Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | MP Chandrakant Khaire controversy at medical camp Aurangabad

'कुंकवाची पुडी, मंतरलेल्या नाडी'ने रुग्ण करतो बरे! आरोग्य अधिकाऱ्यांसमोरच खासदार चंद्रकांत खैरेंची बुवाबाजी

दिव्य मराठी विशेष | Update - Feb 24, 2019, 11:47 AM IST

औरंगाबादेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 • MP Chandrakant Khaire controversy at medical camp Aurangabad

  औरंगाबाद - राज्याच्या आरोग्य उपसंचालकांपासून आरोग्याधिकाऱ्यांपर्यंत सर्व उच्चपदस्थ वैद्यकीय तज्ज्ञांच्या उपस्थितीतच खासदार चंद्रकांत खैरे यांनी वैद्यकीय उपचारांवर 'कुंकवाची पुडी' आणि 'मंतरलेली नाडी' कशी मात करते हे शनिवारी रंगवून सांगितले. किंबहुना आपण या पुडी आणि नाडीच्या जोरावर अनेक रुग्णांना मृत्युशय्येवरून परत आणले, असा दावाही त्यांनी हजारो रुग्णांसमोर केला. त्यामुळे वैद्यकीय उपचार घ्यायला आलेल्या हजारो रुग्णांनी काय संदेश नेला असेल याची कल्पनाही राज्याच्या वैद्यकीय खात्याला करता येणार नाही.


  राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने शनिवारी औरंगाबाद शहरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते. वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपचारांचे रुग्णांसाठी असलेले महत्त्व सांगणारी भाषणे झाल्यानंतर खासदार खैरे यांनी सर्वात शेवटी भाषण करून वैद्यकीय उपचारांच्या महत्त्वावर असे 'मंतरलेले' पाणी फेरले. किती रुग्णांना आपण कसे बरे केले, आपण देत असलेल्या कुंकवाच्या पुडीत आणि आपण करीत असलेल्या गुप्त मंत्रात कशी 'दैवी' शक्ती आहे याचेही सविस्तर विवेचन त्यांनी या वेळी केले. ही अंधश्रद्धा नसून सत्य आहे, असेही ते या मंचावर ठणकावून सांगून गेले.


  आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कानन येळीकर, दंतचिकित्सा विभागाचे डॉ. एस.पी. डांगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते हे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी मंचावर उपस्थित असताना खासदार खैरे यांनी हा दावा केला. मात्र, यापैकी एकाही तज्ज्ञाला त्यासंदर्भात बोलता आले नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्चून झालेल्या या मेळाव्यातून हजारो रुग्णांनी 'उपचारांऐवजी खासदार खैरेंकडे असलेली कुंकवाची पुडी आणि मंत्राकडेच गेले पाहिजे' असाच संदेश नेला असण्याची शक्यता आहे.


  प्रमोद महाजनांबाबत खंत
  खैरे म्हणाले की, प्रमोद महाजन यांना गोळ्या लागल्या त्या वेळी गोपीनाथ मुंडे यांनी मला सिद्धिविनायकाचा प्रसाद आणायला सांगितले. माझ्याकडे कुंकवाची पुडी होती. मी राहुलला ती पुडी प्रमोद महाजनांच्या उशीखाली ठेवण्यास सांगितले. त्यामुळे महाजन १२ दिवस जगले. मी त्यांची नाडी दाबून जप करू शकलो नाही. त्यामुळे ते वाचले नाहीत, अशी खंतही खासदार खैरे यांनी व्यक्त केली.

Trending