आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसोबत झालेल्या घरगुती भांडणातून दोन चिमुकल्यांसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहकर- पतीसोबत झालेल्या घरगुती भांडणातून एका २७ वर्षीय विवाहितेने रागाच्या भरात आपल्या दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हृदयाला पाझर फोडणारी ही घटना सोमवारी (ता.7) मेहकर तालुक्यातील बाभुळखेड येथे सकाळी 10 वाजता घडली.

 

दरम्यान, जोपर्यंत मृतकाच्या पतीस अटक करण्यात येत नाही, तोपर्यँत मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका महिलेच्या नातेवाइकांनी घेतली. त्यामुळे मेहकर ग्रामीण रुग्णालयासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

मेहकर भाग दोन शिवारातील बाभुळखेड येथील भाऊराव वानखेडे यांच्या शेतात अंकुश गायकवाड (वय 32) हा काही वर्षांपासून  कामाला होता. पत्नी व दोन मुलासह अंकुश शेतात राहत होता. दरम्यान, काही महिन्यापूर्वी अंकुशच्या सासूचे निधन झाल्यामुळे त्याचे सासरे शिवाजीराव बकाल हे मुलीजवळ येथेच राहत होते. घरगुती कारणावरून पती अंकुश व पत्नी मनीषा यांच्यात वाद सुरू होता.आज सकाळी शेतात काम करीत असताना पती अंकुश व मनीषा यांच्यात वाद झाला. यावेळी मनिषाने आज सकाळी वडील शिवाजी बकाल यांना ऑटोत बसून मेहकरकडे रवाना केले. तर पती अंकुश हा काही कामासाठी गावात गेला होता. त्यानंतर रागाच्या भरात मनीषाने आपली दोन चिमुकले समर्थ (वय 6) व युवराज (वय 3) यांच्यासह शेजारील रामभाऊ पातूरकर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर पती अंकुश गायकवाड हा शेतात आला असता त्याला पत्नी व दोन्ही मुले दिसून आली नाहीत. त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता पत्नीच्या चपला पाण्यावर तरंगताना दिसून आल्या.

या घटनेची माहिती त्याने चुलत भावासह सरपंच निलेश खोकले यांना दिली. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार तहसीलदार संतोष काकडे, ठाणेदार आत्माराम प्रधान, संजय जाधव, गणेश लोढे, प्रभाकर सानप, प्रदीप वायाळ व सुभाष रिंढे या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने पत्नी मनीषा व मोठा मुलगा समर्थ यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. परंतु शंभर फुट खोल असलेल्या विहिरीत 60 फुट पाणी असल्यामुळे लहान मुलगा युवराजचा मृतदेह सापडत नव्हता. अखेर ग्रामस्थांनी दोन मोटार पंप लावून विहिरीतील पाण्याचा उपसा केला. त्यानंतर लहान मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. पोलिसांनी शवविच्छेदन करण्यासाठी तिन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवले.

 

बातम्या आणखी आहेत...