आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीच्या वादातून तीन मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; हिंगोलीत घडली खळबळजनक घटना, तोंडगावची पुनरावृत्ती टळली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- पतीसोबत झालेल्या वादातून पत्नीने एका किडे मारण्याचे विषारी औषध आपल्या मुलांना देऊन स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या तिघांनाही हिंगोलीतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

शहरातील आजम कॉलनी येथील जगताप दाम्पत्यात वाद झाला. त्यानंतर अनिता मुंजाजी जगताप(32) यांनी वैष्णवी जगताप(17), साईनाथ जगताप(14) आणि अनिकेत जगताप(12) यांना विषारी औषध देऊन स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

काय आहे प्रकरण ?
महिलेच्या पतीला दारुचे व्यसन आहे. त्यातून त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे आणि घटनेच्या दिवशी म्हणजेच बुधवारीही त्यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर महिलेने आपल्या तीन पोटच्या गोळ्यांना विषारी औषध पाजले आणि नंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्यापूर्वीच ही बाब लक्षात आल्याने त्यांना तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला. 


यापूर्वीही घडली अशीच घटना
पती-पत्नीच्या वादातून यापूर्वीही अनेक वेळा आपल्या पोटच्या मुलांना ठार मारून स्वतः आत्महत्या करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. आठ दिवसांपूर्वीच हिंगोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव या गावात सुद्धा अशीच घटना घडली होती. या घटनेमध्ये एका निर्दयी मातेने स्वतः आत्महत्या केलीच, शिवाय दोन चिमुकल्यानाही आधी फाशी दिली होती. हिंगोलीत सुद्धा याच घटनेची पुनरावृत्ती होता-होता मातेसह बालकांचा जीव वाचला आहे. 

 

मानसिक तणावाखाली असणारे पती-पत्नी आपल्या मुलांना विष घालतात, त्यांना रेल्वे खाली किंवा विहिरीत फेकून मारतात किंवा फाशी देतात. अशा घटना  नेहमीच घडत असून त्यामुळे निष्पाप चिमुकल्यांना आपला जीव गमावावा लागत आहे. त्यामुळे अशा पालकांवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे, मुलांचा खून करणे/जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या बाबिखाली गुन्हे दाखल करण्यात यावेत किंवा त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करुन पालकांचे समुपदेशन करण्यात यावे, अशी मागणी मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा नेते केशव अवचार यांनी केली आहे.