इंटरव्ह्यू / ज्या प्रश्नावर शरद पवार भडकले होते, त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांचे संयमी उत्तर

‘त्याच्या’ जागी मी असते तर तेव्हाच राजकारण सोडले असते

Sep 12,2019 08:24:00 AM IST

दत्ता सांगळे | औरंगाबाद
नातेवाईकच राष्ट्रवादी सोडून चालले, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार थेट पत्रकारांवरच भडकले होते. याची राज्यात मोठी चर्चा झाली होती. मात्र, नेमक्या अशाच एका प्रश्नावर औपचारिक गप्पा मारताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र अतिशय संयमाने परंतु परखडपणे प्रतिक्रिया दिली. त्या यत्किंचितही भडकल्या नाहीत. एवढे खरे की त्यांनी थेट संबंधितांचा नामोल्लेख टाळला. त्या म्हणाल्या, त्याच्या जागी मी असते तर त्याच क्षणी राजकारण सोडले असते. बाप-लेक दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र वडिलांवर गुन्हा दाखल असल्याने त्यांना पक्षात न घेण्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले असा निरोप त्याला देण्यात आला. त्या वेळी त्याने तेथूनच परत फिरायला हवे होते. परंतु तो अर्ध्या रस्त्यात बापाला उतरवून स्वत: भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी सोलापूरला गेला. त्याच्या जागी मी असते तर तेव्हाच राजकारण सोडले असते. एवढे स्वार्थी राजकारण मी करू शकत नाही, असे सुप्रिया ‘दिव्य मराठी’ बोलताना म्हणाल्या.


म्हणे, मुख्यमंत्री त्याला मदत करणार आहेत...
प्रश्न : डॉ. पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह हे राष्ट्रवादी सोडून गेले. त्याआधी त्यांनी तुमच्याशी चर्चा केली नाही?

सुप्रिया : डॉ. पाटलांशी माझे बोलणे झाले नाही, परंतु राणाशी झाले होते. बँक, कारखाना यात समस्या असल्याचे तो सांगत होता. आम्ही भाजपमध्ये गेलो तर मुख्यमंत्री एका प्रकरणात मदत करणार असल्याचे सांगण्यात आले होते, असे तो म्हणाला. तो स्वार्थासाठी तिकडे गेला. लोकशाहीत आपण कोणाला थांबवू शकत नाही. परंतु एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्यांनी आपली तलवार म्यान करून जाणे कितपत योग्य आहे?


प्रश्न : चौकशी थांबवण्यासाठी ते गेले की सत्तेत राहण्यासाठी?
सुप्रिया : दोन्हीही गोष्टी असू शकतील. परंतु मी अलीकडे पाहते की राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचे जे नेते भाजपमध्ये प्रवेशासाठी आसुसले आहेत त्याचे एकमेव कारण म्हणजे पुत्रप्रेम आहे. मुलांची भविष्याची व्यवस्था लावण्याचे त्यांना पडले आहे. कारण त्यांची मुले ही स्वकर्तव्यावर मोठी होऊ शकत नाहीत, याची त्यांना माहिती आहे. (बाजूला एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम बसलेले असतात. त्यांच्याकडे बघून त्या म्हणतात. ‘बरे झाले, तुम्हाला मुले नाहीत. अन्यथा तुम्ही मुलांच्या हट्टापोटी पक्ष सोडला असता.’)


प्रश्न : म्हणजे ही मंडळी फक्त मुलांसाठी सत्ताधारी पक्षांत गेली?
सुप्रिया : हो. यातील एकही जण मुलीच्या राजकीय सोयीसाठी गेल्याचे उदाहरण नाही. मुलगी कधीच बापाकडे काही मागत नाही. वेळप्रसंगी ती हुंडाबळी ठरते. आत्महत्या करते परंतु बापाला अडचणीत आणत नाही. मुले मात्र बापाने आयुष्यात काय केले हे न बघता स्वत:चा स्वार्थ पाहतात. अन्य पक्षात जाणाऱ्या नेत्यांची मुले स्वकर्तत्वावर पुढे काही करू शकत नाही, याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळेच ते मुलांची सोय करण्यासाठी असे निर्णय घेताना दिसतात. महाराष्ट्रातून असे काही खासदारही दिल्लीत पोहचले आहे जे की फक्त बापाच्या नावावर विजयी झाले. पुढेही त्यांनी विजयी व्हावे म्हणून पक्षांतर होताना दिसते.


प्रश्न : ज्यांच्या संस्था आहेत, ताब्यात बँका आहेत अशीच मंडळी पक्षांतर करताना दिसतात
सुप्रिया : हेच तर उघड गुपित आहे. भाजपला अशीच माणसे हवी आहेत. ते आता त्यांना पक्षात घेतली. भाजप उमेदवारांना रिपीट करत नाही, हे सर्वांना माहिती आहे. जे संस्थाचालक, बँकांचे कर्तधर्ते आता भाजपमध्ये दाखल झाले त्यांच्याकडून पुढील पाच वर्षांत भाजप त्यांच्या संस्था काढून घेतील आणि सोडून देतील. म्हणजे या संस्था भाजप पदाधिकाऱ्यांच्या मालकीच्या झालेल्या असतील. अन पक्षांतर करणारी मंडळी संपलेली असेल.


प्रश्न : माजी मंत्री राजेश टोपेही भाजपच्या मार्गावर असल्याची चर्चा कानी येतेय. आज ते सोबत दिसत नाहीत.
सुप्रिया : टोपे यांचा मतदार संघ हा जालना जिल्ह्यात येतो. ते प्रत्येक वेळी औरंगाबादेत माझ्यासोबत असतातच असे नाही. त्यामुळे ते आज आले नसावेत. परंतु ते जाणार नाही, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मोठा कार्यक्रम घेतला. ते जाणार नाही, असा मला विश्वास आहे.

X