आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून आयात गावितांना सेनेची पालघरमधून उमेदवारी, आमदारकीच्या आश्वासनावर श्रीनिवास वनगांची बोळवण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपचे विद्यमान खासदार डॉ. राजेंद्र गावित यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश करून पालघर मतदारसंघातून उमेदवारी पटकावली आहे. विशेष म्हणजे अवघ्या एका वर्षात तीन पक्ष बदलत गावितांनी दुसऱ्यांदा खासदाकीचे तिकीट मिळवले. वास्तविक आतापर्यंत भाजपकडे असलेला हा मतदारसंघ युतीच्या तहात शिवसेनेने खास श्रीनिवास वनगा यांच्यासाठी मागून घेतला होता. मात्र, बहुजन विकास आघाडीचे (बविआ) कडवे आव्हान पाहता विधानसभेचे तिकीट देण्याच्या आश्वासनावर वनगांची बोळवण करत शिवसेनेने भाजपकडून आयात केलेल्या डॉ. गावितांना उमेदवारी देण्याचा सुरक्षित मार्ग अवलंबला. युतीच्या जागावाटप चर्चेत भाजपकडून अट्टहासाने मागून घेतलेल्या पालघर मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सोडवण्यात शिवसेनेला अखेर यश आले. 


उद्धव यांनी वनगाच उमेदवार असतील असा दिला होता शब्द
श्रीनिवास वनगा हे भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र. त्यांच्या निधनानंतर आठ महिन्यांपूर्वी पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मग भाजपनेही ऐनवेळी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांना रिंगणात उतरवले होते. या लढतीत गावितांनी वनगांचा पराभव केला होता. त्या वेळी भविष्यातही वनगा हेच शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार असतील, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यानुसार युतीच्या चर्चेत पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने भाजपकडून अट्टहासाने मागून घेतला होता.


श्रीनिवासला विधानसभेत नक्की पाठवीन
श्रीनिवासला संसदेत पाठवण्याबाबत दिलेला शब्द माझ्या लक्षात आहे. मात्र, विधिमंडळात काम करतो, असे श्रीनिवासनेच सांगितल्याने गावितांना उमेदवारी देण्यात आली आहे. श्रीनिवासला विधिमंडळात नक्की पाठवणार आहे.- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख


आधी आरोप केले, आता त्यांचा प्रचार करावा लागेल
पालघरच्या पोटनिवडणुकीत उद्धव  ठाकरे यांनी प्रचारात भाजपवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला होता. राजेंद्र गावित यांच्यावरही आरोप केले होते. आता त्याच गावितांचा प्रचार उद्धव यांना करावा लागेल.


भाजपच्या राज्यमंत्र्यांनी गावितांना बांधले शिवबंधन
गावितांना उद्धव यांनी शिवबंधन बांधले. मात्र गाठ सैल असल्याने जवळच उभे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गावितांना पुन्हा शिवबंधन बांधले. भाजप नेत्याच्या हातून शिवबंधन बांधून झालेल्या या प्रवेशाची चर्चा रंगली होती.

बातम्या आणखी आहेत...