आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - खासदार संभाजी राजे यांनी सारथीसाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे. सारथीवरून सचिव जे.पी.गुप्ता यांना हटवण्यासह त्यांचे सर्व जीआर रद्द करण्यात येतील. तसेच सारथीची स्वायत्तता टिकवणार असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिंदेंच्या आश्वासनानंतर खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतले आहे. दरम्यान मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील असेही शिंदेंनी यावेळी सांगितले.
काय म्हणाले संभाजी राजे?
“शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांचे स्वप्न होते की, माझा माणूस माझ्यापेक्षी मोठा व्हायला हवा. सारथीच्या माध्यमातून मराठा, कुणबी समाजाच्या तरुणांना अधिकारी घडवायचे आहे. मंत्री एकनाथ शिंदे इथे आल्याचे समजले मला मनापासून बरं वाटलं. कोणता साधासुधा मंत्री आला असता तर आम्हाला परवडले नसते”, असं संभाजीराजे म्हणाले.
“आपला माणूस आपल्या पेक्षा मोठा व्हावा, ही शाहू महाराजांचा भूमिका होती, आरक्षणाने सर्व समस्या सुटणार नाही, समाजातील मुले अधिकारी झाली तर हे जिवंत स्मारक ठरेल. मात्र हे मोडून टाकण्याचं कारस्थान केलं जात आहे”, असा घणाघात संभाजीराजेंनी केला.
“आम्ही कोणीही पक्षविरोधी बोलणार नाही, कुणीतरी म्हणाले मी खाली बसलो. तर मी खाली बसलो नाही तर जनतेबरोबर बसलो आहे. शाहू महाराज देखील असेच जनतेबरोबर बसत होते. मात्र मला मांडीला मांडी लावून खाली बसायला उशीर लागला. असे असले तरच मी शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन जाईल”, असे संभाजीराजे म्हणाले.
यामुळे सुरू केले होते उपोषण
राज्य सरकारने मराठा-कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वायत्त अधिकार छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना केली होती. 'सारथी' संस्थेला मराठा समाजासाठी आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीच्या विविध योजना राबवण्यासाठी कंपनी कायद्यानुसार स्वतंत्र अधिकार देण्यात आले होते. त्याबाबतचा धोरणात्मक निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. पण मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश ठेवताना संस्थेच्या अधिकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे हे आंदोलन करण्यात आले.
'सारथी' संस्थेची व्यथा मांडण्यासाठी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या आगरकर रस्त्यावरील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले होते. खासदार संभाजीराजे छत्रपती, 'सारथी'चे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे उपोषणात सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.