आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीच्या 'छबी'मुळेच 'पपड्या' गजाआड; कुख्यात गुंड पपड्या काळेची होती देशभर दहशत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव- तीन सख्ख्या बहिणींसह सात बायकांचा दादला असलेल्या पपड्याचा सर्वाधिक जीव आपल्या 'छबी' नावाच्या प्रेयसीवर जडला. आपल्या छातीवर त्याने छबीचं नावही गोंदवलं... पण छबीवर असलेल्या याच प्रेमामुळे तो पुन्हा गजाआड झाला. पारधी समाजातील सर्वाधिक क्रूर प्रवृत्तीचा गुन्हेगार म्हणून पपड्या देशभर कुप्रसिद्ध आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला हाच पपड्या हवा होता...त्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस महिनाभरापासून जंग जंग पछाडत होते. पण पपड्या आता पूर्वीसारखा दिसत नव्हता. त्याला ओळखणार कसं? हा मोठा यक्ष प्रश्न पोलिसांसमोर होता. पपड्याच्या छातीवर छबी असं नाव गोंदलेलं आहे, हे पथकातील एका अनुभवी पोलिस कर्मचाऱ्यास ठाऊक होते. बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील सेंदला येथे राहत असलेली पत्नी रेखा हिला भेटण्यासाठी पपड्या साधूच्या वेशात आला अन् मोठ्या प्रतीक्षेनंतर अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 

 

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील बाजारपेठेत नेहमीप्रमाणेच नागरिकांची वर्दळ होती. बाजारतळाच्या समोरच लक्ष्मी ज्वेलर्स या दालनाच्या नुतणीकरणाचे काम सुरू होते. दालनाच्या शेजारीच एका छोट्या दुकानात लक्ष्मी ज्वेलर्स तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या तिसऱ्या दिवशी (१८ ऑगस्ट २०१८) याच लक्ष्मी ज्वेलर्ससमोर सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोठा धमाका झाला. हा धमाका एखाद्या बॉम्बचा नसून चक्क आपटबारचा होता. तरी देखील अचानक झालेल्या धमाक्यामुळे परिसरातील नागरिक सैरभर झाले. तेवढ्या २२ ते २५ लोक लक्ष्मी ज्वेलर्समध्ये शिरले. लाकडी दांडके, कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवत दालनाचे मालक श्याम धाडगे यांना मारहाण करण्यास सुरुवात झाली. त्यातील एकाने सरळ धाडगे यांच्या दिशेने पिस्तुल रोखत गोळी झाडली. त्यात धाडगे यांचा जागीच मृत्यू झाला. गाेळीबार करणारा आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून तो 'पपड्या' होता. अवघ्या काही मिनिटातच दालनातील सात किलो सोने व तीन किलो चांदी लुटत आरोपींनी नदीच्या दिशेने धूम ठोकली. 

 

आजुबाजूच्या नागरिकांना काही कळायच्या आतच लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा पडला होता, त्यात धाडगे यांचा हकनाक बळी गेला होता. या घटनेने कोळपेवाडीसह संपूर्ण नगर जिल्हा हादरून गेला. तत्काळ पोलिस तपासास सुरुवात झाली. तब्बल २० पोलिस पथके वेगवेळ्या दिशेने रवाना झाली. तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेकडे होती. दरोडेखोरांनी कोणतेही पुरावे मागे सोडले नव्हते. पोलिसांनी गुन्ह्याच्या 'मोडस ऑपरेन्डी'चा अभ्यास केला. बाहेरच्या राज्यातील एखाद्या टोळीने हा गुन्हा केला असेल, असा पोलिसांचा अंदाज होता. त्यादृष्टिने तपासाची सूत्रे फिरवत राजस्थानपर्यंत शोध घेण्यात आला. पण आरोपींचे कोणतेही धागेदोर मिळाले नाहीत. दरम्यान, घटनेच्या तिसऱ्या दिवशी शिर्डी रस्त्यावर एक दुचाकी पोलिसांना मिळाली. ही दुचाकी औरंगाबाद येथून चोरीला गेली असून ती नेवासे तालुक्यातील नागफणी येथील अजय बंडू काळे याने चोरल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. परंतु या दुचाकीचा व दरोड्याच्या गुन्ह्याचा काही संबंध आहे, याबाबत पोलिस साशंक होते. तरी देखील दुचाकीचोर अजय बंडू काळे याचा शोध पोलिसांनी सुरू केला. त्याची मामी प्रिया जितू भोसले हिच्याकडून अजयचा मोबाइल नंबर मिळाला. त्या नंबरवरील इतर मोबाइल नंबर तपासले असता तब्बल २० ते २५ मोबाइल नंबर घटनेच्या दिवशी कोळपेवाडीपासून २५ किलोमीटर अंतरावर एकाच वेळी बंद करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तोपर्यंत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तथा तपासी अधिकारी दिलीप पवार व त्यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी सुनील चव्हाण यांनी मागील गुन्ह्यांची हिस्ट्री तपासली. त्यात २००५- ६ मध्ये असेच गुन्हे घडले होते, ते सर्व गुन्हे पपड्या याने केल्याचे समोर आले. कोळपेवाडी येथील गुन्हा देखील पपड्या यानेच केला असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले होते. तोपर्यंत दुचाकीचोर अजय यालाही अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली देत पपड्या यानेच हा प्लॅन आखला असल्याचे सांगितले. अजयच्या कबुलीवरून इतर सात- आठ आरोपींनाही वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांकडे पपड्याचे पंधरा वर्षांपूर्वीचे जुने छायाचित्र होते. मात्र, आता पपड्या पूर्णपणे वेगळा दिसत असल्यानेे त्याची ओळख पटत नव्हती. त्यात तो महाराष्ट्र सोडून परराज्यात फरार झाल्याची माहिती समोर आली. तोपर्यंत पोलिसांनी अजयच्या सांगण्यावरून गुन्ह्यातील काही सोने हस्तगत केले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बोरगाव येथील एका सराफास सोने विकल्याची कबुली अजयने दिली होती. दरोडा टाकणाऱ्या टोळीतील काही आरोपी गजाआड झाले, पण मुख्य आरोपी मास्टरमाईंड पपड्या पोलिसांना मिळत नव्हता. वर्धा येथील आदर्शनगरमधील पपड्याच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. त्याची पत्नी व दोन मुलांनाही अटक करण्यात आली तरी पपड्याचे कोणतेच धागेदोरे मिळत नव्हते. अखेर बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील सेंदला येथे राहत असलेली पत्नी रेखा हिला भेटण्यासाठी पपड्या साधूच्या वेशात आला असल्याची माहिती तपासी अधिकारी पवार यांना मिळाली. पण तो पपड्याच आहे, याबाबत पोलिसांना खात्री नव्हती. पत्नी रेखासह पपड्या सेंदला बसस्थानकाकडे चालला असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून पपड्याला ताब्यात घेतले. परंतु 'तो' मी नव्हेच असे म्हणत माझे नाव तुकाराम चव्हाण असल्याचे पपड्या याने पोलिसांना सांगितले. पण पपड्याच्या छातीवर त्याच्या प्रेयसीचे 'छबी' हे नाव गोंदलेले आहे, याची माहिती पवार यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी सुनील चव्हाण यांना होती. चव्हाण यांनी १४ वर्षांपूर्वी पपड्याला एका गुन्ह्यात ताब्यात घेतले होते, तेव्हा त्याच्या छातीवर 'छबी' हे नाव गोंदलेलं होतं. अखेर प्रेयसीच्या याच नावामुळे पपड्या पुन्हा गजाआड झाला. या गुन्ह्यात पपड्यासह १७ आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. उर्वरित अारोपींचा शोध पोलिस करत आहेत. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस अधीक्षक जयंत मीना, श्रीरामपूर विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी दिलीप पवार, उपनिरीक्षक रोहन खंडागळे, हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, योगेश गोसावी, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, अण्णा पवार, विनोद मासाळकर, रवी कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, मनोज गोसावी, मन्सूर सय्यद, सचिन अडबल, संतोष लोढे, राहुल सोळुंके, भागीनाथ पंचमुख, योगेश सातपुते, देवीदास काळे, विजय ठोंबरे, बाबासाहेब भोपळे यांच्यासह मेहेर ठाण्याचे निरीक्षक प्रधान, संजय पवार, देवीचंद चव्हाण, गजानन सानप, पंढरी गिते, उमेश घुगे, अतुल पवार, श्रीराम निळे, गणेश लोंढे, संजय जाधव, देवेंद्र इंगळे आदींनी ही कामगिरी केली. 

 

दोन कोटींचा मुद्देमाल हस्तगत 
गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान समोर होते. आरोपींच्या 'मोडस ऑपरेन्डी'चा अभ्यास करत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. त्यात कुख्यात आरोपी पपड्या याच्यासह १७ आरोपी गजाआड करण्यात यश मिळाले. विशेष म्हणजे गुन्ह्यातील सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला. परराज्यासह औरंगाबाद, वर्धा, बीड, गेवराई, नगर, नाशिक बुलढाणा अशा अनेक ठिकाणी आरोपींचा शोध घेतला. सुरूवातीला वेगवेगळ्या दिशेने तपास केला, परंतु मागील गुन्ह्यांची हिस्ट्री तपासली असता हा गुन्हा पपड्या यानेच केल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती तपासी अधिकारी दिलीप पवार यांनी दिली. 

 

अंत्यविधीला गेला अन् दरोड्याचा प्लॅन केला 
एका गुुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला पपड्या १९ एप्रिल २०१८ रोजी मुलाच्या लग्नासाठी पॅरोलवर सुटला. त्यानंतर सलाबतपूर येथे एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी पपड्या आला. तेथेच कोळपेवाडी येथील दररोड्याचा प्लॅन ठरला. जवळच्या विश्वासू नातेवाईकांना घेऊन मोठी टोळी बनवून गुन्हा करण्याची पपड्याची पद्धत आहे. १९९५ मध्ये रस्ता लूट करणारा पपड्या आताचा मोठा कुख्यात दरोडेखोर आहे. कोळपेवाडी येथील दरोड्यासाठी स्वत: पपड्या व एका महिलेने आठ दिवस रेकी केली होती. संबंधित महिला एका लहान बाळासह तेथील मंदिर परिसरात आठ दिवस राहिली. लक्ष्मी ज्वेलर्सच्या सर्व बारीकसारीक हालचालींवर तिने लक्ष ठेवले. त्यानंतर १८ ऑगस्टच्या सायंकाळी साडेसातची वेळ दरोडा टाकण्यासाठी निश्चित करण्यात आली. 

 

अनुभवी चव्हाण यांनी पपड्याला ओळखले 
हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण गेल्या २० वर्षांपासून पारधी समाजातील गुन्हेगारांची जंत्री गोळा करत आहेत. १४ वर्षांपूर्वी त्यांनी पपड्याच्या छातीवर कोरलेले त्याच्या प्रेयसीचे नाव पाहिले होते. त्यामुळेच १४ वर्षानंतरच्या पपड्याची ओळख पटणे शक्य झाले. अन्यथा 'तो' मी नव्हेच असा सूर पपड्याचा होता.

 

कुख्यात गुंड पपड्या काळेची देशभर दहशत 
पपड्या ऊर्फ संजय ऊर्फ राहुल व्यंकटी ऊर्फ महादू ऊर्फ महादेव ऊर्फ गणपती काळे ऊर्फ तुकाराम चव्हाण (५५, सुदर्शननगर, वर्धा) याचे देशभरातील गुन्हेगारी टोळ्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. सातपैकी एका पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिचा खून पपड्याने केलेला आहे. त्याचबरोबर यवतमाळ येथील एका पोलिस उपनिरीक्षकाचा खूनही पपड्या याने केलेला आहे. खून- दरोड्याचे अनेक गुन्हे पपड्याने केलेले आहेत. देशभरात जेवढा पारधी समाज आहे, त्यात सर्वाधिक क्रूर प्रवृत्तीचा गुन्हेगार अशी पपड्याची ओळख आहे. पारधी समाजातील भले-भले गुन्हेगार पपड्याला घाबरतात. एका गुन्ह्यात विशाखापट्टणम येथील कारागृहात शिक्षा भोगत असताना पपड्याची नक्षलवाद्यांचा म्होरक्या 'अण्णा'शी मैत्री झाली. अण्णाने त्याला १६ नक्षलवाद्यांची एक तुकडी सांभाळण्याची ऑफर दिली होती. त्यासाठी महिना पाच लाख देण्याची तयारी अण्णाने दाखवली होती. क्रूर प्रवृत्तीच्या पपड्याला कोणतेही व्यसन नाही, हे एक विशेषच. वर्धा येथे त्याच्या मालकीची २५ एकर शेती व एक टोलेजंग बंगला आहे. नेवासे तालुक्यातील सलाबतपूर येथे लहानाचा मोठा झालेला पपड्या बीड, जळगाव जिल्ह्यात राहिला. नंतर वर्धा शहरात तो स्थायिक झाला. 

 

१९ एप्रिलला पपड्या पॅरोलवर 
०८ दिवस केली रेकी 
१८ ऑगस्टला टाकला दरोडा 
२४ सप्टेंबरला पपड्या जेरबंद 

बातम्या आणखी आहेत...