आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Most Senior A Madhukar Chavan Is In The Ring For The Eighth Year At The Age Of 82, And The 27 year old Doctor Grandson Of Ganapatrao Is Practicing In Politics.

सर्वात ज्येष्ठ आ. मधुकर चव्हाण ८२ व्या वर्षी आठव्यांदा रिंगणात, तर गणपतरावांच्या २७ वर्षीय डॉक्टर नातवाची राजकारणात 'प्रॅक्टिस' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : वयाच्या ७९ व्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांची ऊर्जा जसा महाराष्ट्र अनुभवतोय, तशीच ऊर्जा व धडपड तुळजापूरचे आमदार वयाच्या ८२ व्या वर्षीही मधुकर चव्हाण दाखवत आहेत. ते तुळजापुरातून काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत. सलग ४ वेळा आमदार राहिलेले चव्हाण राज्यातले सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत. त्यांची लढत भाजपच्या राणाजगजितसिंह पाटील यांच्यासोबत होत आहे. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

चव्हाण हे आठव्यांदा विधानसभा लढवित आहेत. ते पाच वेळा आमदार झाले आहेत. सध्या महाराष्ट्रातले वयोवृध्द आमदार सांगोला येथील गणपतराव देशमुख आहेत. त्यांचे वय ९३ वर्षे असून, ते तब्बल ११ वेळा आमदार राहिले आहेत. मात्र, प्रकृती अस्वस्थ्यामुळे गणपतराव देशमुख यांनी यावर्षी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने ८२ वर्षीय मधुकर चव्हाण सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत. त्यांच्या पाठोपाठ फुलंब्री मतदारसंघातील ७५ वर्षीय भाजप उमेदवार हरिभाऊ बागडे यांचा नंबर लागतो. चव्हाणविरुद्ध राणा पाटील असा सामना होत असला तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळेंसह अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, रिंगणात कोण टिकणार, कोण बाहेर पडणार, हे सोमवारी स्पष्ट होईल.

दुग्धविकास मंत्री, उपसभापतिपद
ज्येष्ठ उमेदवार मधुकर चव्हाण १९९९ पासून २०१९ पर्यंत सलग चारवेळा तुळजापुरातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. १९९० ते १९९५ या दरम्यानही ते आमदार होते. १९९५ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते माणिकराव खपले यांच्याकडून चव्हाणांचा पराभव झाला होता. उस्मानाबादमधूनही तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते डॉ.पद्मसिंह पाटील यांच्याकडून ते पराभूत झाले होते. आता आठव्यांदा ते मैदानात उतरले आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेस पंचायत समिती सदस्यापासून झाली. लोकल बोर्डाचे सभापती, भूविकास बँकेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात दुग्धविकास व पशूसंवर्धनमंत्री, विधानसभेचे उपसभापती, अशी अनेक पदे भूषविली आहेत. शुभ्र धोतर आणि नेहरू सदरा असा त्यांचा पेहराव आहे.

तालमीचे पहेलवान, व्यायामामुळे मिळते ऊर्जा
८२ व्या वर्षीही निवडणुकीच्या आखाड्यात असलेले मधुकर चव्हाण खऱ्या अर्थाने तालमीच्या आखाड्यात तयार झालेले पहेलवान आहेत. ते कुस्तीपटू असून, त्यांनी व्यायामातून ऊर्जा मिळवली आहे. घरचा सकस आहार, दूध आणि व्यायाम हेच चांगल्या शरीरयष्टीचे प्रमुख कारण असल्याचे ते सांगतात. दररोज सकाळी ६ वाजता त्यांचा दिनक्रम सुरू होतो. एरव्ही ते दररोज ८ ते १० गावांना भेटी देतात.

गणपतरावांच्या नकारानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अनिकेत यांना संधी

साेलापूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी वयाचा उमेदवार (प्रमुख राजकीय पक्षांतून) सांगाेला, जि. साेलापूर मतदारसंघात अाहे. विक्रमी ११ वेळा आमदार राहिलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डाॅ. अनिकेत देशमुख हे पहिल्यांदाच रणधुमाळीत उतरले आहेत. ३ अाॅक्टाेबर १९९२ राेजी जन्मलेले अनिकेत अाजाेबा गणपतराव देशमुख यांचा वारसा सांगत वयाच्या २७ व्या वर्षी ते राजकारण आले. विचारसरणीदेखील आजाेबांचीच. व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रात असले तरी त्यांनी मार्क्सवाद वाचलाय, हे विशेष.

गणपतराव देशमुख यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी थांबण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांच्या सांगोला मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उद्याेगपती भाऊसाहेब रूपनर यांच्या नावाची घाेषणाही झाली. परंतु कार्यकर्ते देशमुख यांनाच पुन्हा लढवण्याची विनवणी करत हाेते. कार्यकर्त्यांचा एक मेळावा असा झाला, की मंचावर फक्त देशमुखांचा फाेटाे हाेता अन् खाली कार्यकर्ते बसलेले हाेते. आबासाहेब जेव्हा आले, तेव्हा त्यांचे पाय धरून रडणारे कार्यकर्तेही महाराष्ट्राने पाहिले. त्या वेळी अाबांचे एक वाक्यदेखील अनुत्तरित करणारे हाेते, 'वयाच्या एेंशीच्या पुढे असलेल्या तुमच्या आई-वडिलांना बाहेर काढणार का?' पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील या वाक्यावर थांबले. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहातून देशमुख यांच्याच घरातला उमेदवार हवा, असा सूर पुढे आला. त्यामुळे अचानक उमेदवार बदलावा लागला. त्यातून पुढे आले ते डाॅ. अनिकेत देशमुख. गणपतरावांना घराणेशाही मान्य नाही, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे हतबल झाल्याने हा निर्णय त्यांना मान्य करावा लागला.

डाॅ. अनिकेत देशमुख यांची जडणघडण
दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेत पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण. राजश्री शाहू कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण. मुंबईच्या जीएमसी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस झाले. आता पुण्यात सेवा देत आहेत. त्यांच्यावर मार्क्सच्या विचारांचा प्रभाव आहे. महाविद्यालयीन विद्यार्थीदशेतच त्यांनी मार्क्सवाद वाचला.

पुरोगामी विचार पुढे नेण्याचे प्रयत्न
डॉ. अनिकेत म्हणाले, मी पुण्यात असताना सांगोल्यातून उभे राहायचंय असा फोन आला. आजोबांनी थांबण्याचा निर्णय घेतला. पण, कार्यकर्ते आग्रही होते. त्यांच्यामुळेच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. ही घराणेशाही नाही. शेकापचे पुरोगामी विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आहे.

प्रश्न : विजयानंतर काय?
उत्तर : दुष्काळी तालुका हे चित्र पुसण्यासाठी काम करावे लागेल.

प्रश्न : काही वेगळे उपक्रम?
उत्तर : तालुक्याला एक ट्रामा केअर मंजूर झालेलाच आहे. त्याच्या माध्यमातून आधुनिक वैद्यकीय सुविधा देण्याचे प्रयत्न राहतील.

प्रश्न : तरुणाईच्या अपेक्षा?
उत्तर : शिक्षण, राेजगार यात आमूलाग्र बदल करण्याचा विचार आहे. शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे.

प्रश्न : भाऊसाहेब रूपनर सेनेत गेल्याचा काही परिणाम?
उत्तर : ताे त्यांच्यावरच हाेईल. मी अधिक काय बाेलणार...?
 

बातम्या आणखी आहेत...