Home | Magazine | Madhurima | Mrinmayee Ranade writes about festival season

दिवस सणासुदीचे

मृण्मयी रानडे | Update - Aug 14, 2018, 12:31 AM IST

एरवी वर्षभर सुरूच असतंय काही ना काही, पण श्रावणापासून दिवाळीपर्यंत चार महिने सणांची अगदी रेलचेल असते.

 • Mrinmayee Ranade writes about festival season

  श्रावण सुरू झाला की, भारतात सणावारांना सुरुवात होते. म्हणजे एरवी वर्षभर सुरूच असतंय काही ना काही, पण श्रावणापासून दिवाळीपर्यंत चार महिने सणांची अगदी रेलचेल असते. उद्याच्या नागपंचमीपासून सुरुवात होणारेय मज्जा करण्याची. श्रावणात अनेकांचे उपास असतात वेगवेगळे, किंवा काही व्रत घेतलेलं असतं, संकल्प सोडलेले असतात. काही मांसाहारी मंडळी या काळात शाकाहाराचा आनंद लुटतात. कोणी काही दान करतं वेगवेगळ्या कारणानं, वेगवेगळ्या वस्तूंचं. शाळाकाॅलेजंआॅफिसांना जरा जास्तच सुट््या मिळतात. मुख्य म्हणजे या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागांत त्या त्या सणाचे खास पदार्थ केले जातात. आजकाल आपण सगळेच व्हाॅट्सअॅप विद्यापीठाचे विद्यार्थी झाल्याने कोणता सण/निमित्त विसरायची संधीच दिली जात नाही. आणि त्या निमित्ताने आज अमुक आहे, अमुक पदार्थ करा, असं नीट सांगितलं/सुचवलं जातं.


  श्रावण हा आपल्यासाठी फक्त एक महिना नाही. ती एक संकल्पना आहे, तिच्याभोवती काव्य रचलं गेलंय, अजून रचलं जातंय. बऱ्यापैकी पाऊस होऊन गेलेला असतो, शेतकरी शेतीच्या विवंचनेतून बाहेर आलेला असतो. तेव्हाच हे सण साजरे करायला वगैरे सुचतं, कविता जन्माला येतात. शेकडो वर्षांपूर्वीची पावसाची, पावसाची वाट पाहण्याची आठवण आपल्या अद्याप रुजून असते. त्यामुळे डांबरी रस्त्यांवरनं पडणारं पावसाचं पाणी थेट समुद्राला जाऊन मिळणार असलं तरी अाजचं शहरी मनही श्रावणाच्या आगमनाने तरारून उठतं.


  यंदा महाराष्ट्राच्या काही भागांत समाधानकारक पाऊस झालाय, पण काही ठिकाणी चांगलीच ओढ दिलीय त्याने. कदाचित या परिस्थितीत सण साजरे करायला सुचणारही नाही. सामाजिक आणि राजकीय पातळीवरही काहीशी अस्वस्थता आहे. त्यामुळे सणांवर या सगळ्याचं सावट असणारच आहे. परंतु काहीतरी चांगलं घडणार आहे, याची वाट पाहायला लावणं, हाही सणांचा एक उद्देश असतोच की. आता काहीसं निराश वाटत असलं तरी उद्या छान असणारेय, याची ग्वाही जणू हे सण देत असतात. म्हणून ते साजरे करायचे. अर्थात नवीन काळानुसार त्यात तसे बदलही करायचेच. पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल हे पाहायचं. प्रदूषण टाळायचं. जास्तीत जास्त लोकांना आपल्या आनंदात सामील करून घ्यायचं. बरोबर ना?
  श्रावणमासाच्या, आणि उद्याच्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्व वाचक मित्रमैत्रिणींना खूप शुभेच्छा.


  - मृण्मयी रानडे, मुंबई
  mrinmayee.r@dbcorp.in

Trending