आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या पेपर सेटर्समध्ये एमपी लाॅ काॅलेजचे प्राध्यापक, 'एमपी'च्या सराव परीक्षेतील प्रश्न विद्यापीठ प्रश्नपत्रिकेत 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अौरंगाबाद - औरंगाबादच्या एमपी लाॅ काॅलेजच्या सराव परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा 'योगायोग' दिव्य मराठीने उघडकीस आणल्यानंतर विद्यापीठाने वेगाने चौकशी सुरू केली. विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका काढणाऱ्या गटात एमपी लाॅ काॅलेजचे प्राध्यापक असल्यामुळे असे घडल्याचे समोर आले असून या प्रकरणात संबंधित प्राध्यापकाची चौकशीही सुरू झाली आहे. दरम्यान, साम्य असलेल्या चार विषयांच्या परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय कुलगुरू स्वत: घेतील, असे सांगण्यात आले. 

 

विद्यापीठाच्या एलएलबी प्री लाॅ प्रथम सत्राच्या परीक्षेतील चार विषयांच्या प्रश्नपत्रिका व दोन आठवड्यांपूर्वी एमपी लाॅ काॅलेजने घेतलेल्या सराव परीक्षेच्या प्रश्नपत्रिका यांच्या प्रश्नात ८० ते १०० टक्के साधर्म्य असल्याचा प्रकार 'दिव्य मराठी'ने मंगळवारी उघडकीस आणला. वृत्त प्रकाशित होताच विद्यापीठाच्या परीक्षा विभागात खळबळ उडाली असून चौकशीची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. मंगळवार आणि बुधवारी हाेणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकाही तातडीने बदलण्यात आल्या आहेत. ज्या चार विषयांच्या परीक्षा झाल्या आहेत, त्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि एमपी लाॅ काॅलेजच्या प्रश्नपत्रिका तपासून त्याचा अहवाल कुलगुरूंकडे पाठविण्यात आला आहे. त्या संदर्भात निर्णय कुलगुरू बी.ए. चोपडे हेच घेतील, असे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालक प्रा.डाॅ. जयश्री सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. 

 

दरम्यान, प्रश्नांमध्ये असे साधर्म्य असणे हा 'योगायोग' असल्याचे एमपी लाॅ काॅलेजतर्फे सांगण्यात आले होते. हा योगायोग कसा घडला याचा उलगडा आज झाला. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या गटात एमपी लाॅ काॅलेजच्या प्राध्यापकाचा समावेश असल्याचेही संचालक डाॅ. जयश्री सूर्यवंशी यांनी मान्य केले. या प्राध्यापकाने गोपनियतेचा भंग केला असून त्यांची चौकशी करण्याचे आदेश प्र कुलगुरू डाॅ. अशोक तेजनकर यांनी दिले आहेत, असेही डाॅ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. 

 

चार पेपर रद्द करण्याची मागणी : दरम्यान, मंगळवारी वृत्त प्रकाशित होताच आज एनएसयूआयच्या आणि विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत झालेले चार पेपर रद्द करून नव्याने परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी प्र कुलगुरू अशोक तेजनकर यांना दिले. 

 

चौकशी सुरू केली 
प्रश्नपत्रिकेचा विषय समोर आल्यानंतर परीक्षा विभागाला सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. वस्तुस्थिती लवकरच समोर येईल. डॉ. अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू 

 

आम्हाला माहिती नव्हती 
एमपी लॉ कॉलेजमध्ये पूर्वपरीक्षा घेतली गेली याची माहिती नव्हती. मात्र हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. दोषींवर कारवाई केली जाईल. डॉ. जयश्री सूर्यवंशी, संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ 

बातम्या आणखी आहेत...