आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमभाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॅलेंटाइन डे जवळ आलाय आणि तरीही बाजारपेठा गुलाबी किंवा लाल रंगलेल्या दिसत नाहीयेत. टीव्हीवर वगैरे जाहिरातींचा थोडाफार मारा आहे फक्त. याचा एक अर्थ असा असू शकतो की, तरुणवर्ग या प्रकारच्या सेलिब्रेशनला कंटाळलाय. त्यांना फुगे, फुलं, चॉकलेटं, टेडी बेअर वगैरे जुनं वाटतंय. हे सेलिब्रेशन हा कंपन्यांच्या मार्केटिंगचं फलित होतं, हे या वर्गाला कळलं असेलच असं मात्र नाही. आता हातात मोबाइल असतो. व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट, यांसारखी अत्यंत खाजगी संवादाची माध्यमं दिमतीला हजर असतात. त्यामुळे प्रेमाचा इजहार की काय जो करतात, तो करायला असे खुले प्रयत्न मुलंमुली करत नसावीत. कारण प्रेम करणं थांबलेलं नाही. ते तसं थांबणारही नाही. पण त्याचं स्वरूप बदललं आहे.प्रेम कोणावरही करावं, असं मंगेश पाडगांवकरांनी म्हणून ठेवलेलं आहे अनेक वर्षांपूर्वी.

 

या ओळींचा खरा अर्थ नवी पिढी जगू पाहाताना दिसतेय. अंहं, याला संदर्भ केवळ LGBTQ व्यक्तींचा नाही. तरुण पिढी स्वत:वरही प्रेम करतेय. त्यांना त्यांचं काम आवडतंय, कामात ते झोकून देतात स्वत:ला. आणि आयुष्यावर प्रेम करतात. भरपूर काम करतात, तितकाच आयुष्याचा आनंद लुटतात. त्यांची मनं अधिक खुली, मोकळी आहेत. त्यामुळे ते नवीन गोष्टी/कल्पना सरसकट नाकारून न देता त्यांच्याबद्दल जाणून घेतात. स्वीकारायचा प्रयत्न करतात. प्राण्यांवर जीव लावतात, निसर्गाचा सांभाळ करण्यासाठी झटतात, खूप प्रवास करतात, पुस्तकं वाचतात, खूप फोटो काढतात, गाणी ऐकतात, कविता लिहितात, इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकतात, मतं व्यक्त करतात, हावरटासारखी मित्रमंडळींबरोबर वेळ घालवतात, वेगवेगळे उद्योग करून पैसे मिळवतात. 


एकीकडे त्यांना काय नक्की हवंय ते त्यांना माहीत असतंय, दुसरीकडे लग्न हा एक विषय आहे ज्याबाबत ही मुलं जरा द्विधा मनस्थितीत आहेत. लग्न करायलाच हवं का, इथपासून लग्न का करायला हवं इथवर त्यांच्या प्रश्नांचा व्याप आहे. पालकवर्ग यामुळे काहीसा चिंतित असतो हे मात्र खरं. कारण अजून बहुतांश पालक ‘पंचवीस झालं की पूर्ण, आता तरी लग्नाचं पाहा, नंतर मिळणार नाही कोणी’ या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. अर्थात या मानसिकतेतही त्यांचं आपल्या लेकरांवरचं प्रेमच असतं, याबद्दल शंका नाही.


लहानथोर सर्वांनाच वसंतपंचमी आणि व्हॅलेंटाइन दिनानिमित्त प्रेममय शुभेच्छा. 

 

बातम्या आणखी आहेत...