आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मदात्या आईने आधी पोटच्या गोळ्यांना संपवलं; नंतर स्वतःही घेतला गळफास, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम- आईने आपल्या दोन पोटच्या गोळ्यांसह स्वतःही आत्महत्या केल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील तोंडगावात घडली. घटनेमुळे परिसरात सर्वांनाच धक्का बसलाय. जयश्री गजानन गवारे(28) असे महिलेचे नाव आहे तर गणेश गजानन गवारे(05) आणि मोहित गजानन गवारे(03) अशी दोन चिमुकल्यांची नावे आहेत. दरम्यान आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण कौटुंबीक वादातून ही आत्महत्या झाली असल्याचा पोलिसांचा संशय आहे.


वाशिम तालुक्यातील तोंडगावातील रहिवासी असलेल्या जयश्री यांचा विवाह तालुक्यातील जांभरुण नावजी येथील गजानन गवारेसोबत झाला होता. काही वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांना दोन आपत्ये झाली. या दरम्यान पती-पत्नीत अनेकवेळा वाद व्हायचा आणि शेवटी हा वाद पोलिसांपर्यंत गेला. यानंतर जयश्री मागील काही महिन्यांपासून मुलांसह आपल्या माहेरी तोंडगावात राहण्यास आल्या होत्या.


आज(18 जुलै)सकाळी चिमुकल्यांना शाळेत पाठवण्याची तयारी सुरू असताना जयश्री यांनी दोन्ही चिमुकल्यांना फाशी दिल्यानंतर स्वत:ही घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनाम्यानंतर मृतदेह तपासणीसाठी पाठवले आहेत.


जयश्री यांची आत्महत्या कौटुंबीक वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी तपास केल्यानंतरच नेमके कारण समोर येईल. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलिस करत आहेत. दोन चिमुकल्यांसह महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.