आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एल्गार- साडेतीन हजार ठेवीदारांचा मोर्चा; 'पहले भुगतान, नंतर मतदान'; अन्यथा 'नोटा'च !

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्ह्यातील विविध नॉन बँकिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व ठेवीदार, ग्राहक व प्रतिनिधी यांची रक्कम व्याजासह परत मिळावी, या मागणीसाठी सुमारे तीन ते साडेतीन हजार ठेवीदारांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे ठिय्या आंदोलन करुन ठेवीदारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. प्रशासनाला लेखी निवेदन देऊन पुन्हा एकदा या विषयाकडे लक्ष वेधण्यात आले. आपल्याला न्याय मिळाला नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये हे कोणालाही मतदान न करता 'नोटा'चा पर्याय स्वीकारला जाईल, असा इशारा ठेवीदारांनी यावेळी दिला. 

 

सन २०१० पासून नगर जिल्ह्यातील अनेक सामान्य गुंतवणूकदारांनी, तसेच गाेरगरीब, कष्टकरी, नोकरदार, महिला, शेतमजूर आदी ठेवीदारांनी स्वत:, तसेच विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींमार्फत अनेक खासगी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. पीएसीएल, बीएनपी, रिअल इस्टेट अँड अलाईड, एनआयसीएल, जनसहारा, मैत्रेय, प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर्स, एचबीएन डेअरिज, ट्विंकल ग्रुप ऑफ कंपनी, पॅन कार्ड क्लब, समृद्धी जीवन, धनवर्षा कंपनी, जीवन मल्टीस्टेट आदी कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक केली आहे. 

 

वरील कंपन्यांमध्ये प्लॉट खरेदी, दैनंदिन बचत, मुदत ठेव, पेंशन प्लॅन आदी आकर्षक योजना व सुलभ परताव्याच्या आमिषाला बळी पडून कंपन्यांच्या साखळी पद्धतीने व इतर मार्गांनी केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीमध्ये सहभाग घेऊन रक्कम गुंतवलेली आहे. अशा प्रकारे केवळ नगर जिल्ह्यातील अंदाजे २ लाख ठेवीदारांचे व गुंतवणूकदारांचे किमान २ हजार कोटींच्या वर रक्कम वरील कंपन्यांमध्ये अडकली आहे. ही रक्कम कशी वसूल करावी, असा प्रश्न ठेवीदारांना निर्माण झाला आहे. 

 

संबंधित ठेवीदार आणि कंपन्यांचे प्रतिनिधी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत आहेत. त्यामुळे कलुषित वातावरण निर्माण झाले आहे. काही कंपन्यांच्या बाबतीत न्यायालयाने गुंतवणूकदारांच्या बाजूने निकाल देऊनही अद्यापपर्यंत सामान्य गुंतवणूकदारांना रक्कम मिळालेली नाही. वरील सर्व कंपन्या इतर राज्यातील असून अनेक वेळा प्रतिनिधी व ग्राहकांनी शासन दरबारी मागणी करुनही अजून त्यांना न्याय मिळालेला नाही. 

 

त्यामुळे ग्राहक व प्रतिनिधींनी धडक मोर्चाद्वारे शासनाला जाग यावी, लोकांच पैसे लवकर परत मिळावेत, यासाठी जाहीर निवेदन दिले. या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे यांनाही पाठवलेल्या आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात काही गुंतवणूकदारांनी भाषणे करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. ठेवीच्या रकमा परत मिळाल्या नाही, तर कुटुंबासह रस्त्यावर येऊ, अशी आर्त सादही घातली. जिल्ह्यातील विविध नॉन बँकिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व ठेवीदार, ग्राहक व प्रतिनिधी यांची रक्कम व्याजासह परत मिळावी, या मागणीसाठी ठेवीदारांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 

 

झोळी करुन मागितली वर्गणी 
बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास वाडिया पार्क येथून निघालेला ठेवीदारांचा शिस्तबद्ध मोर्चा स्टेशन रस्त्यावरुन इंपिरिअल चौकात आला. तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चा आल्यानंतर तेथेही पुष्प्हार अर्पण करण्यात आला. तेथून एसबीआय चौकात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मोर्चा आला. या मोर्चादरम्यान काही ठेवीदारांनी हातात झोळी घेऊन ठेवीच्या रकमा परत मिळाव्यात, अशी मागणी केली. त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जात होते. 

 

घातला जागरण गोंधळ 
ठेवीदारांचा शिस्तबद्ध मोर्चा कुठलाही अनुचित प्रकार न घडू देता सुमारे दोन किलोमीटर पायपीट करुन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आला. शिस्तीत आलेल्या मोर्चाने कोठेही वाहतूक कोंडी होऊ दिली नाही. मोर्चाची कल्पना असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे, तसेच प्रमुख चौकांमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आल्यानंतर काही ठेवीदारांनी प्रतीकात्मक जागरण गोंधळ सादर करत आपल्या मागण्या व्यक्त केल्या. 

 

तीन तासांचा शिस्तबद्ध मोर्चा 
वाडिया पार्कमधून निघालेला मोर्चा शिस्तबद्ध रितीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आला. तेथे आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. मोर्चेकऱ्यांच्या हातात मागण्यांचे फलक होते. तर काहींच्या डोक्यावर 'ठेवीचे पैसे द्या, मत घ्या', अशा गांधी टोप्या घातलेल्या होत्या. घोषणाबाजी करुन प्रातिनिधीक भाषणे झाल्यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना लेखी निवेदन दिले. आपल्या मागण्या शासनाकडे लवकर पोचवू, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. 

 

विश्वास ठेवूच नका... 
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने निवेदन देताना पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या. आपल्या कमाईची रक्कम अशा कंपन्यांमध्ये अडकल्याचे नमूद करताना काही महिलांचे डोळे पाणावले. त्यावर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगताना आकर्षक योजना दाखवून लुबाडणाऱ्या कंपन्यांमध्ये आपला पैसा ठेवू नये, त्यांच्या येाजनांवर विश्वास ठेवताना शहानिशा करुनच गुंतवणूक करावी, असा सल्ला दिला. हा सल्ला कितीजण गांभीर्याने घेतात, हे पहायचे.