पुण्यातील राजकीय गणित बिघडणार, खासदार संजय काकडे यांची भाजपला सोडचिठ्ठी

काँग्रेसकडून पुण्याची लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मी पक्ष बदलत आहे, असा याचा अर्थ नाही. उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाने दिलेली जबाबदारीही पार पाडेन, असेही काकडे यांनी स्पष्ट केले.

प्रतिनिधी

Mar 11,2019 09:50:00 AM IST

पुणे - राज्यसभेत भाजपचा सहयोगी खासदार या नात्याने मी कायमच भाजपचे समर्थन केले. पण, भाजप प्रदेशाध्यक्ष, अन्य नेते, तसेच कार्यकर्त्यांनी कायम दुय्यम वागणूक दिली. सतत दुजाभाव केला. माझ्या कामाची नोंद घेतली नाही. त्यामुळे मी सर्व विचारधारा सामावून घेणाऱ्या काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत खासदार संजय काकडे यांनी रविवारी भाजपला सोडचिठ्ठी दिली.


त्यांनी ही घोषणा केल्याने पुण्यातील संभाव्य उमेदवारीची गणिते बिघडली आहेत. काँग्रेसकडून पुण्याची लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मी पक्ष बदलत आहे, असा याचा अर्थ नाही. उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाने दिलेली जबाबदारीही पार पाडेन, असेही काकडे यांनी स्पष्ट केले. पुण्यात रविवारी मनसेच्या गणेश सातपुते यांनी बोलावलेल्या कट्ट्यावर काकडे यांनी ही घोषणा केली. तेव्हा शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.


काकडे म्हणाले,“साडेतीन वर्षांत मी राज्यसभेत भाजपला पाठिंबा दिला. फडणवीसांच्या सांगण्यानुसार पुणे पालिकेच्या निवडणुकीत वैयक्तिक लक्ष दिले. मनपात ६० ते ६५ जागांवर विजय मिळेल, असे सर्वांना वाटत असताना मी भाजपचे तब्बल ९८ नगरसेवक निवडून आणले. पण माझ्या कामाची नोंद भाजपत घेतली गेली नाही. प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी तर कायमच दुजाभावाची वागणूक दिली. आपल्या कामाची दखल जिथे घेतली जात नाही, तिथे राहून काम करण्यापेक्षा कामाची नोंद घेणाऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झाली. त्यानुसार मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे, असे काकडे यांनी सांगितले.


भाजपच्या यादीतून पत्ता कट झाल्याने शोधला पर्याय
काकडे यांची बांधकाम क्षेत्रात ३० वर्षांची कारकीर्द आहे. २०१४ पूर्वी त्यांची राष्ट्रवादीशी जवळीक होती. मात्र, २०१४ मध्ये त्यांनी भाजपच्या मदतीने राज्यसभेची निवडणूक जिंकली. २०१६ मध्ये पुणे पालिकेच्या सर्व प्रभागांची भाजपची जबाबदारीही काकडेंवर टाकण्यात आली. त्यात ९८ नगरसेवक निवडून आणल्याचा काकडेंचा दावा आहे. दरम्यान, ६ महिन्यांपूर्वी त्यांनी लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केली व पुण्यातून मोर्चेबांधणीही सुरू केली, मात्र प्रदेशाध्यक्ष दानवेंनी त्यांच्याबाबत अनुकूलता दाखवली नाही. स्थानिक भाजप कार्यकर्तेही नाराज आहेत. केंद्र पातळीवर भाजपने पाठवलेल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीतही काकडेंचे नव्हते.

X
COMMENT