण्याची पाळी येईल." याच उत्तराला सोशल मीडियावर धमकी मानले गेले. त्यावरून सोशल मीडियावर वाद तर पेटलाच, सोबतच त्याचे पडसाद रस्त्यांवर दिसून आले. यानंतर संतप्त समाजकंटकांनी तीन मशीदी आणि मुस्लिमांच्या दुकानांवर हल्ले केले. सद्यस्थितीला परिस्थिती नियंत्रणात असून चोख सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

  • Mosques attacked in Sri Lanka town after Facebook row, curfew imposed one arrested

Trending