आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाश्वत बदल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज मकर संक्रांत, सूर्याच्या दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात संक्रमणाचा, वा बदलाचा दिवस. म्हणजे उत्तरायण. सृष्टीत होणारे बदल आपल्याला जाणवत असतातच. जसं दिवस आता तीळतीळ वाढत जाईल, सूर्योदय लवकर होत जाईल, थंडी कमी होईल, आंब्याच्या मोहोराच्या दरवळाने आसमंत भरून जाईल, जिकडेतिकडे ऊसबोरंचिंचा दिसू लागतील. राजकीय संक्रमणाचा काळही जवळ आलाच आहे, लोकसभा निवडणुका आता केव्हाही जाहीर होऊ शकतात. त्याबरोबरच राज्यातल्याही निवडणुका होण्याची शक्यता आहे. सर्व प्रसिद्धीमाध्यमांमधून युती, आघाडी, फूट, तूट, पक्षप्रवेश, अशा बातम्या (की वावड्या?) अधिकाधिक येऊ लागल्या आहेत. सोशल मीडियावर तावातावाने राजकारणावर चर्चा सुरू आहेत, तर बाकीचे कंटाळलो राजकारणाला नि राजकारण्यांना, असं म्हणतायत. 

 

बदल आसपासच्या घटनांमध्येही दिसतोय. आजच्या कव्हर स्टोरीचा संदर्भ घेतला तर हा फारच आश्वासक बदल आहे. पाळी हा शब्दही बहुतांश घरांमध्ये स्पष्ट उच्चारला जात नसताना, अगदी बायकाबायकांच्या बोलण्यातही, एका दैनंदिन मालिकेत एखादा एपिसोड या विषयाचं एक लोभस रूप दाखवणारा असावा, हे मोलाचं आहे. अशा विषयांना हात घालण्याचं प्रमाण कमीच असणार आहे, पण पूर्वी जे अगदी नसल्यागत होतं, ते आता बदलतंय याचा हा पुरावाच. मधुरिमाने गेल्या सातआठ वर्षांत अनेकदा या विषयाच्या वेगवेगळ्या बाजू समोर आणल्या होत्या, ते वाचकांना आठवतच असेल. ‘मधुरिमामधला लेख वाचून मला कळलं की बायकोला दर महिन्यात इतका त्रास का होतो, आणि मी तिला बरं वाटावं म्हणून काय करू शकतो,’ असं एक विवाहित पुरुष सांगतो तेव्हा या विषयावर कितीतरी मोकळेपणे बोलायला, लिहायला हवंय, चित्रपटनाटकमालिका अशा दृश्य आणि अधिक परिणामकारक, माध्यमांमधून हा विषय योग्य रीतीने हाताळायला हवाय, याची खात्री पटते. एका मालिकेचा एक एपिसोड म्हणजे काही ऐतिहासिक बदल नव्हे, पण ही बदलाची नांदी जरूर असू शकते. 

 

बदल हाच शाश्वत आहे, असं बौद्ध तत्त्वज्ञान सांगतं. त्याचा आपल्याला झेपेल असा अर्थ आपण लावायचा असतो. आज आहे ते काहीच उद्या जसंच्या तसं नसणार आहे, हे भवतालाला लागू होतं तसं मनुष्यस्वभावालाही. नकोशा परिस्थितीत, विचित्र स्वभावात बदल होईल ही आशा माणसाला तगवून ठेवत असते. काही गोष्टी कायमच्या असाव्यात असं सर्वांनाच वाटत असतं, पण काही उद्या किंवा परवा किंवा लवकरच बदलायला हव्यात असंही सर्वांना वाटत असतं.

हे संक्रमण, हा बदलाचा काळ, तुम्हा सगळ्यांना आनंदाचा जावो, या शुभेच्छा.

 

बातम्या आणखी आहेत...