Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Movement in Mumbai; Parbhani got 50 Rohithe

मुंबईत आंदोलन; परभणीला मिळाले ५० रोहित्रे, खा.संजय जाधव यांचा प्रकाशगडाला घेराव

प्रतिनिधी | Update - Dec 08, 2018, 08:19 AM IST

व्यवस्थापकीय संचालकांकडून दखल

 • Movement in Mumbai; Parbhani got 50 Rohithe

  परभणी- वीज वितरण कंपनीच्या जिल्ह्यातील ढेपाळलेल्या कारभाराच्या निषेधार्थ खा.संजय जाधव यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील शेतकरी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मुंबईत महावितरणच्या प्रकाशगड या कार्यालयाला घेराव घातला. या आंदोलनाची दखल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी घेत लगेचच जिल्ह्याला तातडीने ५० रोहित्रे बसवण्याचे आदेश दिले आहेत.

  जिल्ह्यात वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना रोहित्रे दिली जात नाहीत. गेल्या दोन वर्षापासून रोहित्रांची प्रतीक्षा यादी वाढतच चालली आहे. सद्यस्थितीस २५० रोहित्रांची प्रतीक्षा यादी आहे. याशिवाय नादुरुस्त रोहित्रांची संख्या मोठी आहे. शेतक-यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नाही, आदी प्रश्नांवर खा.जाधव यांनी गेल्या काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा, आंदोलने केली. मात्र महावितरणकडून दाद मिळत नसल्याने खा.जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच महावितरणचे मुख्य कार्यालय असलेल्या मुंबईतील प्रकाशगड येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

  खा.जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले होते. त्यांनी प्रकाशगड येथे दुपारी बाराच्या सुमारास जोरदार आंदोलन सुरू केले. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार व श्री साबू यांच्या समोर अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचे पुरावे सादर केले.

  तातडीने दिले आदेश

  व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी प्रतीक्षा यादीतील ५० रोहित्रे तत्काळ देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रोहित्र दुरुस्त करणाऱ्या चार कंपन्या बंद अवस्थेत आहेत. त्या येत्या १५ दिवसांत सुरू करण्याचे आदेशही दिले. त्याच बरोबर ज्या ठिकाणी ३३ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित आहेत. त्या जागेवर सोलार प्लँट तातडीने बसवण्याचे आदेशही दिले.

Trending