आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत किसान मुक्ती माेर्चा, आज संसदेवरही धडकणार:कर्जमुक्ती, कृषी मालास योग्य भाव देण्याची आग्रही मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डाव्या संघटनांशी संबंधित देशभरातील शेतकऱ्यांनी गुरुवारी दिल्लीत किसान मुक्ती माेर्चा काढला होता. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप करून संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आंदोलकांनी केली.


अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी व कृषी मालास योग्य भाव देण्याची मागणी लावून धरली आहे. गुरुवारच्या किसान माेर्चाचे नेतृृत्व स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव व जय किसान आंदोलनाचे नेते अविक साहा यांनी केले. हा मार्च दोनदिवसीय आहे. पहिल्या दिवशी माेर्चाची सुरुवात ब्रिजवासनपासून झाली. त्याचा समारोप रामलीला मैदानावर झाला. मोर्चामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. आंदोलनात पश्चिम बंगाल, गुजरात, आंध्र प्रदेश, आेडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, राजस्थानसह देशभरातील शेतकरी सहभागी झाले होते.आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रावरील संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्राने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी शुक्रवारी संसदेच्या दिशेने मोर्चा काढला जाणार आहे. त्यासाठी दोन खासगी विधेयक मंजूर करावेत, असे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या विधेयकांना खासदार के.के. रागेश व खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेच्या पटलावर मांडले होते.
आम्ही अन्नदात्याशी जोडलेलो : योगेंद्र यादव

 

ब्रिजवासन येथून मोर्चा सुरू करताना महिला शेतकऱ्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. कारण त्या किसान मुक्ती मोर्चात सहभागी होण्यासाठी तयार आहेत. तुम्ही शेतकरी नसाल तरीही आंदोलनात सहभागी व्हा. आपल्या अन्नादात्याशी जोडले जा. जय किसान, असे मोर्चा सुरू होण्यापूर्वी स्वराजचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी ट्विट करून सांगितले.दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. माकप नेते हन्नान मोल्ला म्हणाले, शेतकरी शुक्रवारी रामलीला मैदानातून संसदेच्या दिशेने मोर्चा नेतील. संसदेवरील मोर्चालाही परवानगी देण्यात आलेली नाही. उद्या सकाळपर्यंत ही परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

 

अनेक आंदोलने आणि मोर्चांचे साक्षीदार असलेले राजधानी दिल्लीतील रामलीला मैदान लाल, हिरव्या, निळ्या झेंड्यांनी आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांच्या संघटनांनी फुलून गेले आहे. दिल्लीच्या चार दिशांहून निघालेले चार मोर्चे रामलीला मैदानावर दाखल झाले असून शुक्रवारी संसदेवर अखिल भारतीय किसान महामोर्चा निघणार आहे. यात महाराष्ट्रातून किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि लोकसंघर्ष मोर्चा या संघटनांचे ५ हजार शेतकरी दिल्लीत धडकले आहेत.


 स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी यासाठी तयार केलेले शेतकरी संपूर्ण कर्जमाफी विधेयक २०१८ आणि शेतीमाल हमीभाव विधेयक २०१८ ऑगस्ट महिन्यातील पावसाळी अधिवेशनात लोकसभेच्या सत्रात ठेवले. त्याला २१ राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. दरम्यान, गुरुवारच्या या मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे अध्यक्ष डॉ अशोक ढवळे, किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले, मेधा पाटकर, कामगार नेते विजू कृष्णन, मध्य प्रदेशचे शेतकरी नेते सुनीलम, पश्चिम बंगालचे खासदार हनन मोल्ला यांनी केले.

 

किड्यामुंग्यांसारखे मरू देऊ नका - राजू शेट्टी
देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या संघटितपणे शेतकरी एकत्र आले आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे मान्य करावेच लागेल. आम्ही काही वेगळे आणि मोठे मागत नाही आहोत. सरकारने केलेल्या घोषणा प्रत्यक्ष आणण्यासाठी शेतकरी फक्त विशेष सत्राची मागणी करत आहेत. शेतकऱ्यांची कर्ज हे त्यांचे व्यक्तिगत कर्ज नाही, तर सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे थकलेली कर्जे आहेत. त्यामुळे संपूर्ण कर्जमुक्ती आणि कायदेशीर हमीभाव हे दोन कायदे एकाच वेळी मंजूर झाले तरच शेतकरी संकटातून वाचू शकतो, असेे शेतकरी नेते खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.

 

सरकारने हा असंतोष दडपू नये - डॉ. अजित नवले 
मुंबईचा महामोर्चा फक्त किसान सभेचा मोर्चा होता. मात्र, येथे देशातील दोनशेहून अधिक शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देणारे तरुण, नोकरदार, विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक, कामगार हे सारे ‘नेशन फॉर फार्मर’ बॅनरखाली सहभागी झाले आहेत. एवढा असंतोष दडपण्याचा सरकारने प्रयत्न केला किंवा याकडे दुर्लक्ष केले तर त्याची मोठी किंमत भाजपला चुकवावी लागेल असे वातावरण इथे तयार झाले आहे, असे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...