आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​घाटीऐवजी दूध डेअरीच्या जागेवर उभारणार माताबाल रुग्णालय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- घाटी रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून (एमसीएच विंग) ३८ कोटी रुपये खर्चून माता बाल रुग्णालय उभारण्यात येणार होते. मात्र, आता हे रुग्णालय घाटी प्रांगणाएेवजी जालना रोडवरील शासकीय दूध डेअरीच्या जागेत उभारले जाणार आहे. आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे घाटीतील यंत्रणेवरील ताण कमी होणार असून महिला आणि बालकांना एकाच छताखाली आरोग्य सेवाही उपलब्ध होणार आहे.

 

घाटीत दररोज ८० ते ९० प्रसूती होतात. मनुष्यबळ आणि यंत्रणा या दोन्हींवर कामाचा प्रचंड ताण आहे. जागा कमी पडत असल्याने घाटीत नव्या आणि विस्तृत जागेची आवश्यकता होती. प्रारंभी एमसीएच विंग घाटीत उभारली जाणार होती. या दृष्टीने कामांना वेग आला होता. या निर्णयाने त्यात बदल झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या या योजनेत लक्ष घालून अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी या रुग्णालयासाठी पाठपुरावा केला.

 

राज्य व केंद्र शासनाकडे स्वतंत्र ३०० खाटांचा प्रस्ताव पाठवला होता. या विंगसाठी "लक्ष' योजनेअंतर्गत ३८ कोटींची मान्यता जुलै महिन्यात मिळाली. एनआरएचएमने पाच कोटींची मंजुरी दिली होती. त्यानुसार जी प्लस फाइव्ह इमारतीचा प्रस्तावही घाटीकडून देण्यात आला होता. त्यानंतर तो प्रस्ताव वाढवून सात मजली इमारतीचा ७२ कोटींचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या बांधकाम विभागाकडून पाठवण्यात आला. या इमारतीसाठी घाटीच्या मेडिसीन विभागाशेजारील जागा एनआरएचएमच्या अधिकाऱ्यांनी आठ महिन्यांपूर्वीच निश्‍चित केली होती. आरोग्य खात्यातील या मोठ्या बदलाबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी अधिकृत दुजोरा दिला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग सक्षम करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आल्याचे ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...