आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुभव : मोठी आई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या जन्मदात्या आईस सर्वसामान्य स्वाभाविक संबोधनाने न ओळखता अन्य प्रकारे हाक देणारे अनेक जण आहेत. आमच्या घरोब्याच्या देशमुख कुटुंबातील भावंडे त्यांच्या आईस मामी म्हणत, तर माझी सौभाग्यवती आणि तिची भावंडं त्यांच्या आईस वहिनी म्हणतात. मी मात्र माझ्या आईस अक्का आणि काकूला आई म्हणत असे. एकदा एक विचित्र प्रसंग माझ्यावर बेतला. मी पहिली वा दुसरीत असेन. आष्टीच्या वाड्यात जेवणाच्या पंगती सुरू होत्या. मुलांची पंगत उरकून निमंत्रित प्रतिष्ठितांची पहिली पंगत सुरू झाली होती. आम्ही मुले बैठकीत पानसुपारीच्या डब्यातून बडीशोप खात होतो. बेरक्या अरुणदादाला काय खोडकर शक्कल सुचली कोण जाणे, त्याने मला सिगारेट ओढायची का विचारले अन् एक सिगारेट माझ्या हाती दिली. पुढे काय होणार याची कल्पना असल्याने त्याने लगेच पोबारा केला. मी अगदी फुशारकीने थोरामोठय़ांच्या पंगतीकडे कूच केले. मला त्या अवतारात पाहून माझे वडील खूप चिडले. गावातील प्रतिष्ठितांसमोर मी त्यांचा अपमान मांडला होता. ते पानावरून ताडकन उठले. त्यांचा राग पाहिला होता; परंतु रौद्ररूप त्याच दिवशी अनुभवले. मला काही सुचेना. मी तेथून पळ काढला आणि थेट आईला जाऊन बिलगलो. तिथे कसे सुरक्षित वाटे. त्या दिवशी मला त्या सुरक्षा कवचाची इतर कोणत्याही वेळेपेक्षा जास्त गरज होती. युक्ती कामी आली. आईने तिच्या भाषेत दादाला समजावले. शांता वहिनीच्या शब्दाचा मान राखत दादांनी रागावर आवर घातला. हातातील क्रिकेटचा स्टंप बाजूला टाकल्याचा आवाज आला आणि मी मोकळा श्वास घेतला. या माझ्या मातृतुल्य अशा अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्त्वास शतश: प्रणाम !!