आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडीने नदी पार करून खासदार प्रीतम मुंडे पोहोचल्या वाकनाथपूरला, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाकनाथपुर : पावसामुळे नुकसान झालेल्या गावांना रविवारी भेट देत भाजपच्या बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे या ताफ्यांसह बीड तालुक्यातील वाकनाथपूर गावाकडे जाण्यासाठी निघाल्या तेव्हा वाटेत टुकडमोडी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असल्याने त्यांना कारने जाता आले नाही. शेवटी बैलगाडी बोलावावी लागली. बैलगाडीत बसून मुंडे या गावात पोहोचल्या. गावात शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी अडचणी जाणून घेतल्या.


पावसामुळे कोसळत असल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून त्यांना धीर देण्यासाठी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी रविवारी गेवराई, बीड, परळी तालुक्यांचा दौरा केला. गेवराई तालुक्यातील धोंडराई बागपिंपळगाव या दोन गावांना भेटी देऊन खासदार मुंडे, भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र मस्के, राजेंद्र बांगर हे जेव्हा बीड तालुक्यातील वाकनाथपूर गावाजवळ आले. तेव्हा भाटसांगवी येथील ग्रामस्थांनी वाकनाथपूरच्या जवळ टुकडमोडी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून नदीवर पूल नसल्याने गावाच्या अलीकडे वाहने लावून गावात बैलगाडीनेच जावे लागेल, असे सांगितले. वाकनाथपूर गावाच्या अलीकडे खासदारांच्या ताफ्यातील गाड्या थांबल्या. गावातून बैलगाडी नदीच्या काठाजवळ मागवण्यात आली. बैलगाडीतून खासदार डॉ. प्रीतम मुंडे गावात पोहोचल्या. या वेळी बोलताना डॉ. प्रीतम म्हणाल्या की, नदीवरील पुलाचा प्रश्न मी तातडीने सोडवणार आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी अडचणी जाणून घेतल्या.

बंधाऱ्याला दारे लावले की गावात शिरते पाणी
बीड तालुक्यातील घोडकाराजुरी, पारगाव, उमरी, नागापूर, बऱ्हाणपूर मार्गे टुकडमोडी नदीचे पाणी वाकनाथपूर येथे येते. या नदीवर एक बंधारा असून या बंधाऱ्याची सध्या दुर्दशा झालेली आहे. बंधाऱ्याला दारे लावण्यात आली की या नदीचे पाणी आडून ते थेट गावातच शिरते. आणी गावातील लोकांचा संपर्क तुटतो. त्यामुळे या नदीवर तातडीने पूल बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याकडे केली.

दीड महिन्यापासून ग्रामस्थांना बैलगाडीने जावे लागते
टुकडमोडी नदीवर पूलच नाही. या पूर्वी किमान पाच वेळा हा पूल मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात काम झाले नाही. गेवराई मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी शासनाकडे पाठपुरावा करून या नदीवर पूल जरी मंजूर करून घेतला असला तरी तो लवकर न झाल्याने ग्रामस्थांचे हाल सुरूच आहेत. गावाकडे अधिकारी फिरकत नसल्याचा आरोप श्रीहरी गाडे या ग्रामस्थाने केला आहे. पावसाळ्यात या नदीला पाणी वाढले की गावात जाताच येत नाही, बैलगाडीचा अाधार घ्यावा लागतो.
 

बातम्या आणखी आहेत...