Home | International | Pakistan | MQM-P supporting MPs Imran khan with 6 parties, 9 Independent

पाकिस्तानमध्ये पीटीआयने जमवले बहुमत; एमक्यूएम-पीसह ६ पक्ष, ९ अपक्ष खासदारांचा इम्रान यांना पाठिंबा

वृत्तसंस्था | Update - Aug 06, 2018, 08:44 AM IST

बहुमताचा आवश्यक तो आकडा जमवण्यास यश आल्याचा दावा पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या पीटीआय या पक्षाने केला आहे.

 • MQM-P supporting MPs Imran khan with 6 parties, 9 Independent

  इस्लामाबाद- सरकारसाठी बहुमताचा आवश्यक तो आकडा जमवण्यास यश आल्याचा दावा पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्सान (पीटीआय) या पक्षाने केला आहे. विशेष म्हणजे इम्रानच्या विरोधातील पाकिस्तान मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम-पी) या पक्षाचाही पाठिंबा देणाऱ्यांत समावेश आहे.


  शनिवारी एमक्यूएम-पीने आपल्या सहा खासदारांचे इम्रान यांना पाठिंबा देणारे पत्र सोपवले. त्याशिवाय चार जागा जिंकणारा पाकिस्तान मुस्लिम लीग-क्यू, दोन खासदारांची ग्रँड डेमॉक्रॅटिक अलायन्स (जीडीए), चार खासदारांची बलुचिस्तान अवामी पार्टी, प्रत्येकी एक खासदार असणारा अवामी मुस्लिम लीग आणि जम्हुरी वतन पार्टी यांनीही इम्रान खान यांना केंद्रात पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय ९ अपक्ष खासदारांनीही इम्रान यांच्या सरकारला आपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या २५ जुलैला नॅशनल असेम्ब्लीच्या २७२ जागांवर निवडणूक झाली होती. तीत पीटीआय ११५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, तो बहुमतापासून दूर आहे. आता हे सहा पक्ष आणि अपक्ष खासदार मिळून त्यांच्याकडे १४३ जागा झाल्या आहेत. राखीव जागांसह त्याच्याकडे बहुमत झाले आहे.


  पंतप्रधानपदासाठी इम्रान यांच्या उमेदवारीची आज अधिकृत घोषणा होणार
  पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर सोमवारी अधिकृतरीत्या इम्रान खान यांची पक्षाकडून पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर होईल. पक्षाने सांगितले की, इम्रान आपल्या मंत्रिमंडळात १५ ते २० लोकांना स्थान देतील. असे असले तरी पक्षाने रविवारीही इम्रान यांच्या शपथविधीची तारीख जाहीर केली नाही. मात्र, पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १४ ऑगस्ट रोजी ते शपथ घेतील, अशी आशा आहे.


  पाठिंब्याच्या बदल्यात कराचीला पॅकेज, हैदराबादमध्ये विद्यापीठ सुरू करणार
  एमक्यूएम-पीचे नेते खालिद मकबूल सिद्दिकी यांनी सांगितले की, हा करार घटना व लोकशाहीच्या हितासाठी आवश्यक आहे. याच्या बदल्यात इम्रान खानचेे केंद्र सरकार कराचीसाठी विशेष पॅकेज देईल. यामुळे लोकांची पाण्याची समस्या दूर होईल. पीटीआय सिंध पोलिस सुधारणा लागू केली जाईल यावरही संमती झाली. हैदराबादमध्ये एक विद्यापीठही सुरू केले जाईल.


  आयोगाने म्हटले-पीटीआयची एक जागा चुकीन वाढली होती, खरी संख्या आहे ११५
  पाकिस्तान निवडणूक आयोगाने शनिवारी सांगितले की, पीटीआयला मिळालेल्या जागा ११५ आहेत. याआधी चुकीने त्यांची एक जागा जास्त दाखवली होती. यासंदर्भात आयोगाने चूक सुधारून एक पत्रक जारी केले आहे.


  इम्रान खान यांच्या विजयात मतदारसंघ व्यवस्थापन प्रणाली अॅपचाही मोठा वाटा
  पाकिस्तानी क्रिकेटपटू ते नेता झालेले इम्रान खान यांच्या विजयात एक फोन अॅप व ५ कोटी मतदारांच्या डेटाबेसचा मोठा वाटा राहिला आहे. अॅपचे नाव मतदारसंघ व्यवस्थापन प्रणाली होते. त्याद्वारे पीटीआय मतदारांशी जोडला व मतदानाच्या दिवशी त्यांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रोत्साहन दिले. याचा निवडणुकीवर मोठा परिणाम झाला. विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी म्हणजे २५ जुलैपर्यंत पीटीआयच्या नेत्यांनी याबाबत गोपनीयता बाळगली होती. यामुळे विरोधी पक्षाचा पराभव झाला. नॅशनल असेंब्लीसाठी पीटीआयने १५० मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले. मतदान केंद्राची माहिती दिली जात होती.

Trending