आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : आयुष्याची नागमोडी वळण सरळ प्रवासात सांगणारा ‘जलेबी’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेटिंग 2  स्टार  
कलावंत  रेहा चक्रवर्ती, वरुण मित्रा, दिगंगना सुर्यवंशी, अनया दुरेचा, पुर्ती आर्या, सोनाली सुदान, फरिदा दादी, युसूफ हुसैन आणि अर्जुन कनोगो
दिग्दर्शक पुष्पजित भारद्वाज
पटकथा/ कथा कौसर मुनीर-पुष्पजीत भारद्वाज
संगीत जीत गांगुली-तनिष्क बागची-जावेद महोसिन-अभिषेक मिश्रा आणि सॅम्युअल आकांक्षा
श्रेणी  प्रेमपट

आएशा आणि देव यांच्या प्रेमकहाणीची नागमोडी वळण मुंबई-दिल्ली प्रवासादरम्यान उलगडणारी ही कहाणी आहे. पुष्पजीत भारद्वाज यांच्या जलेबीचा विषय चांगला असला तरीही पटकथा कमकुवत झाली म्हणून चित्रपट पसंतीस उतरणारा नाही. पार्श्वसंगीत आणि संगीत चांगले झाले आहे. तर रेहा चक्रवर्ती आणि दिगंगना सुर्यवंशी दोन्ही ताजे चेहरे लक्ष वेधणारे आहेत. 


भारतात विवाह संस्थेला सर्वोच्च महत्त्व आहे. यातील एका कंगोऱ्याला स्पर्श करणारी ही कहाणी आहे. विषय भारतीय प्रेक्षकांना भावणारा असला तरीही पटकथा सशक्त नसल्याने चित्रपट कापलेल्या पतंगाप्रमाणे सतत भरकटत असल्यासारखा वाटतो. फ्लॅशबॅकमध्ये मागे पूढे होत राहणारा चित्रपट प्रेक्षकांची लय वारंवार तोडतो. असे असले तरीही नेमके काय झाले आहे, याची उत्सुकता ताणून ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. नव्या चेहऱ्यांचा ताजेपणा यात जाणवतो मात्र, भावनांना स्पर्श करण्यात दिग्दर्शक कमी पडले आहेत. चित्रपटात विनाकारण केलेली पात्रांची जंत्री प्रेक्षकांपूढे प्रश्न उपस्थित करणारी आहे. 


आएशा आणि देव एका पर्यटन सहलीत भेटतात. आएशाला लेखिका बनायचे आहे आणि जग भटकायचे आहे. तर देव मात्र, पुर्वजांच्या वास्तु, दिल्लीतील नागमोडी आणि अरूंद गल्यांत रमणारा आहे. प्रेमाचे रुपांतर विवाहात तर होते. मात्र, नव्या जुन्या संस्कृतीची मोट बांधली जात नाही. तरुण पिढीला स्वत:चे स्वातंत्र सर्वोच्च आहे तर जुन्या पिढीला रितीरिवाज आणि संस्कृती जपायची आहे, यातून आयुष्यात वादळ निर्माण होते अन नाती तुटतात. हे आजच्या समाजाचे चित्रण दाखवण्याचा भारव्दाजांचा प्रयत्न होता. 

 

चित्रीकरण चांगले झाले आहे. चित्रपटाची प्रत्येक चौकट कहाणीत महत्त्वाची ठरेल अशी आहे. पार्श्वसंगीतही चपखल झाले आहे. एक जुनी हवेली आणि रेल्वेचा एसीचा डबा यामध्येच 80 टक्के चित्रीकरण झाले आहे. चित्रपटनिर्मिती चांगली झाली आहे. चित्रपट कौशल्य उत्तम वापरले गेले अन् विषयही भारतीय रूचीला साजेसा होता. तरीही पटकथा सशक्त नसल्याने चित्रपट अपेक्षित परिणाम साधू शकत नाही. 

 

कथा :
देव आणि आएशा या जोडप्याची ही कहाणी आहे. एका सहलीत दोघांची भेट होते. देव टूरिस्ट गाईड तर आएशाला मोठी लिखिका व्हायचे आहे. या दरम्यान दोघे प्रेमात पडतात, त्याचे रुपांतर पूढे लग्नात होते. मात्र, विवाहाची जबाबदारी घेण्याची आएशाची तयारी नसते. देवची आई आणि आएशा यांच्यात कुरबूर सुरु होते. पारंपरिक भारतीय विचारसरणी आणि आधुनिक करिअर केंद्रीत महिला हा संघर्ष इथे सुरु होतो. सहनशिलता, त्याग कमी पडू लागतो अन नाते दुरावते. पूढे काही वर्षांनी रेल्वे प्रवासादरम्यान दोघांची भेट होते. या प्रवासात अनेक भावना दाटून येतात, अनेक रहस्य खुली होतात, हे पाहण्यासाठी मात्र चित्रपटगृहात जा. 

 

दिग्दर्शन :   
चित्रपट तांत्रिकदृष्ट्या चांगला झाला आहे. प्रत्येक दृष्याची चौकट लयबद्ध आहे. तांत्रिकबाजू, प्रेक्षकांशी सूक्ष्म स्तरावर साधला जाणारा संवाद चांगला झाला असला तरीही कहाणीतून भावनिक संवाद होत नाही, यामुळे चित्रपट कमी पडतो. सहाय्यक कलावंतांच्या व्यक्तिरेखा विनाकारण चित्रपटात घातल्याचे स्पष्ट जाणवते. मुळ कथेशी त्यांच्या संबंध दिसतच नाही. वेळ आणि जागेमध्ये प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे कौशल्य पटकथेमुळे हातातून निसटले आहे. 

 

अभिनय : 
रेहा चक्रवर्ती आणि दिगंगना सुर्यवंशी हे दोन्ही आकर्षक चेहरे लक्षवेधी आहेत. सहाय्यक कलावंतांच्या व्यक्तिरेखा खूप कमजोर वाटतात.

 

संगीत : 

चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत उत्तम झाले आहे. कथेला साजेशी गाणी आहेत. तर कथानकाला पूढे नेणारे पार्श्वसंगीत अचूक ठिकाणी पेरले गेले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...