harassment / वडिलांचा ३० वर्षांपासून आईला त्रास; जळगावात आठ दिवसांपासून कुटुंबाने घेतले कोंडून

 पित्याला घराबाहेर काढून आईसह भावंंडांनी अन्नपाणी केले त्याग, प्रकरण काेर्टात गेल्यानंतर सत्य उजेडात

प्रतिनिधी

Jun 14,2019 11:45:00 AM IST

जळगाव - ३० वर्षांपासून वडील आईला त्रास देत असल्याच्या कारणाने दोन मुलींनी आई, भाऊ व एक दीड वर्षाच्या बालिकेसह सात दिवस बंगल्यात कोंडून घेतले. आठवडाभरात त्यांनी अन्नत्याग करून केवळ पाण्यावर उदरनिर्वाह केला. हा प्रकार वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीच न्यायालयात अर्ज करून हे प्रकरण उघडकीस आणले. न्यायालयाच्या आदेशानंतर कुटुंबातील सदस्यांना घराबाहेर काढून वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
शहरातील रणछोडदासनगर येथील ही घटना आहे. दिनकर रामदास पाटील (वय ६२) यांची रेणुका इंजिनिअर्स नावाची कंपनी आहे. ते पत्नी वैशाली (वय ५२), मुलगा उमाकांत (वय ३२), मुलगी रेणुका (वय २९) यांच्यासह रणछोडदास नगरातील बंगल्यात राहतात. तर मोठी विवाहित मुलगी राजश्री जयदीप चव्हाण (वय ३४) ही पुण्याला राहते.


रेणुका हिने दिलेल्या माहितीनुसार, वडील गेल्या ३० वर्षांपासून आई वैशाली हिला शारीरिक, मानसिक त्रास देत होते. या प्रकाराला कंटाळून २ जून रोजी वैशाली पाटील, रेणुका, उमाकांत व विवाहित मुलगी राजश्री यांनी वडिलांना घराबाहेर काढले होते. त्यानंतर या सदस्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले. ४ जूनपासून त्यांनी अन्नत्याग केला. केवळ पाणी पिऊन उदरनिर्वाह करत होते. राजश्रीची दीड वर्षाची मुलगी आर्या हिला मात्र जेवण देत होते. या दरम्यान दिनकर हे कंपनीतच झोपत होते. ११ जून रोजी त्यांनी घरी जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी घरातील सदस्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे पाटील यांनी गुरुवारी थेट न्यायालय गाठले. न्यायाधीश अक्षी जैन यांच्या न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन कुटुंबीयांची सुटका करावी, अशी मागणी केली. न्यायालयाने तत्काळ दखल घेऊन पोलिसांना आदेश दिले. त्यानुसार दुपारी १ वाजता पाेलिस पाटील यांच्या बंगल्यात गेले. त्यांनी विनंती केल्यानंतर सदस्यांनी घराचा दरवाजा उघडला. अाता न्यायालयाच्या आदेशाने पाेलिस सर्वांचे जबाब नाेंदवणार आहेत.


अन्नत्यागामुळे घटले वजन...
पोलिसांनी वैशाली, रेणुका, उमाकांत, राजश्री व दीड महिन्यांची मुलगी आर्या यांना रुग्णालयात आणले. आमची तब्येत बरी असून, आम्हाला वैद्यकीय तपासणीची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. पण न्यायालयाच्या आदेशामुळे डॉक्टरांनी सर्वांची तपासणी केली. उपाशी राहिल्याने त्यांचे वजन कमी झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला.

X
COMMENT