Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | most active wheelchair user imran from UP

तरी मोडला नाही कणा... जगण्याचा अनोखा बाणा

नामदेव खेडकर | Update - Mar 06, 2019, 12:12 PM IST

अपघात किंवा अन्य कारणाने पाठीचा कणा निकामी झाल्यास (स्पायनल कॉर्ड इंज्युरी) आयुष्य व्हीलचेअरवरच काढावे लागते.

 • most active wheelchair user imran from UP

  औरंगाबाद - अपघात किंवा अन्य कारणाने पाठीचा कणा निकामी झाल्यास (स्पायनल कॉर्ड इंज्युरी) आयुष्य व्हीलचेअरवरच काढावे लागते. कमरेखालील भाग संवेदनाहीन झाल्याने उठता-बसताही येत नाही. कुटुंबीयांचेही अशा रुग्णांकडे दुर्लक्ष होते. नैराश्यातून अनेक जण मृत्यूला कवटाळतात. अशा रुग्णांना सकारात्मक रीतीने जीवन जगता यावे म्हणून उत्तर प्रदेशातील ‘मोस्ट अॅक्टिव्ह व्हीलचेअर युजर’ इम्रान कुरेशी व्हीलचेअरवर देशभर फिरून स्वावलंबी जीवन जगण्याचे धडे देत आहे. नुकतेच औरंगाबादमध्ये इम्रान यांनी ८ युवकांना प्रशिक्षण दिले. विशेष म्हणजे घरातून बाहेर पडण्यासाठी संकोच वाटणाऱ्या युवकांनी व्हीलचेअरवर वेरूळ लेणी परिसरात सहलीचा आनंद लुटला.


  इम्रान यांच्या ‘बंधुकार्या’ला चिकलठाणा एमआयडीसीमध्ये ऑफसेट युनिट चालवणाऱ्या व अपघातात अपंगत्व आलेल्या कुलदीप जाधव औरंगाबादमध्ये झालेल्या कार्यशाळेसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच रुग्णांची निवास व भोजनाची व्यवस्था केली आणि इम्रानने दहा दिवस मोफत मार्गदर्शन केले. कुलदीप यांनी इम्रान यांची यूट्यूबवरून माहिती घेतली व कार्यशाळा आयोजित केली होती.


  दैनंदिन जीवनात व्हीलचेअरच्या वापराबाबत दिल्या टिप्स
  पाठीचा कणा निकामी झाल्यानंतर आयुष्य व्हीलचेअरवरच काढावे लागते. त्यामुळे व्हीलचेअरचा योग्य वापर कसा करावा याच्या टिप्स इम्रान यांनी दिल्या. यात घराची रचना कशी असावी, कुणाचीही मदत न घेता व्हीलचेअरवर कसे बसावे, दैनंदिन कामे कशी करावीत आदी गोष्टी इम्राननी तरुणांना समजावून सांगितल्या.


  मोफत मार्गदर्शन : अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी देशात अनेक ठिकाणी पुनर्वसन केेंद्रे आहेत. येथे महिन्याकाठी ६० ते ८० हजार रुपये शुल्क आकारले जाते. या सेंटर्समध्ये आजारासोबत आनंदी जीवन जगण्याची कला शिकवली जाते. हेच काम इम्रान मोफत करतात.

Trending